Saturday, May 16, 2020

कुठे ठेवायची एवढी संपत्ती?...

असं म्हणतात, की मनुष्यबळ ही संपत्ती आहे. खरं आहे ते. पण केवळ साठत जाणाऱ्या संपत्तीतून काही परतावा मिळायला हवा. त्यासाठी संपत्तीच्या गुंतवणुकीचे नियोजन करायला हवे. भारतासारख्या मनुष्यबळ संपन्न देशाचे चित्र काय आहे? संपत्ती साठत चालली आहे, तसतसे तिचे ओझे वाढत आहे. काही दशकांत असे होईल, की माणसाला जेमतेम स्वत:पुरती जागा (स्पेस) शोधण्यासाठी धडपडावं लागेल. कारण लोकसंख्या वाढते आहे, आणि तिला सामावून घेणारा भूभाग मात्र तितकाच राहणार आहे.
अशा स्थितीत, मनुष्यबळ संपत्तीचे नियोजन ही समस्या उभी राहणार आहे.
काय आहे या संपत्तीचे वर्तमानातील वास्तव?
***
कोणताही सिद्धान्त सिद्ध होण्यासाठी एक अट असते. ‘इतर परिस्थिती सामान्य असेल तर’... ही ती अट. म्हणजे, सारे काही सुरळीत, जगरहाटीनुसार सुरू असेल, तरच कोणत्याही शास्त्राचे सिद्धान्त खरे ठरतात. कारण असे सिद्धान्त हे पूर्वानुभवाच्या आणि वर्तमानातील सुरळीत स्थितीच्या आधारावरच मांडले जात असतात. म्हणजे, अघटित किंवा अनपेक्षित परिस्थितीत प्रस्थापित सिद्धान्त सार्थ ठरत नाहीत.
म्हणूनच, जागतिक लोकसंख्यावाढीच्या आजवरच्या गणिती सिद्धान्तांच्या आधारावर येत्या काही दशकांत मांडले गेलेले भविष्यातील लोकसंख्येचे आकडे किती खरे ठरतील, हा मुद्दा महत्वाचा आहे. जागतिक लोकसंख्यावाढीचा गेल्या दोन हजार वर्षांचा किंवा त्याआधीचा इतिहास, गेल्या काही दशकांमध्ये त्यामध्ये होणारे चढउतार आणि त्यांच्या आधारावर वर्तविण्यात आलेली जगाच्या लोकसंख्येची आगामी भाकिते लक्षात घेतली, तर आज ७७८ कोटींच्या घरात असलेल्या जगाच्या लोकसंख्येने येत्या तीस वर्षांत, २०५० पर्यंत, एक हजार कोटींचा आकडा पार केलेला असेल. जगाच्या लोकसंख्येपैकी तब्बल १७.७ टक्के लोकसंख्या असलेला भारत हा चीनपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. आजवरच्या भारताचा लोकसंख्यावाढीच्या संख्याशास्त्रानुसार, येत्या तीन दशकांत, लोकसंख्यावाढीचा आजवरचा वेग मंदावणार असला तरी, सन २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १६४ कोटींवर पोहोचलेली असेल, आणि भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असेल. आज देशातील दर चौरस किलोमीटर क्षेत्रात ४६४ लोकसंख्या राहते. येत्या तीस वर्षांत लोकसंख्यावाढीमुळे ही दाटी अधिकच गडद होणार असून, २०५० मध्ये लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरमागे ५५१ इतकी असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
जागतिक पातळीवरील विविध क्षेत्रांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या वर्ल्डओमीटर नावाच्या अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय समूहाकडून लोकसंख्येचा जवळपास प्रत्येक क्षणाचा तपशील गोळा केला जातो. या समूहाच्या नोंदीनुसार, ख्रिस्तपूर्व आठ हजार साली जेमतेम ५० लाख लोकसंख्या असलेल्या मानवजातीस शेतीचे तंत्र अवगत होत गेले आणि लोकसंख्यावाढीचा वेग वाढत गेला. पहिल्या इसवी सनात २० कोटींपर्यंत लोकसंख्या असलेल्या जगातील मानवजातीच्या प्रगतीचा वेग आणि लोकसंख्यावाढीचा वेग जवळपास सारखाच राहिला. सन १८०० मध्ये १०० कोटींचा टप्पा गाठला गेला, आणि पुढे १९३० पर्यंतच्या जेमतेन १३० वर्षांत लोकसंख्येने दोनशे कोटींची मजल मारली. पुढे केवळ ३० वर्षांतच जगाच्या लोकसंख्येने दुपटीचा टप्पा गाठला, आणि नंतर दुपटीकडे झेपावण्याचा कालावधीही कमी होत गेला. १९८७ पर्यंत लोकसंख्येने ५०० कोटींची मजल मारली होती. आता मात्र हा वेग पुन्हा एकदा मंदावत चालला असून जगाच्या आजच्या लोकसंख्येने दुपटीचा, म्हणजे १५५० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी पुढील २०० वर्षांची वाटचाल करावी लागेल, असा या अभ्यासगटाचा अंदाज आहे.
जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या चीनची आजची लोकसंख्या १४३.८६ कोटी इतकी आहे. मात्र, लोकसंख्यावाढीचा वेग उणे करण्यावर चीनचा भर असल्याने, २०५० पर्यंत तेथील लोकसंख्या आजच्यापेक्षा कमी, म्हणजे १४० कोटींवर स्थिरावलेली असेल असा वर्ल्डओमीटर गटाचा अंदाज आहे. भारत आणि चीन या पहिल्या रांगेतील दोन देशांची तुलना केली, तर भारताचे भविष्य काहीसे भयावह वाटावे असे असेल. आज दर चौरस किलोमीटरमध्ये ४६४ एवढी लोकसंख्येची घनता असलेल्या भारतात जेव्हा ही गर्दी आणखी वाढेल, तेव्हा चीनकडील घनता मात्र, दर चौरस किलोमीटरमागे १५३ वरून १४९ पर्यंत कमी झालेली असेल.
परिस्थिती सामान्य राहिली, तर भविष्यातील भारताचे हे गर्दीचे चित्र आनंददायी असेल, की भयप्रद असेल याचा विचार करण्यासाठी या अभ्यास गटाचे हे संशोधन नक्कीच उपयोगी आहे.

No comments:

Post a Comment