Monday, June 1, 2020

भाषेचे प्रदूषण...

असे म्हणतात, की ब्रिटीश संस्कृतीचा विकास त्या देशातील माणसांच्या गप्पिष्ट स्वभावामुळे होत गेला. आता समाजमाध्यमांचे पीक फोफावल्यापासून 'मौखिक गप्पा' हा प्रकार फारच दुबळा होऊ लागला असून, केवळ कळपट्ट्यावरील बटने दाबून आभासी गप्पांचा पड रंगविण्याची सवय फोफावत चालली आहे.
.....
'मराठी वृत्तवाहिन्यांचे मराठी' हा विनोदाचा विषय झाल्यापासून, 'माध्यमांतील मराठीचे भवितव्य' या मुद्द्यावर सर्वत्र गंभीर चर्चा सुरू झाली आहे. समाजमाध्यमांचा मंच ही या चर्चेसाठी योग्य अशी जागा असल्याने, वृत्तवाहिन्यांच्या मराठीचे वाभाडे काढणारा आणि या वाहिन्यांच्या मराठीवर ताशेरे ओढणारा वर्ग हा सामान्य मराठी माणूस आहे, ही चांगली बाब आहे. मराठी वर्तमानपत्रे किंवा मराठी वाहिन्यांवरील मराठी भाषेवर नेमका कोणत्या भाषेचा प्रभाव आहे, हेदेखील सांगता येणार नाही, अशा गूढ रीतीने मराठीची अवस्था केविलवाणी होत चालली आहे. बातम्यांना भडकपणा आणण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या या अगम्य आणि भ्रष्ट मराठीचा गाडा मूळ मराठीच्या मार्गावर येण्याची चिन्हे नाहीत. या दिव्य मराठीचाच कित्ता सध्या वर्तमानपत्रांच्या ई-आवृत्त्या गिरविताना दिसतात. बातमीला भडक रंग देण्यासाठी मराठीची मोडतोड करणे ही जणू गरज बनली असावी. विशेष म्हणजे, या बिघडत्या मराठीमुळे, भविष्यातील मराठी कोणत्या भाषेच्या रूपाने प्रगत होणार आहे, हे सध्या तरी अनाकलनीय गूढ आहे.
वर्तमानपत्रे हे सामान्य मराठी माणसाला मराठी भाषेची नेमकी जाण देणारे माध्यम असल्याने, मराठी वर्तमानपत्रांनी मराठीचा वापर जबाबदारीने करावा अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. सध्या वर्तमानपत्रांच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा ढाचा पुरता बदलून गेला असून भाषा आणि आशय यांचा जोरदार संघर्ष मराठी वर्तमानपत्रांत दिसू लागला आहे. कोणताही मजकूर त्याचा आशय समजावण्याएवढा स्पष्ट असण्यापुरते भाषेचे महत्व उरले असून भाषेच्या शुद्धतेचे निकष फार महत्वाचे नाहीत, असे चित्र दिसू लागले आहे. वर्तमानपत्रांच्या ई-आवृत्त्यांमुळे, आता ती मराठी जगभरातील मराठी माणसांकडून वाचली जाऊ लागली असून, मराठी भाषेसोबतचे नाते आकलनापुरतेच उरलेल्या परदेशस्थ मराठी वाचकांना भाषेच्या शुद्धाशुद्धतेशी फारसे देणेघेणे नसावे, उलट, वाचकास बातमी किंवा कन्टेन्ट देणे हेच वर्तमानपत्राच्या भाषेचे मर्यादित काम आहे, असा समज रुजू लागला असावा. प्रत्येक नव्या मराठी पिढीच्या भाषेत जागतिकीकरणाचे प्रतिबिंब उमटत असल्याने, मराठीच्या वापरात अन्य भाषांमधील शब्द ही 'आकलनाची गरज' असल्याच्या समजुतीतून वर्तमानपत्रांनीही आपल्या मराठीला परभाषांतील शब्दांचे साज चढविण्यास जाणीवपूर्वक सुरुवात केल्याने, वर्तमानपत्रांतील मराठी वाक्यरचना केवळ काळ आणि क्रियापदांपुरतीच मराठीशी नाते जोडणारी ठरू लागली. 