Sunday, September 20, 2020

एका शुद्ध 'श्वासा'साठी...

 


एक जुना प्रसंग आठवला. हॉस्पिटलमध्ये एका मित्राची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. कसल्याशा ऑपरेशननंतर त्याची तब्येत सुधारत होती. आम्ही इकडच्यातिकडच्या गप्पा मारत होतो. मित्र खुशीत होता. आता दोनचार दिवसांतच डिस्चार्ज मिळाला की कोकणातल्या गावाकडे जाऊन महिनाभर मस्त आराम करायचा, तब्येत सुधारली की पुन्हा मुंबईत येऊन कामाला लागायचं, असं काहीकाही प्लॅन केलेलं मला सांगू लागला, आणि आम्ही दोघंही त्या गप्पांचा धागा पकडून कोकणातल्या गावात पोहोचलो. जुन्या आठवणी, जंगलातली भटकंती, मस्त हवापाणी, भेसळमुक्त गावठी अन्नावर मारलेला भरपेट ताव आणि भरल्या पोटी मारलेली लांबवरची रपेट, सारं काही आठवणीतून जिवंत झालं, आणि आम्ही त्या क्षणापुरतं मुंबईतलं आमचं अस्तित्व विसरलो.
अशाच गप्पा रंगलेल्या असताना, अचानक रूममध्ये चारपाच जणांचा घोळका घुसला, आणि अगोदरच फुललेलं वातावरण बहरलं. गावाकडून त्याला भेटण्यासाठी मित्र आले होते. मग त्याच गप्पांचा ओघ आणखी प्रवाही झाला. जुन्या आठवणींना नव्या घडामोडींची जोड मिळाली. गावाकडची लफडी, कुलंगडी, कोण गेला, कोण आला, ती सध्या काय करते, तो हल्ली कुठे असतो... वगैरे सारं काही उलगडत गेलं, आणि हॉस्पिटलमधली ती खोली अक्षरशः टाईमपासचा अड्डा झाली...
अशाच गप्पा रंगलेल्या असताना, त्या मित्रांपैकी एकाची नजर अचानक बेडच्या उशीपर्यंत पोहोचलेल्या नळाएवढ्या पाईपलाईनकडे गेली. त्याच्या डोळ्यात कुतूहल उमटले, आणि न राहवून त्याचे विचारलं, 'हा नळ कसला रे... हितं काय बसल्याबसल्या नळाचं पाणी भरायची सोय हाय काय?'..
बेडवरचा पेशंट खळाळून हसला... 'बाबा रे, ती ऑक्सिजनची नळी आहे. कधीकधी पेशंटला ऑक्सिजनची तातडीची गरज लागली, की नाकाला लावायला हाच ऑक्सिजन वापरतात... '
गावाकडच्या मित्राच्या डोळ्यातलं कुतूहल आणखी गडद झालं.
त्या पाईपकडे अनिमिष नेत्रांनी पाहात त्याने निरागसपणे विचारलं, 'जरा मिनिटभर मी पण नाकाला लावू काय? मुंबईत आल्यापास्नं जीव निस्ता घुसमटून गेलाय. थोडी गावाकडल्यासारखी हवा छातीत भरून घेतो...'
पुन्हा खोलीत हास्याचे ताजेतवाने फवारे उसळले, आणि मी उगीचच अंतर्मुख झालो.
मुंबईच्या विदारक प्रदूषणाचं भयाण चित्र त्याच्या त्या एकाच प्रश्नात भेसूरपणे उमटून गेलं होतं.
मुंबईच्या हवेची पातळी आजकाल अनेक वर्तमानपत्रांत एका कोपऱ्यात वाचायला मिळते. राजकारण, कुरघोड्या, मारामाऱ्या, खून, बलात्कार, आत्महत्या, गुन्हेगारीच्या बातम्यातून त्या कोपऱ्याकडे किती नजरा रोज स्थिरावतात, हा प्रश्नच आहे. पण तो बोटभराचा चौकोन म्हणजे सगळ्या मुंबईवर डोळे वटारून बघणारा राक्षस असतो... प्रदूषणाची रोजची पातळी आणि हवेची शुद्धता यांचा एका लहानसा आलेख त्यात दिसतो. आपण प्रदूषणात एवढे आकंठ बुडालोय, की त्या चौकौनातल्या लाल-हिरव्या खुणांचे काही वाटेनासेच झाले आहे. मुंबईचा सर्वात प्रदूषित आणि कमी प्रदूषित पट्टा कोणता एवढेच त्यावरून कळते. प्रदूषणमुक्त पट्टा हे मुंबईकरांचे भविष्य नाही, हेच तो कोपरा रोज बजावत असतो...
गावाकडच्या त्या मित्राच्या त्या एका प्रश्नाने समोर वर्तमानपत्र नसतानाही तो कोपरा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला, आणि मी उगीचच अस्वस्थ झालो.
