Friday, July 31, 2020

हाच का सन्मान?

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार लोकशाहीवादी आहे, हे आता पुन्हा सिद्ध झाले.
ते होणार याची कुजबूज गेल्या चारसहा महिन्यांपासून मंत्रालयाच्या परिसरात सुरू होतीच.
लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा आता खऱ्या अर्थाने आगळ्या पद्धतीने यथोचित सन्मान झाला आहे. फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत सुरू झालेली सन्मानवृत्ती बंद करून करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक चणचणीवर मात करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे. १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान/गौरव करण्यासाठी त्यांना मासिक सन्मानवृत्ती देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता.
अर्थात त्या वेळी तुरुंगवास भोगलेल्या सर्व योद्ध्यांनी या योजनेचा लाभ उकळलेला नाही. आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी आंदोलन करून तुरुंगवास भोगलेल्या हयात व्यक्तींपैकी ज्यांना खरोखरीच गरज आहे अशा गरजवंतांनी सरकारकडे अर्ज करून आणूबाणीविरोधी लढ्यात लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी तुरुंगवास भोगल्याचे सप्रमाण पुरावेही सादर केले होते अशा व सध्या मानधन मिळाल्याने जगण्यास हातभार लागेल अशा गरजू व्यक्तींना दरमहा सुमारे दहा हजार तर त्यांच्या विधवा पत्नींना पाच हजार रुपये सन्मानवृत्ती देण्याच्या फडणवीस सरकारने सुरू केलेल्या योजनेला लगाम घालून करोनावर मात करण्याकरिता आर्थिक रसद उभी करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे.
आणीबाणीच्या काळातील आंदोलन हा 'लोकशाहीकरिता लढा' होता. अशा लढवय्यांची सन्मानवृत्ती थांबविण्याचा निर्णय जारी करणाऱ्या आदेशातही ठाकरे सरकारने तसाच उल्लेखही केला आहे. त्यांंची सन्मानवृत्ती थांबवून वाचणाऱ्या जेमतेम काही कोटींमुळे करोनाविरोधी लढाईमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला विपरीत परिणाम भरून काढून तिजोरीची दुरवस्था दूर करणे शक्य होईल, असे ठाकरे सरकारला वाटते. किंबहुना, तसे करण्याकरिता हा निर्णय म्हणजे प्रभावी उपाययोजना ठरेल, असेही ठाकरे सरकारचे मत आहे.
ही सन्मानवृत्ती बंद करण्यासंबंधीचा निर्णय घेणे किंवा आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय वा योजनांना कात्री लावणे हा सर्वस्वी सरकारचा अधिकार असतो, हे खरे आहे. आणीबाणीविरोधी आंदोलकांची सन्मानवृत्ती थांबविण्याचा निर्णयही त्या अधिकारातून घेतला, तर त्यातही काही गैर नाही.
मात्र, फडणवीस सरकारने सन्मानवृत्ती मंजूर केलेल्या या व्यक्तीनी लोकशाहीसाठी लढा दिला होता हे ठाकरे सरकार जाणते.
मानधन थांबविण्याबाबत जारी केलेल्या ताज्या शासन निर्णयातही ठाकरे सरकारने तसे नमूद केले आहे.
म्हणूनच, ठाकरे सरकार लोकशाहीवादी आहे, ही बाब अधोरेखित करणे गरजेचे आहे.
***
“राज्यातील सरकार हे आणिबाणीचे समर्थक असल्यानेच त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी कार्यरत संघर्षशील व्यक्तिमत्त्वांची मानधन योजना बंद केली आहे. या देशातील लोकशाही धोक्यात आली, तेव्हा त्याच्या रक्षणार्थ अनेकांनी संघर्ष केला आणि देशात लोकशाही हक्कांचे संरक्षण केले. या सरकारकडे
मंत्र्यांसाठी वाहने घेण्यासाठी पैसे आहेत. अन्यही कारणांसाठी पैसे आहेत. पण, लोकशाहीचे रक्षण करणार्‍यांना मानधन द्यायला पैसे नाहीत. आमचे सरकार आल्यावर आम्ही ही योजना पुन्हा सुरू करू.” - देवेंद्र फडणवीस
***

Thursday, July 9, 2020

काँग्रेसचे 'नवबंधन'!

नगर जिल्ह्याच्या पारनेरमधील पाच शिवबंधनधारी सैनिकांचे स्थलांतर आणि नंतरच्या नाराजीनाट्यानंतर झालेली घर वापसी हे सध्याच्या सर्वत्र माजलेल्या अनिश्चिततेचे प्रतिबिंब ठरले. अन्यथा,  पवित्र शिवबंधनाची गाठ तोडून त्यांनी दुसरा घरोबा करण्याचे धाडस केले नसते. एकाच तंबूत असताना इकडून तिकडे जाणे म्हणजे, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असाच प्रकार आहे, हे माहीत असूनही शिवसेनेचे पाच मावळे बारामतीच्या सावलीत दाखल झाले, आणि पारनेरसारख्या गावातील स्थानिक राजकारणाने थेट राज्याच्या सत्तास्थानालाच हादरा बसला.  