'पांढऱ्यावर काळे करणे' म्हणजे, मजकूर भरणे महत्वाचे झाले, तेव्हापासून भाषेची शुद्धता हा प्रकार कालबाह्य ठरू लागला असावा. वर्तमानपत्रांच्या निर्मिती प्रक्रियेत एकेकाळी महत्वाचा असलेल्या मुद्रितशोधकास नावापुरतेच अस्तित्व उरले आहे. त्यामुळे, ज्याचे त्याचे मराठी लेऊन बातमी किंवा वृत्तपत्रीय मजकूर तयार होत असल्याने, वर्तमानपत्रेदेखील या बाबतीत उदासीन दिसू लागली आहेत. वृत्तवाहिन्यांनी मराठीची कत्तल सुरू केल्यानंतर वर्तमानपत्रे तरी मराठीचा डोलारा सावरण्यासाठी सज्ज होतील, हा समज आता धूसर होऊ लागला आहे.
'गप्पा मारणे' ही एक संस्कृती असते. गप्पांच्या माध्यमांतून भाषेची देवाणघेवाण होत असते. असे म्हणतात, की ब्रिटीश संस्कृतीचा विकास त्या देशातील माणसांच्या गप्पिष्ट स्वभावामुळे होत गेला. आता समाजमाध्यमांचे पीक फोफावल्यापासून 'मौखिक गप्पा' हा प्रकार फारच दुबळा होऊ लागला असून, केवळ कळपट्ट्यावरील बटने दाबून आभासी गप्पांचा पड रंगविण्याची सवय फोफावत चालली आहे. त्यातही, विशिष्ट भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरजही अलीकडे कमी होऊ लागली असून, सांकेतिक चित्रलिपी (स्माईली) हा प्रकार समाजमाध्यमांवर रूढ होऊ लागला आहे. अगोदरच मौखिक गप्पांचा वेळ समाजमाध्यमांवरील आभासी गप्पांनी खाऊन टाकलेला असताना, त्यातही शब्दांची जागा सांकेतिक खुणांनी घेतली, तर भाषेचे भवितव्य काय असेल, याची कल्पना करणे काहीसे अवघडच होणार आहे.
... आज सकाळी एका बुजुर्ग पत्रकार मित्राशी बोलताना, वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे मराठी या विषयावर गाडी वळली. अनेकदा एखाद्या वर्तमानपत्रात, एकाच अंकाच एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आढळतो. त्यामुळे, त्यापैकी योग्य शब्द कोणता, हे ठरविणे वाचकालाही अवघड होऊन जाते. असे प्रकार टाळण्यासाठी एकेकाळी वर्तमानपत्रांमध्ये स्टाईल शीट नावाचा प्रकार असे. म्हणजे, कोणताही एक शब्द त्या वर्तमानपत्रात त्या ठरलेल्या पद्धतीनेच वापरला जावा यावर कटाक्ष असे. त्यामुळे तो शब्द रूढ करणे सोपे होत असे, आणि मराठी वाचकासही त्या शब्दाची सवय होत असे. आजकाल स्टाईल शीट हा प्रकार कालबाह्य झाला आहे. मराठी पत्रकारांच्या संघटनांनी मराठी शब्दांचा खजिना सूचिबद्ध करावा यासाठी हा मित्र प्रयत्नशील आहे. मराठी भाषेत सर्रास वापरल्या जाणाऱ्या परभाषी शब्दांकरिता मराठीमध्ये चपखल असा एखादा शब्द शोधावा, आणि तो सर्व मराठी माध्यमांनी वापरून रूढ करावा अशी यामागची कल्पना... उदाहरणार्थ, सध्या