Sunday, August 30, 2020

बाबांना विचारा...

 “विचारा... विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे!”...

चमकदार डोळ्यांची ती चिमुरडी मिश्किल सुरात मला जणू आव्हान देत होती, आणि मागच्या बाजूला आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचणाऱ्या तिच्या बाबांकडे मी पाहिलं.

चष्म्याच्या काचेच्या कोपऱ्यातून आमच्याकडेच चोरून पाहणाऱ्या तिच्या बाबांच्या डोळ्यात भीती उमटली असावी असं मला उगीचच वाटून गेलं, पण तोवर तिचे बाबा सावरले असावेत. 

मी त्यांच्याकडे बघून आदराने एक हलकेसे स्मितहास्य केले, आणि आरामखुर्चीत बसलेले तिचे बाबा पुन्हा कावरेबावरे झाले.

‘आता खरंच हा आपल्याला काहीबाही विचारणार’ अशी शंका त्यांच्या डोळ्यात स्पष्ट उमटली, आणि वर्तमानपत्राचा कागद आपल्या चेहऱ्यावर ओढून घेत त्यांनी तोंडच लपविले.

मिश्किल डोळ्यांची ती मुलगी अजूनही खट्याळ हसत माझ्याकडे पाहातच होती.

जणू बाबांना खरंच सगळं माहीत आहे का याची परीक्षाच घ्यायचे तिने ठरवले असावे.

पण बाबांनी पेपराआड चेहरा लपविल्याचे माझ्या लक्षात आले होते.

मुलीच्या मनातील बाबांच्या प्रतिमेस तडा जायला नको म्हणून मी गप्प बसणेच पसंत केले.

पण तिच्या ‘सगळं माहीत असलेल्या’ बाबांना एक प्रश्न विचारावा, असे मनात आलेच होते.

परीक्षा न घेता मुलांना पास करता येणार नाही या कोर्टाच्या निकालावर सगळं माहीत असलेल्या बाबांनी काहीतरी बोलावे, असे मला वाटत होते.

पण बाबांचे आमच्याकडे लक्षच नव्हते. ते पेपरातच डोकं खुपसून बसले होते.

‘जाऊ दे... तुझे बाबा पेपर वाचतायत.. नंतर कधीतरी विचारीन !’ त्या चिमुरडीकडे कौतुकाने पाहून मी म्हणालो, आणि ती काहीशी हिरमुसली होऊन माजघरात पळाली!

पुढे दोनतीन दिवसांनी पुन्हा एकदा असाच, सहज त्यांच्याकडे गेलो, पण ती चुणचुणीत चिमुरडी पुढे आलीच नाही.

बाबाही नेहमीप्रमाणे पेपरात तोंड खुपसून आरामखुर्चीत बसले होते.

मी बाहेर पडलो.

दरवाजाबाहेर अंगणात एक चुणचुणीत मुलगा गोट्या खेळत होता.

माझ्याकडे बघून तो मिश्किल हसला.

बहुतेक त्या चिमुरडीचा मोठा भाऊ असावा.

मी त्याच्याजवळ गेलो, आणि गोट्या खेळायचं थांबवून उभा राहात उलट्या मनगटाने कपाळावरचे केस मागे सारत तो माझ्याकडे पाहून पुन्हा मिश्किल हसला.

‘काय रे, तुझी बहीण कुठे आहे?’ मी विचारले.

‘असेल घरात बसलेली...’ तो काहीसा बेफिकीरीने म्हणाला.

‘पण मी आत्ताच जाऊन आलो, दिसली नाही... आलीच नाही पुढे. नाहीतर आपणहोऊन येऊन सांगायची, “विचारा विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे”...

“आता ती असा आगाऊपणा करणार नाही!” गंभीर होत दरवाजातून आत पाहात तो म्हणाला.

“का रे? काय झालं?” मी.

“त्या दिवशी बाबांनी तिला चांगलं झापलंय. येईलजाईल त्याला म्हणायची, विचारा विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे... मग बाबांचा प्राॅब्लेम व्हायचा ... म्हणून बाबांनीच तिला सांगितलं, की, कुणी आलं की बाहेर यायचं नाही. माजघरात बसून अभ्यास करायचा... तेव्हापासून ती येत नाही!”...

