Tuesday, June 2, 2020

हसतखेळत ‘सामना’...


मानसिकदृष्ट्या हतबल होऊ लागलेल्या समाजात अशा परिस्थितीमुळे अधिकच नैराश्य येऊ शकते, आणि नैराश्याने ग्रासलेल्या समाजास दिलाशाचे दोन शब्ददेखील मोठा आधार ठरू शकतात. उद्धव ठाकरे यांनी नेमक्या याच मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. 
***
संकट गंभीर आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असले, तरी जनतेशी संवाद साधताना या गंभीर संकटातून हलकाफुलका दिलासा देण्याचा प्रयत्न ते करत असतात. हलके विनोद, शाब्दिक कोट्या, यमके आणि चिमटे-कोपरखळ्या काढत ते बोलू लागले, की त्यांचे भाषण ऐकणाऱ्यास त्या वेळेपुरता का होईना, संकटाच्या गांभीर्याचा विसर पडतो. हे आता नेहमीचंच झालंय, अशी सुरुवात करून ते बोलू लागतात, आणि मग कोट्यांवर कोट्या करत त्यांची सौम्य वाणी संवाद साधू लागते. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने अशा अनौपचारिक रीतीने संवाद साधलेला नाही. सरकारच्या शिष्टाचार विभागाने लिहून दिलेली भाषणे वाचून दाखविण्याचा रिवाज अगदी पट्टीचे वक्ते समजल्या जाणाऱ्या कोणाही मुख्यमंत्र्यास चुकलेला नाही. उद्धव ठाकरे यांचे वैशिष्ट्य हे, की त्यांनी या सरकारी रिवाजास फाटा दिला, आणि आपली स्वतःची संवादशैली विकसित केली. म्हणूनच, त्यांचे भाषण पार पडल्यानंतर पुढचे भाषण ऐकावयास मिळेपर्यंतच्या आठवडाभरात, जुन्या भाषणातील किस्से, गमतीजमती, कोट्या आणि चिमट्यांचा विरंगुळा जनतेस मिळतो, आणि गंभीर संकटातही हसतखेळत कसे रहावे याचे अप्रत्यक्ष प्रशिक्षणही होते.