सारेजण एकाच होडीतून प्रवास करत असताना, या पाचजणांनी शिवबंधनाचा धागा तोडून थेट राष्ट्रवादीच्या सावलीत दाखल होणे ही वरवर वाटते तेवढी साधी घटना नाही. कारण सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या सावलीतून शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार कारभार करत आहे. काँग्रेस हे या सत्तेच्या खेळातलं कच्चं लिंबू आहे. राज्यातील या खेळात काँग्रेसला फारसा भाव नाही. पण अशी वेळ केव्हाही कोणावरही येऊ शकते, याची गंभीर जाणीव मात्र या प्रकरणाआधीच काँग्रेसला झाली असावी. 

अशा प्रसंगात भावनिक धागेदेखील तटातट तुटू शकतात, म्हणून पक्षजनांना घट्ट धरून ठेवता येईल, असा एक 'नवबंधन धागा' काँग्रेसने विकसित केला आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे आधुनिक तंत्राचा वापर करून आपल्या माणसांनी तंबूबाहेर जाऊ नये यासाठी काहीतरी केले पाहिजे, यावर खल सुरू होता, आणि एक नवी शक्कल समोर आली...

जंगलातील प्राण्यांच्या हालचालींवर पाळत ठेवावी लागते. ते कुठे जातात, काय करतात, काय खातात, कोणाबरोबर भांडतात आणि कोणाशी लगट करतात, हे सारे कळावे यासाठी त्यांच्या गळ्यात जीपीएस प्रणालीचा पट्टा अडकविला जातो. ही शक्कल काही नवी नाही. जेथे स्थलांतराची शक्यता अधिक असते, तेथे अशी पाळत ठेवावीच लागते.  

नेमकी हीच युक्ती काँग्रेसला सुचली, आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या गळ्यात जीपीएस प्रणालीचा पट्टा अडकविण्याचे काँग्रेसने ठरविले. या मोहिमेची सुरुवात कर्नाटकातून झाली आहे. 

कर्नाटकातील काँग्रेस कार्यकर्त्याच्या गळ्यात असा जीपीएस प्रणालीचा पट्टा अडकविण्यात येणार आहे. यामुळे आपला कार्यकर्ता कोठे जातो, कोणासोबत ऊठबस करतो, काय करतो याची सारी खबरबात तंत्रज्ञानाच्या साह्याने एकत्र करणे काँग्रेसला शक्य होणार आहे. अलीकडेच कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले डी. के शिवकुमार - फोडाफोडीचे जाणकार म्हणून त्यांचा लौकिक आहे असे म्हणतात-  यांनी तसे फर्मान जारी केले आहे. 

पट्टेवाल्या कार्यकर्त्यांमुळे काँग्रेस अधिक मजबूत होईल, असा शिवकुमार यांचा विश्वास आहे. पक्षाने आता डिजिटल तंत्रज्ञान वापरले पाहिजे, आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे त्यांनी पदभार स्वीकारतानाच, गेल्याच आठवड्यात आयोजित प्रतिज्ञा दिन कार्यक्रमात जाहीर केले होते. राज्यातील ३० जिल्हे, ४६२ तालुके आणि सहा हजारांहून अधिक ग्रामपंचायत क्षेत्रांतील पक्ष कार्यकर्त्यांना पक्षासोबत बांधूनठेवण्याचा हा अभिनव प्रयोग शिवबंधन प्रयोगाहूनही अभिनव असा ठरणार अशी चर्चा आहे...


Saturday, July 4, 2020

भविष्य वाचविण्यासाठी...