एवढं बोलून पुन्हा खाली बसून त्याने लांबवरच्या एका गोटीवर नेम धरत बोटं ताणली.

मी एकवार कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं, आणि रस्ता धरला!

Saturday, August 1, 2020

एका अमर दंतकथेची अखेर!

एका अमर दंतकथेची अखेर!
राजकीय पक्ष, चंदेरी दुनिया आणि उद्योगविश्वालाही हवाहवासा वाटणारा अमर सिंह नावाचा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकारामुळे अंथरुणास खिळलेल्या खासदार अमर सिंह यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली, आणि या तीनही क्षेत्रांत शोकाच्या लाटा उसळल्या. राजकारणातले गूढ म्हणून ओळखले जाणारे अमर सिंह आपल्यासोबत राजकीय, उद्योग आणि चित्रपटसृष्टीतील अनेक सहस्यकथांची उकल न करताच परलोकवासी झाले. या क्षेत्रातील त्यांचा सहज वावर ही राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने एक गूढकथा होती. राजकीय कारकीर्दीतील मोठा काळ त्यांनी मुलायमसिंह यादव यांचा विश्वासू सहकारी म्हणून समाजवादी पार्टीसोबत घालविला असला, तरी ते कधीच त्या एकाच नेत्याशी व त्याच पक्षाशी बांधील राहिले नव्हते. काँग्रेसपासून भाजपपर्यंत, साऱ्या पक्षांतील साऱ्या नेत्यांसोबत असलेली अमर सिंह यांची ऊठबस हेच त्यांचा व्यक्तिमत्वातील गूढपणाचे कारण होते. काँग्रेसच्या तंबूतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अमर सिंह यांची उपयुक्तता नेमकी हेरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी त्यांच्याशी दोस्तीचा हात पुढे केला, आणि पार्टीतील भल्याभल्या नेत्यांना मागे सारून अमर सिंह हे पार्टीतले प्रस्थ बनले. समाजवादी पार्टीच्या कारभारावर त्यांनी आपला एवढा अंकुश बसविला, की त्या काळात अमरसिंहांचा शब्द हा पक्षातील अंतिम शब्द मानला जाऊ लागला. उत्तर प्रदेशातील राजकारणाचा चाणक्य म्हणून ओळख असलेल्या अमर सिंहांनी आपल्या राजकीय संबंधांचा धूर्त वापर करून समाजवादी पार्टीला राजकारणाच्या केंद्रस्थानी बसविले. मुलायमसिंह यादव यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसविण्यातही त्यांचाच मोठा वाटा होता. वेगवेगळ्या निवडणुकांतील उमेदवार निवडीचा निर्णय अमरसिंहांनी हिरवा कंदिल दाखविल्याखेरीज पूर्ण होत नसे. पक्षाचे महासचिव आणि राज्यसभा सदस्य असतानाही, अन्य अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध हे अखेरपर्यंत एक गुपित होते. अमरसिंह यांच्या सल्ल्याखेरीज पान हलत नाही, अशा नामवंतांमध्ये एकेकाळी अमिताभ बच्चन यांचाही समावेश होताच. बच्चन कुटुंबासाठी राज्यसभेचे दरवाजे अमरसिंह यांच्यामुळेच खुले झाले, हे गुपित राहिले नव्हते. सिनेसृष्टीतील कलावंतांची लोकप्रियता ओळखून त्यांना राजकारणात आणण्याचे व प्रस्थापित करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे होते. त्यामुळेच, चंदेरी दुनियेतील जेमतेम कारकिर्दीतच अमाप लोकप्रियता मिळविलेली अभिनेत्री जयाप्रदा राजकारणाच्या रंगमंचावर अमर सिंह यांच्यासोबत सहजपणे वावरू लागली.