करोनाकाळात, तोंडावर मास्क वापरणे ही अपरिहार्य गरज आहे, आणि ती कदाचित भविष्यातील जीवनशैलीच होऊन राहणार आहे. त्यामुळे, कालांतराने मास्क हा शब्द मराठीत एवढा रूढ होणार आहे, की त्यासाठी मराठी प्रतिशब्द असेल की नाही अशीच शंका येत राहील. त्यामुळे, मास्कचा वापर सुरू होत असतानाच त्याला नेमका मराठी प्रतिशब्द शोधून सर्व मराठी माध्यमांनी तोच शब्द सामूहिकपणे रूढ केल्यास भविष्यातील मराठीची जपणूक होईल. मास्क हा एक उदाहरणार्थ शब्द आहे. असे असंख्य शब्द मराठीमध्ये येऊन दाखल झालेले आहेत. त्यामुळे मराठी भ्रष्ट होते की समृद्ध होते, हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. मराठीने स्वतःचे शब्द न गमावता अन्य शब्दांना आपल्यात सामावून घेतले, तर मराठी समृद्ध होईल, अन्यथा मराठीचे मराठीपण हरवेल, असे अनेकांना वाटते. हे खरेच आहे. मात्र, मराठी वर्तमानपत्रे, मराठी पत्रकारांच्या संघटना, मराठी वृत्तवाहिन्या आणि सार्वत्रिकपणे मराठीचा वापर करणाऱ्या कोणत्याच यंत्रणेस मराठीच्या भविष्याची चिंता वाटत नसावी असेच वातावरण असल्याने, मराठीला कालांतराने परभाषांच्या पांगुळगाड्यावरच वाटचाल करावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे.
याचे एक बोलके उदाहरण काही काळापूर्वी मला जाणवले. त्यामुळेच आज हा मुद्दा अधोरेखित करावा असे वाटले. आकाशवाणीच्या एका मराठी वाहिनावर एकदा एका वक्त्याचे भाषण कानावर पडले. विषय ध्वनिप्रदूषणासंदर्भात होता, आणि भाषण नवमराठीतून होते.
त्याचे कानावर पडलेले शब्द मी टिरून ठेवले, आणि नंतर एक सलगपणे एक परिच्छेद तयार झाला...
तो असा होता...
'बॉडी आणि माईंड यांच्यावर नॉईज पोल्यूशनचा डायरेक्ट अँडव्हर्स इफेक्ट होत असतो. म्हणून, लहान मुलांच्या परिसरातील नॉईज पोल्यूशनचे नॉर्म्स भयंकर स्ट्रिक्ट असायला पाहिजेत. याचा विचार करूनच, सायन्स रिलेटेड ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या एक्टिव्हिस्ट्सनी खूप रिसर्च करून चॉकआऊट केल्या आहेत. रेसिडेन्शियल एरियात किता नॉईज एक्स्पोजर असायला पाहिजे, हे डिसाईड केले पाहिजे. थोडक्यात, नॉईज पोल्यूशनला लाईटली घेऊन चालणार नाही. कारण ते एक हेल्थ हझार्ड आहे. इर्रिव्हर्सिबल हियरिंग लॉस झाला नाही, तरी त्याव्यतिरिक्त अन्य अनेक बॉड इफेक्टस होऊ शकतात, हे सायन्सने प्रूव्ह केलेले आहे...'
-तर, या भाषणाने एका महत्वाची समस्या गांभीर्याने अधोरेखित केली, यात शंका नाही. प्रदूषणाचा एक अत्यंत गंभीर मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडला गेला, यातही शंका नाही. पण नॉईज पोल्यूशनचा मुद्दा मांडताना, भाषेचे प्रदूषण झाले, त्याचे काय
याचे 'इफेक्टस' भविष्यात भोगावेच लागतील...

No comments:

Post a Comment