Saturday, July 4, 2020

भविष्य वाचविण्यासाठी...



संकटे कधीच एकटी येत नाहीत असे म्हणतात. एका मोठ्या संकटासोबत त्याला बिलगलेली शेकडो संकटे आसपास संचार करत असतात. महापूर, वादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्या की लगेचच रोगराई सुरू होते. साथीचे आजार फैलावतात, आणि मोठ्या संकटातून बचावलेल्यांसमोर जगण्याचे नवे आव्हान उभे राहते. करोनाभोवतीदेखील अशा हजारो संकटांच्या सावल्या विक्राळपणे पसरलेल्या असल्याने, ही जीवघेणी साथ आटोक्यात आली, तरी त्यानंतरचे जगाचे भविष्य कसे असेल व त्याला विळख्या घालणाऱ्या इतर संकटांतून माणसाला कसे वाचवायचे या चिंतेने जगाची झोप आत्ताच उडाली आहे.
करोनाची साथ दिवसागणिक भयाण होत असून ती आटोक्यात येण्याची कोणतीच चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. या संकटाने संपूर्ण जगाची शांतताच धोक्यात आली असून माणसाच्या सहनशक्तीची कसोटी सुरू झाली आहे. त्यामुळे, लोकांचे जीव वाचविण्याबरोबरच, लोकांचा भविष्यकाळ सुरक्षित करणे हेदेखील सध्याचे मोठे आव्हान ठरले आहे. संयुक्त राष्ट्रसंघास सध्या याच आव्हानाच्या चिंतेने ग्रासले आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीनंतरच्या प्रसिद्धी पत्रकात या भीतीचे प्रतिबिंब दिसते. करोनाचा फटका एवढा तीव्र असेल, की वर्षअखेरीस जगभरातील तेरा कोटी लोकसंख्येस उपासमारीचे संकट झेलावे लागेल, असा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे. करोनाच्या संसर्गाची साखळी तोडून आजारमुक्तीसाठी अमलात आणल्या जाणाऱ्या टाळेबंदीचे दुष्परिणामही यानंतर दिसू लागणार असून गोवर आणि पोलियोच्या साथीचे नवे संकट यातून उद्भवू शकते अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एन्टोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. सर्वसाधारणपणे ज्या देशात सध्या स्थैर्य आहे, अशा देशांनादेखील या दुष्परिणामांचे चटके बसू शकतात. अशा संकटांमुळे मानसिक स्थैर्य बिघडते, सामाजिक आणि आर्थिक समस्या तीव्र होतात, तणाव वाढतो व हिंसाचारासारख्या घटनादेखील घडू शकतात. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्याच्या प्रयत्नांबरोबरच, त्यासोबत येऊ घातलेल्या या संकटांशी मुकाबला करण्याची तयारी व आखणीदेखील जगाला अगोदरच करावी लागणार आहे. सध्या तरी अशी तयारी सुरू झालेली दिसत नाही, अशी भावना या पत्रकात व्यक्त झाली आहे. शांततेची प्रक्रियाच विस्कळीत झाली आहे, त्यामुळे या आघाडीवरील जागतिक स्तरावरील कामदेखील थंडावले आहे. याचा परिणाम म्हणून दहशतवादी आणि अतिरेकी संघटनांच्या कारवायांना ऊत येईल, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे.
अगोदरच समस्यांनी ग्रासलेल्या देशांना या संकटांचे चटके बसण्यास आता सुरुवात झाली आहे. इमो हे नायजेरियातील ३६ राज्यांपैकी एक राज्य. जेमतेम साडेपाच हजार चौरस कि.मी. क्षेत्रफळाच्या या राज्याची लोकसंख्या सुमारे ५० लाखांच्या आसपास आहे. शेती आणि व्यापार- पाम तेलाचे उत्पादन ही या राज्याच्या उत्पन्नाची मुख्य साधने असली, तरी आज तेथील परिस्थिती चांगली नाही. गेल्या चार महिन्यांपासून येथील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. इमोच्या राजधानीच्या शहरात असे शेकडो ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर ठाण मांडून आपल्या समस्येकडे लक्ष वेधताना दिसतात. उपासमारी आणि भुकेमुळे त्यांच्या अंगात निषेधाच्या घोषणा देण्याचीही ताकद उरलेली नाही. अलीकडच्या काळात नायजेरियातील अन्य अनेक राज्यांतील ज्येष्ठ नागरिकांवर हीच वेळ ओढवली आहे. काही राज्यांमधअये तर गेल्या अडीच वर्षांपासून निवृत्तीवेतन न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना जगण्याचीच भ्रांत निर्माण झाली आहे.
नायजेरियामध्ये ज्येष्ठांची ही स्थिती, तर, अगोदरच सततच्या युद्धाच्या सावटामुळे पुरते खिळखिळे झालेल्या  येमेनमध्ये करोनाच्या संकटाची भर पडल्याने तेथील लाखो बालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. कोणत्याही संकटात, दुर्बल आणि संरक्षणासाठी इतरांवर अवलंबून असलेल्यांनाच संकटाचे चटके अगोदर सोसावे लागतात. नायजेरियातील बालकांवर ओढवलेल्या कुपोषणाच्या संकटामुळे सध्या सारे जग हळहळते आहे. या बालकांवर मृत्यूने दाट सावट धरले आहे. या वर्षाअखेर येमेनमधील सुमारे पंचवीस लाख मुले उपासमारीची शिकार होतील, असा युनिसेफचा अंदाज असून, या संकटातून सोडविण्यासाठी जगाने पुढे यावे अशी हाक युनिसेफने दिली आहे. करोनामुळे येमेनची अर्थव्यवस्था पुरती खिळखिळी झाल्याने वर्षअखेरीसपर्यंत आणखी सुमारे सहा लाख बालके उपासमारीमुळे मृत्यूच्या खाईत ढकलली जातील, असा भीषण अंदाज युनिसेफने वर्तविला आहे. गेल्या पाच वर्षांच्या युद्धकाळात या देशातील किती बालकांचा मृत्यू झाला, त्याला गणतीच नाही. आता त्यात करोनाची भर पडली आहे.
संकटांच्या या सावटामुळे जगभरातील कळ्या उमलण्याआधीच कोमेजून जाणार असल्याने, त्या वाचविण्यासाठी जगाने संकटापलीकडच्या भविष्यकाळावर आजच लक्ष देण्याची गरज आहे.
दिनेश गुणे
dineshgune@gmail.com

No comments:

Post a Comment