पुढे समाजवादी पार्टीतील नेतृत्वाच्या वादातून मुलायमपुत्र अखिलेश यादव यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेली, आणि अमर सिंह यांनी समाजवादी पार्टीला नमाजवादी पार्टी असे नाव देऊन टाकले. त्याआधी त्यांना मुलायमसिंहांनी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविलाच होता. त्यांनी राष्ट्रीय लोक मंच नावाचा स्वतःचा पक्षही स्थापन केला, आणि जयाप्रदा यांच्यासोबत पक्षाची पाळेमुळे रुजविण्यासाठी दौरे सुरू केले. पिलिभीतमधील बिलसंडा गावात त्यांची जाहीर सभा होणार होती. या सभेत जयाप्रदा त्यांच्यासोबत आहे अशी जोरदार जाहिरात झाली, आणि सभेला प्रचंड गर्दी लोटली. जयाप्रदा यांचे दर्शन घेण्यासाठी रसिक (श्रोते कि प्रेक्षक?) अक्षरशः उतावीळ झाले होते. बराच वेळ गर्दी ताटकळल्यानंतर अमर सिंहांचे आगमन झाले, आणि जयाप्रदासोबत ते मंचावर आले. लोकांमध्ये अक्षरशः उन्माद संचारला होता. संध्याकाळ उलटून रात्रीचा अंधार पडू लागला होता. अमर सिंह यांनी माईक हातात घेतला, पण लोकांना त्यांचे भाषण ऐकायचे नव्हते. लोकांचा मूड ओळखून जयाप्रदांच्या हाती त्यांनी माईक दिला, आणि पुन्हा एकदा गर्दी अनावर झाली. जयाप्रदा यांना नेता म्हणून नव्हे, तर अभिनेत्री म्हणून पाहाण्यासाठी जनता उत्सुक होती. गर्दीतून फर्माईश सुरू झाली. शिट्ट्यांचा गदारोळ झाला, आणि फर्माईश घुमू लागली. मग जयाप्रदा यांनी भाषण आवरते घेतले, आणि त्या राजकीय मंचावर मुझे नौ लख्खा मंगा दे रे, सईया दिवाने... या गाण्यावर त्यांनी ताल धरला. अमर सिंहांनी सभा जिंकली होती.
राजकारणाच्या मंचावर अभिनेत्यांना आणून पब्लिकला पागल करण्याच्या त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांना घाम फुटत असे, असे म्हणतात. २४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी अमर सिंह ढसाढसा रडले. श्रीदेवीचा अकाली मृत्यू अमरसिंहांना अस्वस्थ करून गेला. श्रीदेवी आणि आपले एवढे घनिष्ट संबंध होते, की ळ श्रीदेवी बोनी कपूरचे बोलणे कानाआड करेल, पण आपल्या म्हणण्याचा कधीच अनादर करणार नाही, असे सांगत तिच्या अनेक आठवणींनी व्याकुळ होऊन अमर सिंहांना अश्रू अनावर झाले होते. श्रीदेवीच्या निधनाची पहिली खबर देण्यासाठी बोनी कपूरचा पहिला फोन आपल्यालाच आला होता, असे अमर सिंह यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.
राजकारणात घोडेबाजार नावाचा एक गूढ प्रकाराची नेहमीच चर्चा होत असते. अमर सिंह हे अशा घोडेबाजारात निष्णात होते, असेही बोलले जात असे. २००८ मध्ये गाजलेल्या, नोट फॉर वोट प्रकरणात त्यांच्यावर खासदारांच्या खरेदीचा आरोप झाला होता, आणि त्यांना तुरुंगवारीही करावी लागली होती, पण अमरसिंह यांना किंगमेकर म्हणून आणखी एक ओळख मिळाली...
अमरसिंह यांचे सर्वपक्षीय मैत्र हे अखेरपर्यंत सामान्यांसाठी गूढच राहिले. मोदींच्या एका सभेत समोरच्या रांगेत भगवे कपडे परिधान करून हजर असलेल्या अमर सिंह यांच्याकडे पाहात मोदींनी त्याचा उल्लेख केला होता. यांच्याकडे सगळ्यांचीच कुंडली आहे, ती योग्य वेळी ते बाहेर काढतील, असे मोदी म्हणाले, आणि अमर सिंह यांच्याभोवतीचे ते गूढ वलय अधिकच गहिरे झाले. अखेरच्या काही वर्षांत त्यांच्या राजकारणाचे रंगही बदलत गेले. आपली कोट्यवधींची संपत्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दान करून त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रालाच नव्हे, तर स्वतःच्या राजकीय कारकिर्दीलाही धक्का दिला, असे म्हटले जाते.

