Wednesday, June 3, 2020

मीडीयाचं माध्यम...


राजकारणातील असंख्य अडथळे सहज पार करून एका टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी चाणक्याची बुद्धी हवी, अमाप संघटनकौशल्य हवा, जनाधार हवा, आणि मुख्य म्हणजे, प्रसार माध्यमांचा विश्वासही संपादन करता यायला हवा. गोपीनाथ मुंडेंनी हे सारं मिळवलं, म्हणूनच ते राजकारणाच्या राष्ट्रीय प्रवाहातही सहज सामील झाले...
काळाच्या छाताडावर आपले स्मृतिचिन्ह उमटविणाऱ्या या माणसास, नमन!

***



पत्रकार कधीच कुणाचा मित्र नसतो. त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे...
... एका बाजूला कोंडाळं करून बसलेल्या पत्रकारांच्या कंपूतील एकाच्या पाठीवर दाणकन थाप मारत शेजारची खुर्ची ओढून बसताबसता मुंडे म्हणाले, आणि दिलखुलास हसत त्यांनी सर्वांची विचारपूस सुरू केली. आपल्या साडेतीन चार दशकांच्या राजकारणातील अनुभवानंतर सहजपणे मुंडेंनी हे वाक्य उच्चारलं, आणि नंतर, पत्रकार आणि पत्रकारितेच्या नावानं चौकार, षटकार हाणायला सुरुवात केली. 
मग हशा, टाळ्यांचा पाऊस पडत राहिला...
... पण राजकारणात राहून पत्रकारांशी वैर म्हणजे, पाण्यात राहून माशाशी वैर असा प्रकार असल्याची पुरेपूर जाणीव गोपीनाथ मुंडेंना होती. तसं नसतं, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील यच्चयावत पत्रकारांच्या मांदियाळीशी त्यांचं मैत्र जुळलंच नसतं. आपल्या आयुष्यातील अनेक नाजूक क्षण त्यांनी दिलखुलासपणे आणि मैत्रभावनेने पत्रकारांच्या गप्पांच्या अड्ड्यात सहभागी होऊन मोकळे केले. म्हणूनच, 'पत्रकारांपासून लांब राहावं', असं जरी ते म्हणाले, तरी पत्रकारांना तेव्हा त्याचा राग आला नाही. गप्पांमध्ये खुसखुशीतपणा पेरण्यासाठी केलेला तो एक राजकीय विनोद होता, हे पत्रकारांना माहीत होतं...
म्हणूनच, गोपीनाथ मुंडे आणि पत्रकार यांच्यात कधीच अंतर राहिलं नाही. खरं म्हणजे, भाजप आणि प्रसार माध्यमं- म्हणजे अलीकडची टीव्ही चॅनेल्स, आणि पूर्वीपासूनची वर्तमानपत्रं- दोघांचंही निदान महाराष्ट्रात तरी फारसं सख्य नाही. पण गोपीनाथ मुंडे भाजपचे नेता असूनही, ते आणि प्रसार माध्यमं असं रसायन अनेकदा मस्त जुळून आलंय. एखाद्या खाजगी कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे असले, की तो सारा कार्यक्रम मुंडेंभोवती फिरत राहातो, हे पत्रकारांना चांगलंच माहीत होतं. म्हणूनच, एखाद्या अगदी नवख्या पत्रकारापासून, ते जाणकार बुजुर्ग पत्रकारापर्यंत सारे त्या कार्यक्रमात हजेरी लावत. मग, दिवसभराची कामाची कितीही दगदग असली, तरी मुंडेंच्या सहवासात तो शीण संपून जातो, आणि एकत्र जमण्यासाठीच्या, शिणवटा संपविण्यासाठीच्या 'बाकीच्या कल्पना'ही मनाला शिवत नसत. कारण, गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासाची नशा पुरेशी असे...
राजकारण आणि जात हे महाराष्ट्रातलं एक अतूट असं समीकरण राहिलं आहे. म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकारणावर एकाच जातीचा पगडा आहे, हे सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्राचं राजकारण जातीच्या जोरावर आपल्याला हवं तसं वाकविणारे वाकबगार नेते महाराष्ट्रात जेव्हा राजकारणात मुरले होते, तेव्हा गोपीनाथ मुंडे नावाचा, समाजाच्या मुख्य प्रवाहापासूनही दूर असलेल्या समाजातला एक युवक राजकारणात योगायोगाने प्रवेश करतो, रुजतो, मुळं धरतो, आणि परळीजवळच्या हजारपाचशे वस्तीच्या खेड्यापासून थेट दिल्लीच्या राजकारणापर्यंत मजल मारतो, हा काही केवळ योगायोग किंवा नशिबाचा भाग असू शकत नाही. राजकारणातील असंख्य अडथळे सहज पार करून एका टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी चाणक्याची बुद्धी हवी, अमाप संघटनकौशल्य हवे, जनाधार हवा, आणि मुख्य म्हणजे, प्रसार माध्यमांचा विश्वासही संपादन करता यायला हवा. गोपीनाथ मुंडेंनी हे सारं मिळवलं, म्हणूनच ते राजकारणाच्या राष्ट्रीय प्रवाहातही सहज सामील झाले...
