करोनाच्या भयानक फैलावामुळे सुरू झालेल्या टाळेबंदीत टिकाव लागण्याची शक्यताच संपल्यामुळे राज्याराज्यांतील परप्रांतीयांनी गावाचा रस्ता धरला आहे. करोनास्थिती सामान्य झाल्यावर बदललेल्या जीवनशैलीत अनेक उद्योग व्यवसायांना अस्तित्व गुंडाळावे तरी लागेल, किंवा नव्याने उभे राहण्यासाठी प्रचंड शक्ती, पैसा आणि मुख्यत: नवी कार्यशैली निर्माण करावी लागेल. शहरांमधून गाशा गुंडाळून गावी गेलेल्या लहानमोठ्या व्यावसायकांमध्ये पुन्हा शहरांकडे परतून आपले व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता आणि आर्थिक क्षमता असेलच असे आज तरी दिसत नाही. येणारा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा जास्त अनिश्चितता घेऊनच उगवत असल्याने, गावाकडून शहरांमध्ये येऊन लहानमोठे व्यवसाय करणाऱ्यांनाच या अनिश्चिततेचा जबर फटका बसणार हे स्पष्ट आहे.
थोडक्यात, करोनाकाळ निवळल्यानंतर लहान व्यवसायांचे कंबरडे मोडलेले असेल. घडी विस्कटलेली असेल. तरीही, जी काही परिस्थिती त्या वेळी असेल, त्यामध्येही या व्यवसायांचे असणे ही मोठी गरज असेल.
म्हणून, आतापर्यंत हुकलेल्या संधीचा फायदा घेण्याचे आव्हान भूमिपुत्रांना परिस्थितीने दिले आहे. परप्रांतीयांनी आपल्या रोजगारांवर अतिक्रमण केल्याची भावना भडकावत ठेवून अनेक राजकीय पक्ष, संघटना स्वत: फोफावल्या. भूमिपुत्रांच्या हक्काची आंदोलने वगैरे गोंडस नावाखाली हा प्रश्न धगधगताही ठेवला गेला. मात्र तो कधीच कायमचा सुटला नाही. प्रादेशिक विकासाचा असमतोल हे या प्रश्नाचे मूळ असते. अविकसित प्रदेशांत रोजगाराच्या संधी कमी असतात. त्यामुळे त्या भागांतील तरुण रोजगारासाठी विकसित प्रदेशांचा रस्ता धरतो. हे काही गुपित नाही. त्यामुळे, समतोल विकास हे या समस्येचे उत्तर असूनही त्यासाठी मात्र फारसे प्रयत्न झाले नाहीत असा याचा अर्थ आहे.
करोनोत्तर काळात, विकासाच्या संधी सर्वत्र समान असतील. कारण विकसित भागांनाही या काळाचा फटका बसणार असल्याने विकासाची पीठेहाट होईल, आणि अविकसित भागांतील गरजा वाढल्याने मागणी वाढून विकासाच्या संधींना निमंत्रण द्यावे लागेल.
शहरे सोडून गावाकडे गेलेल्यांकरिता त्या त्या भागात रोजगारांचे नवे मार्ग निर्माण करावे लागतील. त्यामुळे ग्रामीण भागांत रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच, पण शहरी भागात निर्माण होणारी पोकळीही भरून काढावी लागेल.
इथे भूमिपुत्रांच्या आजवर गमावलेल्या संधी समोर उभ्या राहतील. मुंबईसारख्या महानगरांत ज्या संधी परप्रांतीयांनी मिळविल्या, त्या साऱ्या संधी भूमिपुत्रांसाठी उपलब्ध राहतील. अर्थात, परप्रांतीयांना त्या संधी सहजपणे उपलब्ध झालेल्या नव्हत्या. लहानात लहान व्यवसायातदेखील जम बसविण्याकरिता त्यांनी अपार मेहनत घेतली होती. संघटित प्रयत्न केले होते आणि मुख्य म्हणजे, या काळात ते एकमेकांसोबत होते.
नव्या परिस्थितीत या संधी आपल्याला मिळवायच्या असतील, तर भूमिपुत्रांनाही तेच करावे लागेल.
कारण संधी फार काळ हात जोडून समोर ताटकळत नसतात.
तुम्हाला काय वाटतं?
No comments:
Post a Comment