शुद्ध हवा हा मुंबईकराचा हक्क राहिलेलाच नाही.
आता तर, एका श्वासापुरत्या प्राणवायूसाठी माणसाला झगडायची वेळ आली आहे.
शुद्ध प्राणवायूचा एक श्वास माणसाच्या किंवा कोणत्याही जिवंत प्राण्याच्या जगणं आणि मरण्यातील कुंपणरेषा भक्कम करत असतो.
सध्या ती रेषाच धूसर, धुरकट होत चालली आहे. प्राणवायूच्या शोधात वणवण करताना माणसाची दमछाक होऊ लागली आहे, आणि त्या शोधाचा शेवट होईपर्यंत अखेरचा श्वासही सुटून जाऊ लागला आहे.
प्रदूषणाने ग्रासलेल्या मुंबईला आता कृत्रिम प्राणवायूची समस्याही भेडसावू लागली आहे. ऑक्सिजन सिलिंडर्स तुटवड्याच्या बातम्या दररोज भयाण रूप घेऊन माणसावर आदळू लागल्या आहेत.
भविष्यात पाण्यासाठी संघर्ष होतील, असे म्हटले जात होते.
आता तर, प्राणवायूच्या श्वासासाठी संघर्ष होईल अशी भयाण स्थिती समोर येऊ पाहात आहे.
... देशाच्या राजधानीत, दिल्लीत, प्रदूषणाचा कहर झाल्यावर, नवा उद्योग म्हणून अनेक ऑक्सिजन पार्लर्स सुरू झाल्याच्या बातम्या मागे येत होत्या. प्रदूषित हवेने भरलेल्या फुफ्फुसांना दिलासा देणारा शुद्ध प्राणवायूचा एखादा श्वास घेण्यासाठी पैसे मोजण्याची योजना तेथूनच आकाराला येऊ लागली होती.
गेल्या वर्षी डिसेंबरात, नाशिकच्या रेल्वे स्थानकावर एक ऑक्सिजन पार्लर सुरू झाले. प्राणवायूचे उत्सर्जन करणाऱ्या वनस्पतींनी भरलेली एक काचबंद खोली रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आली. प्रदूषणाने घुसमटलेल्या जिवांनी त्या खोलीत एक फेरफटका मारावा, आणि वनस्पतींनी उत्सर्जित केलेल्या प्राणवायूच्या श्वासाने छाती भरून ताजेतवाने व्हावे, ही त्यामागची कल्पना....
अशी पार्लर्स जागोजागी व्हावीत, अशी अपेक्षा त्या वेळी प्रवाशांनी व्यक्त केली होती. पुढे काय झाले, माहीत नाही.
नासिकचे ते पार्लरही अजून सुरू आहे किंवा नाही, कल्पना नाही.
आपण शुद्ध हवेसाठी आता फारसे गंभीर नाही, याचे पुरावे मात्र दिवसागणिक वाढत चाललेले असताना, आता प्राणवायूचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
हवेतला प्राणवायू श्वासून घेण्याची फुफ्फुसांची सवय प्रदूषणाने अगोदरच मोडून टाकलेली असल्याने, कमकुवत झालेल्या फुफ्फुसांना कृत्रिम प्राणवायूची गरज वाढू लागली आहे.
असे काही घडले, की पैसा मिळविण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या धंद्यांना बरकत येते. सध्या ऑनलाईन दुकानदारीत, बाटलीबंद ऑक्सिजनचा व्यापार तेजीत आहे, ते त्यामुळेच...
त्यातही, शुद्ध प्राणवायूची हमी देणारी आणि टक्केवारीनुसार शुद्धतेची पातळी दर्शविणारे ऑक्सिजन टीन्स आता बाजारात आले आहेत.
भविष्यात, पोर्टेबल ऑक्सिजन खिशात ठेवणे ही माणसाची गरज ठरेल, असे याआधी कधी कुणास वाटले नसेल.
आता ती वेळ आली आहे.
असे म्हणतात, की कोणताही सजीव, सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची स्वतःची क्षमता निर्माण करत असतो. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करण्याची त्याती शारीरिक क्षमता परिस्थितीनुरूप तयार होत असते.
याला सध्या हर्ड इम्युनिटी म्हणतात.
ऑक्सिजनविना जगण्याची सजीवाची क्षमता या परिमाणातून तयार होईल का?
तसे झाले, तर, प्राणवायूच्या नव्या बाजारपेठा फोफावणार कशा?

No comments:

Post a Comment