एखाद्या नेत्याच्या खाजगी आणि राजकीय जीवनाबद्दल सर्वसामान्य समाजाला अपार उत्सुकता असते. गोपीनाथ मुंडे राज्याच्या सत्ताकारणात दाखल झाले, तेव्हा याचंच भांडवल करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. १९७१ मध्ये संघाच्या पहिल्या ओटीसी वर्गात जाऊन आल्यानंतर या तरुणाच्या आयुष्याला पहिली कलाटणी मिळाली. राजकीय भाषेत, त्यांच्या जीवनातला हा पहिला 'टर्निंग पॉईंट'... आणि पुढे गोपीनाथ मुंडे संघाच्या पुण्यातील एका शाखेचा मुख्य शिक्षक झाला. संघाच्या कार्यपद्धतीत, मुख्य शिक्षकाचं पद मिळणाऱ्याचे नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्य सिद्ध व्हावं लागतं. त्यासाठी संघस्थानावर प्रदीर्घपणे मानसिक मशागत करून घ्यावी लागते. गोपीनाथ मुंडे संघात दाखल झाले, प्रशिक्षण वर्गात गेले, आणि मुख्य शिक्षकही झाले. आयुष्यातला हा पहिला टर्नींग पॉईंट त्यांना राजकारणाच्या राष्ट्रीय केंद्रबिंदूपर्यंत घेऊन जाणारा ठरला. त्याच, पहिल्याच वळणानं त्यांना जातीच्या राजकारणाचाही अनुभव देत, बेरजेचं गणित शिकवलं. दोनतीन वर्षांच्या संघकार्य आणि अभाविपच्या संघटनात्मक कामातून प्रमोद महाजनांशी जुळलेलं भावनिक मैत्र त्यांना अलगदपणे राजकारणात घेऊन आलं, आणि गोपीनाथ मुंडे नावाचा तरुण जनसंघाचा नेता झाला. १९७५ मधल्या आणीबाणीच्या कडवट आठवणी आजही अनेक काँग्रेसेतर नेत्यांच्या मनात रुतून राहिल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंनाही आणीबाणीच्या काळात १६ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. पण मुंडेंच्या मनात आणीबाणीच्या काळातल्या काही मोरपिशी आठवणीही टवटवीत राहिल्या होत्या. कारण, इथेच त्यांच्या खाजगी जीवनातला एक मोठ्ठा टर्निंग पॉइंट आकाराला आला होता. जेलमध्ये असताना, प्रमोद महाजनांच्या घरून येणाऱ्या जेवणाच्या डब्यातून येणारा कागदाचा एक चतकोर तुकडा त्यांचं नवं आयुष्य आखत होता. गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा महाजन यांची जन्मगाठ या कागदाच्या तुकड्यासोबत घट्ट होत गेली, आणि दोघे जीवनसाथी झाले...
ही मोरपिशी आठवण अगदी खाजगी बैठकीत, मोजक्या मित्रांसोबत अलगदपणे उलगडताना, त्यांच्यातला राजकीय, चतुर नेता मनाच्या कप्प्याआड समजूतदारपणे जाऊन बसलेला अनेकांनी अनुभवलाय...
म्हणून, पत्रकारांपासून लांब राहा असं ते म्हणत असले, तरी त्यांनी मात्र पत्रकारांपासूनचं अंतर मर्यादेबाहेर वाढू दिलं नाही. उलट, अनेकदा, गोपीनाथ मुंडे हे मोजक्या पत्रकारांसाठी 'मीडियाचं माध्यम' ठरले आहेत. 
मला त्या काळात मुंडेंच्या या स्नेहाचा खूप फायदा झाला.
ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले, आणि मंत्रालयात त्यांना केवळ भेटण्यासाठी, त्यांच्या गालावरून प्रेमानं हात फिरविण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उभा महाराष्ट्र मंत्रालयात लोटला. ही अतिशयोक्ती नाही. मुंडेंच्या दालनानं त्याआधी अशी गर्दी क्वचितच अनुभवली असेल. जुना परिचय असल्यामुळे, मीही एका दिवशी त्या गर्दीत त्रयस्थपणे उभा राहिलो. तेव्हा मी मंत्रालय कव्हर करत होतो, पण मुंडेंनी जुन्या ओळखीचंच ते नातं जिवंत ठेवलं होतं. त्या गर्दीच्या गराड्यात त्यांनी मला पाहिलं, आणि ते पुढे आले. स्वतःहून हात पुढे करून माझं अभिनंदन स्वीकारलं... त्या वेळी माझ्याकडे त्यांना देण्यासाठी केवळ अभिनंदनाचे शब्द होते. तरीही मी धाडस केलं, आणि माझ्या खिशाचं, सोनेरी मुलामा असलेलं एक छान पेन मी त्यांच्या हातात दिलं. भेट म्हणून... उपमुख्यमंत्रीपदावरच्या माणसाला मिळणाऱ्या भेटींच्या तुलनेत ही अगदीच किरकोळ वस्तू होती. पण पुढे कितीतरी दिवस त्यांच्या जाकिटाला ते पेन दिसलं, की मला आनंद व्हायचा... नातं जपण्याची खूण जिवंत असल्याचा आनंद... ते नातं त्यांनी पत्रकारितेच्या आड येऊ दिलं नाही. उलट, आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन माझ्याशी त्यांची ओळख करून दिली. ते मला पुढे बातमीदारीसाठी खूपच उपयुक्त ठरले. 
जातीच्या राजकारणाचा पहिला कडवट डोस गोपीनाथ मुंडेंनाही घशाखाली घ्यावा लागला. रेणापूर मतदारसंघातून लढविलेल्या पहिल्या निवडणुकीत, जातीबाहेरच्या मुलीशी प्रेमप्रकरण असल्याचा आरोप प्रचारादरम्यान झाला, आणि त्यांना पराभवाचा पटका सोसावा लागला. हजारभर मतांनी मुंडे पडले. कधीतरी बोलताबोलता त्यांना हे आठवायचं, आणि त्या पराभवाच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर उमटायच्या... नंतर मात्र, त्या पराभवाचा मजबूत वचपा काढत महाराष्ट्रातील विक्रमी मताधिक्याचा विजय घेऊन ते विधानसभेत दाखल झाले. बेरजेच्या आणि समर्थ काटशह देण्याच्या राजकारणाची पक्की पायाभरणी झाल्याची खात्री तेव्हा वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजनांना पटली होती.
म्हणूनच, होपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात जातीचं वेगळं राजकारण मांडलं. भाजपचा चेहरा तोपर्यंत ब्राह्मणी होता. मुंडेंच्या रूपाने भाजपला नवा चेहरा मिळाला, आणि ओबीसींच्या राजकारणाचा नवा प्रवाह महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला. आज तो पक्का रुजलाय... ओबीसींच्या उत्कर्षासाठी जे जे करावं लागेल, ते सारं करण्याची कबुली देताना, पक्षाच्या धोरणापेक्षाही अनेकदा त्या मुद्द्याला प्राधान्य देणाऱ्या मुंडेंनी आपली भूमिका त्या वेळी पक्षात रुजविली, आणि नेत्यांच्या गळी उतरविली. आज भाजपचा सर्वसमावेशक चेहरा हे त्या वेळच्या त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रतिबिंब आहे, असे मला वाटते. जातिनिहाय जनगणनेचा पक्षाच्या धोरणाचा विचार झुगारून त्यांनी धरलेला आग्रह अखेर कशाही स्वरूपात असो, पक्षाला आणि पक्षाच्या मातृसंघटनेलाही स्वीकारावा लागला, हे त्यांच्या बेरजेच्या राजकारणाचे उत्तर आहे.
गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय राजकारणात फारसे समाधानी नाहीत, ते अस्वस्थ आहेत, अशी चर्चा तेव्हा वारंवार होत असे. पण त्यांच्या राजकारणाला पारदर्शकपणा होता, म्हणूनच त्यांची प्रत्येक कृती आणि त्यामागचा अर्थ स्पष्ट होता. त्यामागच्या भावना राजकारणापलीकडच्या होत्या, म्हणूनच, गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाचे ते वेगळेपण पक्षानेही स्वीकारले होते.


1 comment:

  1. अप्रतिम व्यक्तिचित्र, दिनेश. मलाही मुंडेंचा स्नेह लाभला आहे.

    ReplyDelete