Wednesday, May 13, 2020

एक जीवघेणी हातमिळवणी...


किती जीव घेतल्यानंतर करोनाचा कहर संपेल, मुळात तो संपणार आहे की नाही, अशा भयचिन्हांचे भाव माणसामाणसाच्या मनावर उमटले असताना, आजवर असंख्य जीवघेण्या सवयी आपण प्रेमाने सोबत बाळगल्या याचे मात्र भान राहिलेले नाही. वर्षाकाठी लाखो बळी घेणाऱ्या व्यसनांच्या विळख्यातून मुक्त झाले नाही, तर ही व्यसनेच करोनाचे काम सोपे करण्यास मदत करतील हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आणि दारू, हा अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार मानला जात असल्याने, जेव्हाजेव्हा अर्थव्यवस्थेस घरघर लागते, तेव्हातेव्हा या आधाराचे दरवाजे अधिक उघडले जातात. करोनाकाळात दारूविक्रीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या गदारोळाने हे सिद्ध केले आहे. दारू आणि तंबाखू ही हातात हात घालून वावरणारी व्यसने असल्याने, दारूसोबत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची बाजारपेठही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरसावणार हे स्पष्ट आहे. म्हणूनच, याच निमित्ताने तंबाखूच्या विळख्याचा मागोवा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
एका अधिकृत आकडेवारीनुसार, जगभरात तंबाखूमुळे वर्षाकाठी ८० लाख लोकांचा मृत्यू ओढवतो. ही अंगावर शहारे आणणारी वस्तुस्थिती आहेच, पण तंबाखूजन्य धूम्रपानाच्या अप्रत्यक्ष संसर्गामुळे बारा लाख लोकांना अकारण मृत्यूचे सावज व्हावे लागते, ही त्याहूनही अधिक भयानक बाब आहे. तंबाखूचे व्यसन हे स्वस्थ श्वसनक्रियेसमोरील मोठा अडथळा आहे, हे आता या व्यसनाच्या विळख्यात स्वतःस गुंतवून घेतलेल्यासही ठाऊक झालेले आहे. तंबाखूमुळे श्वसनविकार बळावतात, त्यामुळे तंबाखूचे किंवा धूम्रपानाचे व्यसन असलेल्या व्यक्तीना करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या अलीकडच्या पाहणीतूनच स्पष्ट झाले आहे. कोव्हिड-१९ हा श्वसनक्रियेवर आघात करणारा व फुफ्फुसे निकामी करणारा संसर्गजन्य आजार आहे, आणि धूम्रपानामुळे या आजाराशी संघर्ष करण्याची क्षमता कमकुवत होते. त्यामुळे या आजारापासून स्वतःस वाचवायचे असेल, तर धूम्रपान आणि तंबाखू सेवनापासून दूर राहावयास हवे. माध्यमांनी यासाठीच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. तंबाखू किंवा धूम्रपानमुक्तीसाठी काही पर्यायी उपचारपद्धती उपयुक्त ठरू लागल्या आहेत. त्याचा अवलंब करून किंवा मानसिक निर्धार करून तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होणे ही करोनाविरोधी लढ्याची मोठी गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी पुढाकार घेतला असून जागृती व व्यसनमुक्तीसाठी सहकार्य करणारी यंत्रणादेखील उभी केली आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आणि त्याच्या परिणामांची दाहकता, उपाययोजना आदींच्या माहितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचा हा अभ्यास उपयुक्त ठरेल. 


No comments:

Post a Comment