संकटे कधीच एकटी येत नाहीत असे म्हणतात. एका मोठ्या संकटासोबत त्याला बिलगलेली शेकडो संकटे आसपास संचार करत असतात. महापूर, वादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्या की लगेचच रोगराई सुरू होते. साथीचे आजार फैलावतात, आणि मोठ्या संकटातून बचावलेल्यांसमोर जगण्याचे नवे आव्हान उभे राहते. करोनाभोवतीदेखील अशा हजारो संकटांच्या सावल्या विक्राळपणे पसरलेल्या असल्याने, ही जीवघेणी साथ आटोक्यात आली, तरी त्यानंतरचे जगाचे भविष्य कसे असेल व त्याला विळख्या घालणाऱ्या इतर संकटांतून माणसाला कसे वाचवायचे या चिंतेने जगाची झोप आत्ताच उडाली आहे.
करोनाची साथ दिवसागणिक भयाण होत असून ती आटोक्यात येण्याची कोणतीच चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. या संकटाने संपूर्ण जगाची शांतताच धोक्यात आली असून माणसाच्या सहनशक्तीची कसोटी सुरू झाली आहे. त्यामुळे, लोकांचे जीव वाचविण्याबरोबरच, लोकांचा भविष्यकाळ सुरक्षित करणे हेदेखील सध्याचे मोठे आव्हान ठरले आहे. संयुक्त राष्ट्रसंघास सध्या याच आव्हानाच्या चिंतेने ग्रासले आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीनंतरच्या प्रसिद्धी पत्रकात या भीतीचे प्रतिबिंब दिसते. करोनाचा फटका एवढा तीव्र असेल, की वर्षअखेरीस जगभरातील तेरा कोटी लोकसंख्येस उपासमारीचे संकट झेलावे लागेल, असा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे. करोनाच्या संसर्गाची साखळी तोडून आजारमुक्तीसाठी अमलात आणल्या जाणाऱ्या टाळेबंदीचे दुष्परिणामही यानंतर दिसू लागणार असून गोवर आणि पोलियोच्या साथीचे नवे संकट यातून उद्भवू शकते अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एन्टोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. सर्वसाधारणपणे ज्या देशात सध्या स्थैर्य आहे, अशा देशांनादेखील या दुष्परिणामांचे चटके बसू शकतात. अशा संकटांमुळे मानसिक स्थैर्य बिघडते, सामाजिक आणि आर्थिक समस्या तीव्र होतात, तणाव वाढतो व हिंसाचारासारख्या घटनादेखील घडू शकतात. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्याच्या प्रयत्नांबरोबरच, त्यासोबत येऊ घातलेल्या या संकटांशी मुकाबला करण्याची तयारी व आखणीदेखील जगाला अगोदरच करावी लागणार आहे. सध्या तरी अशी तयारी सुरू झालेली दिसत नाही, अशी भावना या पत्रकात व्यक्त झाली आहे. शांततेची प्रक्रियाच विस्कळीत झाली आहे, त्यामुळे या आघाडीवरील जागतिक स्तरावरील कामदेखील थंडावले आहे. याचा परिणाम म्हणून दहशतवादी आणि अतिरेकी संघटनांच्या कारवायांना ऊत येईल, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे.
अगोदरच समस्यांनी ग्रासलेल्या देशांना या संकटांचे चटके बसण्यास आता सुरुवात झाली आहे. इमो हे नायजेरियातील ३६ राज्यांपैकी एक राज्य. जेमतेम साडेपाच हजार चौरस कि.मी. क्षेत्रफळाच्या या राज्याची लोकसंख्या सुमारे ५० लाखांच्या आसपास आहे. शेती आणि व्यापार- पाम तेलाचे उत्पादन ही या राज्याच्या उत्पन्नाची मुख्य साधने असली, तरी आज तेथील परिस्थिती चांगली नाही. गेल्या चार महिन्यांपासून येथील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. इमोच्या राजधानीच्या शहरात असे शेकडो ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर ठाण मांडून आपल्या समस्येकडे लक्ष वेधताना दिसतात. उपासमारी आणि भुकेमुळे त्यांच्या अंगात निषेधाच्या घोषणा देण्याचीही ताकद उरलेली नाही. अलीकडच्या काळात नायजेरियातील अन्य अनेक राज्यांतील ज्येष्ठ नागरिकांवर हीच वेळ ओढवली आहे. काही राज्यांमधअये तर गेल्या अडीच वर्षांपासून निवृत्तीवेतन न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना जगण्याचीच भ्रांत निर्माण झाली आहे.
नायजेरियामध्ये ज्येष्ठांची ही स्थिती, तर, अगोदरच सततच्या युद्धाच्या सावटामुळे पुरते खिळखिळे झालेल्या  येमेनमध्ये करोनाच्या संकटाची भर पडल्याने तेथील लाखो बालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. कोणत्याही संकटात, दुर्बल आणि संरक्षणासाठी इतरांवर अवलंबून असलेल्यांनाच संकटाचे चटके अगोदर सोसावे लागतात. नायजेरियातील बालकांवर ओढवलेल्या कुपोषणाच्या संकटामुळे सध्या सारे जग हळहळते आहे. या बालकांवर मृत्यूने दाट सावट धरले आहे. या वर्षाअखेर येमेनमधील सुमारे पंचवीस लाख मुले उपासमारीची शिकार होतील, असा युनिसेफचा अंदाज असून, या संकटातून सोडविण्यासाठी जगाने पुढे यावे अशी हाक युनिसेफने दिली आहे. करोनामुळे येमेनची अर्थव्यवस्था पुरती खिळखिळी झाल्याने वर्षअखेरीसपर्यंत आणखी सुमारे सहा लाख बालके उपासमारीमुळे मृत्यूच्या खाईत ढकलली जातील, असा भीषण अंदाज युनिसेफने वर्तविला आहे. गेल्या पाच वर्षांच्या युद्धकाळात या देशातील किती बालकांचा मृत्यू झाला, त्याला गणतीच नाही. आता त्यात करोनाची भर पडली आहे.
संकटांच्या या सावटामुळे जगभरातील कळ्या उमलण्याआधीच कोमेजून जाणार असल्याने, त्या वाचविण्यासाठी जगाने संकटापलीकडच्या भविष्यकाळावर आजच लक्ष देण्याची गरज आहे.
दिनेश गुणे
dineshgune@gmail.com