‘व्हिजन’वास!

सांप्रतकाळात करोनामुळे सारे काही ‘लाॅकडाऊन’ झालेले असल्याने दूरचित्रवाणीवरील मनोरंजन वाहिन्यांची मोठीच पंचाईत झाली असून अंतर’भान राखणे जरुरीचे झाल्यापासून चोखंदळ प्रेक्षकांना पाहता येतील अशा नवनव्या मनोरंजनाची निर्मितीही जवळपास ठप्प झाली आहे. अशा वेळी घरबसल्या मनोरंजनाचे माध्यम म्हणून अशा वाहिन्यांकडे पाहणाऱ्या प्रेक्षकांची निराशा होऊ नये व छोट्या पडद्यावरील मनोरंजन विश्वाच्या आकुंचनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढता यावी या स्पर्धात्मक साहजिक संधीचा लाभ उठविण्याचा विचार करून टेलिव्हिजनवरील वृत्तवाहिन्यांनी आपापल्या प्रसारणात बदल करण्यास सुरुवात करावी हे काळानुरूपच ठरते. मनोरंजन आणि माहिती यांचा मिलाफ असे वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांचे स्वरूप असावे अशी माहितीची आंस असलेल्या प्रेक्षकांचाही अपेक्षा असली तरी सध्या घरबसलेपणाच्या काळात मनोरंजन ही प्राधान्याची गरज आहे हे काही वृत्तवाहिन्यांनी बरोबर ओळखले आहे. तथापि, आपण मनोरंजन करीत नसून माहितीलाच प्राधान्य देतो असा आभास निर्माण करणे हे वृत्तवाहिन्यांच्या संपादकरूपी नेपथ्यकाराचे खरे कौशल्य असते. यामुळे होते असे, की, अशा वाहिन्यांना दोन्ही प्रकारांतील प्रेक्षक मिळतात. ज्यांना मनोरंजन म्हणून अशा कार्यक्रमांकडे पाहावयाचे असते, ते त्या निखळ दृष्टिकोनातून कार्यक्रम पाहतातच, पण जे माहितीसाठी आसुसलेले असतात, ते मात्र, मनोरजनातून माहिती मिळेलच या अपेक्षेने अखेरपर्यंत असे कार्यक्रम पाहतात.
मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे एक बरे असते. त्यातून काहीही मनोरंजनात्मक मिळाले नाही तर त्याचा प्रेक्षक निराश होत नाही. ‘टाईमपास झाला’ असा विचार करून रिकामा वेळ कसातरी घालविल्याच्या समाधानात पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. ज्यांना माहिती हवी असते, ते मात्र अनेकदा निराश होऊन, पुढच्या कार्यक्रमात तरी माहिती मिळेल या अपेक्षेने टीव्हीसमोर बसतात. ही एक प्रकारे निराशा पचविण्याची कसोटीच असली तरी माहिती मिळविण्याची आसक्ती एवढी प्रबळ असते, की त्यापुढे ते नाराश्यदेखील कस्पटासमान ठरते.
प्रेक्षकांची हीच मानसिकता नेमकी ओळखून सध्याच्या काळात ज्यांची गरज आहे असे कार्यक्रम आखणे हे एक प्रकारे ‘व्हिजन’ असते. वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहताना थोडे खोलात जाऊन प्रत्येक कार्यक्रमाचे विश्लेषण केले, तर या ‘व्हिजन’ मागील ‘दृष्टी’ अंधुकपणे दिसू शकते.
मनोरंजन वाहिन्यांची जागा वृत्तवाहिन्या व्यापतील अशी शंका आधीपासूनच माध्यविश्वात व्यक्त होत होती, आता ती वास्तवात येऊ लागली आहे.
कारण, एकूणातच, माध्यमविश्व हे ‘व्हिजनरी’ असावेच लागते!