संकटाच्या भयाने धास्तावलेल्या समाजास भयापासून दूर राखण्याचा हा एक वेगळा मानसशास्त्रीय प्रयोग असला पाहिजे. करोनाचे संकट गंभीर आहे. दिवसागणिक नव्या हजारो रुग्णांची भर पडत आहे. मृत्युदराचा आलेख अजूनही खाली आलेला नाही. देशात सर्वात मोठा हाहाकार एकट्या महाराष्ट्रात माजला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना याची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच ते आपल्या सुरुवातीच्या जनसंवादातच म्हणाले होते, संकट गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे’! त्यांच्या या ग्वाहीस आता दोन महिने उलटून गेले. संकटाचे गांभीर्य त्यानंतर अधिकाधिक गहिरे होत चालले आहे. अशा परिस्थितीत समाजाचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. संकटभयाने ग्रासलेल्या समाजाची मानसिकता विकल होऊ शकते. असे जेव्हा घडते, तेव्हा समाजास दिलासा देणाऱ्या तातडीच्या उपाययोजना आखणे आणि त्यांची दृश्य अंमलबजावणी करणे हे मोठे आव्हान असते. महाराष्ट्रात यासाठी मोठ्या मर्यादा आहेत, हे लपून राहिलेले नाही. संकटाचा सामना करण्यास आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे, किंबहुना, जवळपास कोलमडलीच आहे. प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सेस, इस्पितळे, खाटा, औषधे, उपचाराची व स्वसंरक्षणाची साधने, साऱ्यांचाच मोठा तुटवडा भासू लागला आहे, आणि त्यावर तातडीने इलाज शोधणे सरकारच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. मानसिकदृष्ट्या हतबल होऊ लागलेल्या समाजात अशा परिस्थितीमुळे अधिकच नैराश्य येऊ शकते, आणि नैराश्याने ग्रासलेल्या समाजास दिलाशाचे दोन शब्ददेखील मोठा आधार ठरू शकतात. उद्धव ठाकरे यांनी नेमक्या याच मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. संकटात खचलेल्या मनावर हलक्याफुलक्या विनोदाची फुंकर मारून त्यांनी आजवरच्या अनेक जनसंवादातून संकटाच्या गांभीर्याचे सावट पुसण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन हा शब्द कचऱ्याच्या पेटीत फेकण्याच्या त्यांच्या निर्धाराने करोनाचा विषाणू भयभीत होऊन काढता पाय घेणार नाही, हे सर्वसामान्य आणि अशिक्षित माणूसही जाणतो. मुख्यमंत्र्यांनाही हे माहीत आहे. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक या वाक्याचा वापर केला. कारण, या एका वाक्यातून जनतेच्या मनात आत्मविश्वासाची, नव्या लढाईची नवी उमेद जाही होईल, असा त्यांचा विश्वास असावा.
किनारपट्टीवर येऊ घातलेल्या निसर्ग वादळास थोपविण्याची ताकद फक्त निसर्गातील चमत्कारामध्येच असून कोणतीही, अगदी सरकारमधील किंवा कोणत्याही सर्वोच्च स्थानावरील व्यक्तीदेखील हे संकट थोपविण्यास समर्थ नसते, हेही त्यांना माहीत आहे. तरीही, हे वादळ आपल्यापर्यंत येणार नाही, असा आत्मविश्वासपूर्ण दावा त्यांनी केला. आपण मुख्यमंत्री आहोत, परमेश्वर नाही, याची जाणीव त्यांना नाही, असा याचा अर्थ नाही. म्हणूनच, या संकटास तोंड देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. असे समजुतीचे शब्द कानावर पडले, की भयाची भावना कमी होते. संकटाचे गांभीर्य कमी होत नसले, तरी त्याचे भय कमी होणे ही अशा परिस्थितीत मोठी बाब असते. ठाकरे यांनी या मानसशास्त्राचा नेमका वापर केलेला त्यांच्या भाषणात दिसतो.
करोना हे संकट थोपविण्याचा उपाय अजून सापडलेला नाही. त्यामुळे, पुढचे आयुष्य करोनासोबत जगायचे आहे, हे एव्हाना जनतेस माहीत झाले आहे. मग, जर हा आजार आपली पाठ सोडणार नसेल, तर त्याच्या अस्तित्वाच्या खुणांना घरात घेण्यास काय हरकत आहे? मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोठ्या खुबीने आणि हळुवारपणे या वास्तवाची जाणीव करून दिलेली दिसते. आता जन्माला आलेले मूल बोलू लागेल, तेव्हा आई हा पहिला शब्द न उच्चारता, लॉकडाऊन असे म्हणेल... ही त्यांची कालच्या भाषणातील सर्वोच्च मानसशास्त्रीय कोटी मानली पाहिजे. करोनाचे अस्तित्व टाळणे शक्य नाही, त्याच्या खाणाखुणा पुसणे शक्य नाही, हेच त्यांनी केवढ्या नेमक्या शब्दांत समाजास समजावून सांगितले आहे...
तसेही, करोनाच्या जाणीवा आजकाल समाजात पसरू लागल्याच आहेत. लहान बाळाच्या लॉकडाऊन या पहिल्या शब्दोच्चारावरून ठाकरे यांनी केलेल्या विनोदाच्या आधी, देशात जन्माला आलेल्या नवजातांना करोना, कोविड, अशी नावेदेखील मिळाली आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे गेल्या २७ मार्चला जन्माला आलेल्या एका जुळ्याचे करोना आणि कोविड असे नामकरण करून त्यांच्या मातापित्यांनी हा आजार संस्मरणीय केलाच आहे. लॉकडाऊनच्या काळात असंख्य अडचणींचा सामना करत अखेर या महिलेने सरकारी इस्पितळात या जुळ्याला जन्म दिला. त्या अडचणींचा विसर पडू नये म्हणून त्या मुलांची करोना आणि कोविड अशी नावे ठेवण्याचा त्या मातापित्यांचा निर्णय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मानसशास्त्रीय जाणीवेतून केलेला विनोद यांतूनच, संकटाचे गांभीर्य कमी होण्यास मदत होते. शहरात सारे काही ठप्प झाले आहे, रस्त्यावर एकही वाहन नाही, इस्पितळांत करोनाग्रस्तांची गर्दी झाली आहे. डॉक्टर, नर्सेस आणि कोणत्याही आरोग्य सेवकास बाळंतपणासारख्या अडचणीकडे लक्ष देण्यास फुरसत नाही, अशा अवस्थेत या महिलेस प्रसववेदना सुरू झाल्या, तेव्हा तिच्या सुरक्षित बाळंतपणासाठी तिच्या कुटुंबास मानसिक संतुलन राखण्यासाठी केवढी कठोर परीक्षा द्यावी लागली असेल, याची कल्पनादेखील करणे कठीण आहे. तरीही, सारे काही सुरळीत झाले, म्हणून त्या संघर्षाच्या खुणा बाळांच्या नावाने जिवंत ठेवण्याचा निर्णय मातातपित्यांनी घेतला... मनिलामध्ये याच काळात जन्माला आलेल्या बाळांचेही करोना आणि कोविड असे बारसे करण्यात आले आहे. राजस्थानातील एका दाम्पत्यास याच संकटाच्या काळात झालेल्या मुलाचे नाव लॉकडाऊन असे ठेवलेच आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर विनोद, टीका होतही असेल. कारण त्यांच्या शाब्दिक कोट्या आणि हलक्याफुलक्या विनोदाचा, वाक्यांच्या पुनरुच्चारांचा आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याच्या त्यांच्या पद्धतीचा मानसशास्त्रीय कंगोरा कोणास उमगलेला नाही. याच शब्दांनी करोनाचा सामना करता येईल, याचा त्यांना पक्का विश्वास असला पाहिजे, नव्हे, असेलच... किंबहुना, भयाने मरगळलेल्या समाजास असे शब्द संकटाचा विसर पडण्यासाठी मदत करतील, अशी त्यांना खात्री असेल...

...म्हणून, शिष्टाचार बाजूला ठेवून होणाऱ्या संवादाचा अर्थ जाणून घेण्याची सवय समाजाने लावून घेतली पाहिजे.

1 comment:

  1. सत्यवचन उद्धवजी यांनी महाराष्ट्रातील जनमानस जिकले आहे...

    ReplyDelete