नगर जिल्ह्याच्या पारनेरमधील पाच शिवबंधनधारी सैनिकांचे स्थलांतर आणि नंतरच्या नाराजीनाट्यानंतर
झालेली घर वापसी हे सध्याच्या सर्वत्र माजलेल्या अनिश्चिततेचे प्रतिबिंब ठरले. अन्यथा, पवित्र शिवबंधनाची गाठ तोडून त्यांनी दुसरा घरोबा करण्याचे धाडस केले नसते. एकाच तंबूत असताना इकडून तिकडे जाणे म्हणजे, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात
असाच प्रकार आहे, हे माहीत असूनही शिवसेनेचे पाच मावळे बारामतीच्या सावलीत दाखल
झाले, आणि पारनेरसारख्या गावातील स्थानिक राजकारणाने थेट राज्याच्या
सत्तास्थानालाच हादरा बसला.
सारेजण एकाच होडीतून प्रवास करत असताना, या पाचजणांनी शिवबंधनाचा धागा तोडून थेट
राष्ट्रवादीच्या सावलीत दाखल होणे ही वरवर वाटते तेवढी साधी घटना नाही. कारण सध्या
महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या सावलीतून शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार कारभार करत
आहे. काँग्रेस हे या सत्तेच्या खेळातलं कच्चं लिंबू आहे. राज्यातील या खेळात
काँग्रेसला फारसा भाव नाही. पण अशी वेळ केव्हाही कोणावरही येऊ शकते, याची गंभीर
जाणीव मात्र या प्रकरणाआधीच काँग्रेसला झाली असावी.
अशा प्रसंगात भावनिक धागेदेखील तटातट तुटू शकतात, म्हणून पक्षजनांना घट्ट धरून
ठेवता येईल, असा एक 'नवबंधन धागा' काँग्रेसने विकसित केला आहे. सध्या तंत्रज्ञानाचे
युग असल्यामुळे आधुनिक तंत्राचा वापर करून आपल्या माणसांनी तंबूबाहेर जाऊ नये
यासाठी काहीतरी केले पाहिजे, यावर खल सुरू होता, आणि एक नवी शक्कल समोर आली...
जंगलातील
प्राण्यांच्या हालचालींवर पाळत ठेवावी लागते. ते कुठे जातात, काय
करतात, काय खातात, कोणाबरोबर भांडतात आणि कोणाशी लगट करतात, हे सारे कळावे यासाठी
त्यांच्या गळ्यात जीपीएस प्रणालीचा पट्टा अडकविला जातो. ही शक्कल काही नवी नाही. जेथे स्थलांतराची शक्यता अधिक असते, तेथे अशी पाळत ठेवावीच लागते.
नेमकी हीच
युक्ती काँग्रेसला सुचली, आणि पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या गळ्यात जीपीएस
प्रणालीचा पट्टा अडकविण्याचे काँग्रेसने ठरविले. या मोहिमेची सुरुवात कर्नाटकातून झाली
आहे.
कर्नाटकातील काँग्रेस कार्यकर्त्याच्या गळ्यात असा जीपीएस प्रणालीचा पट्टा अडकविण्यात येणार आहे. यामुळे आपला कार्यकर्ता
कोठे जातो, कोणासोबत ऊठबस करतो, काय करतो याची सारी खबरबात तंत्रज्ञानाच्या
साह्याने एकत्र करणे काँग्रेसला शक्य होणार आहे. अलीकडेच कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदी
विराजमान झालेले डी. के शिवकुमार - फोडाफोडीचे जाणकार म्हणून त्यांचा लौकिक आहे असे म्हणतात- यांनी तसे
फर्मान जारी केले आहे.
पट्टेवाल्या कार्यकर्त्यांमुळे काँग्रेस
अधिक मजबूत होईल, असा शिवकुमार यांचा विश्वास आहे. पक्षाने आता डिजिटल तंत्रज्ञान
वापरले पाहिजे, आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे,
असे त्यांनी पदभार स्वीकारतानाच, गेल्याच आठवड्यात आयोजित प्रतिज्ञा दिन
कार्यक्रमात जाहीर केले होते. राज्यातील ३० जिल्हे, ४६२ तालुके आणि सहा हजारांहून
अधिक ग्रामपंचायत क्षेत्रांतील पक्ष कार्यकर्त्यांना पक्षासोबत ‘बांधून’ ठेवण्याचा हा अभिनव प्रयोग ‘शिवबंधन’
प्रयोगाहूनही अभिनव असा ठरणार अशी चर्चा आहे...
जीपीएस म्हणजे गांधी परिवार सिमकार्ड का?
ReplyDeleteजीपीएस म्हणजे गांधी परिवार सिमकार्ड का?
ReplyDelete