नर्स हा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे, हे या साथीने आज दाखवून दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्याा अहवालानुसार, आज जगभरात नर्सेसची संख्या केवळ दोन कोटी ८० लाख एवढी आहे. आणि प्रत्यक्षात ६० लाख नर्सेसचा तुटवडा आहे.
येत्या दशकभरात यापैकी दहा टक्के नर्सेस सेवानिवृत्त होतील, तेव्हा ही तफावत अधिकच जाणवेल. कारण नव्याने या क्षेत्रात दाखल होणाऱ्यांची संख्या खूपच संथ आहे.
विशेष म्हणजे, नर्सिंग हे क्षेत्र महिलांसाठीच असल्याचा जागतिक समज आहे. आज जगभरात या क्षेत्रात ९० टक्के महिलाच आहेत.भारतातही जेमतेम १२ टक्के पुरुष या व्यवसायात आहेत.
या पार्श्वभूमीवर, भारतातील या क्षेत्राची स्थिती काळजी वाटावी अशीच दिसते. १३६ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील परिचारिकांची संख्या केवळ २३ लाख ३६ हजार २०० एवढीच आहे. याचा अर्थ, प्रत्येक दहा हजार लोकसंख्येमागे, १७.३ एवढीच परिचारिकांची संख्या आहे.दर वर्षी देशात सुमारे ३ लाख २३ हजार परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात, आणि दहा टक्के परिचारिका निवृत्त होऊन व्यवसायाबाहेर जातात. या हिशेबाने, येत्या दहा वर्षांत भारतात परिचारिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या जेमतेम ३० लाखांपर्यंत वाढलेली असेल, असा अंदाज आहे.
भारताच्या आरोग्य क्षेत्राचे एकूण आकारमान लोकसंख्येच्या प्रमाणात जेमतेमच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार आरोग्य क्षेत्रात परिचारिकांची संख्या या क्षेत्राच्या एकूण पसाऱ्यापैकी ४७ टक्के आहे, तर वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या जेमतेम २३.३० टक्के आहे. दंतवैद्यकांचे प्रमाण तर केवळ साडेपाच टक्के एवढेच आहे, आणि मिडवाईफ नावाचा प्रकार शोधावाच लागेल अशी स्थिती आहे.
करोना व्हायरसच्या फैलावामुळे संपूर्ण जगासमोरील एक मोठी समस्या अधोरेखित झाली आहे. यापुढे ही समस्या दुर्लक्षित राहिली, तर करोनाव्हायरसने मानवजातीला इशारा देऊनही आपण शहाणपण शिकलो नाही, असे होईल. जगभरातील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणे ही यापुढील काळाची गरज राहील.
सध्या ज्या ईर्ष्येने जगभरातील परिचारिका करोनाविरुद्धच्या युद्धाचे नेतृत्व करत आहेत, त्याबद्दल जग त्यांचे ऋणी आहे. भविष्यात या लढाईचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा परिचारिकांच्या कर्तृत्वाचे पहिले पान सोनेरी असेल!
दिनेश,तू थर्ड आय ने जे पाहतोस ते अनेकांना दोन डोळ्यांनी दिसत नाही.असेच भरपूर आणि सकस लिहीत रहा.
ReplyDelete