Sunday, June 21, 2020

आव्हान अजून पुढेच आहे...

समाजमाध्यमांच्या हातात हात घालून त्यांच्या साथीने माध्यमविश्वातील संचार करण्याची अपरिहार्यता वर्तमानपत्र नावाच्या माध्यमास जाणवू लागली आहे. त्यामुळे समाजमाध्यमाला बेदखल करून आपले अस्तित्व राखण्याचे धाडस यापुढे वर्तमानपत्रे करणार नाहीत.
***

एक काळ असा होता, तेव्हा विश्वासार्ह बातमीसाठी लोक केवळ वर्तमानपत्रांवर विसंबून असत. वर्तमानपत्रात बातमी छापून आली म्हणजे ती शंभर टक्के खरी असलीच पाहिजे असा लोकांचा विश्वासही होता. कारण वर्तमानपत्र हाच तेव्हा बातमीचा एकमेव स्रोत होता. पुढे दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन) नावाचे एक दृकश्राव्य माध्यम आले, आणि वर्तमानपत्राच्या पर्यायाची चिन्हे निर्माण झाली. पण दूरचित्रवाणीचा जमाना आपल्याकडे दूरदर्शन या नावाने सुरू झाला, तेव्हा ते एकसरकारी माध्यम होते. ठरावीक कार्यक्रम, मनोरंजन, माहिती आणि बातम्या असे विविधांगी स्वरूप असूनही दूरदर्शनच्या साचेबद्धपणामुळे माध्यमक्षेत्रात मध्यभागी असलेल्या वर्तमानपत्राच्या अस्तित्वाविषयी फारशी चिंता वाटण्याचे कारणच नव्हते. एक तर, वर्तमानपत्र हे मुख्यतः बातमीकेंद्रीत माध्यम होते, आणि त्याद्वारे मिळणाऱ्या माहितीचे बऱ्याचदाथेट बातमीशी नाते होते. मनोरंजन हा वर्तमानपत्राचा मुख्य गाभा नव्हता. त्यामुळे, मनोरंजनासाठी दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आणि बातम्या व सामाजिक घडामोडींच्या माहितीसाठी मुद्रित वर्तमानपत्र अशा दोन प्रकारांची आपोआप विभागणी झाली होती. हे दोन प्रकार एकमेकांशी पूरकच ठरतील, त्यांची कार्यशैली परस्परांना मारक ठरणार नाही, अशीच तेव्हाची समजूत असल्याने, दूरचित्रवाणीच्या रूपाने माध्यमक्षेत्राने पहिली क्रांती अनुभवली असली, तरी त्याचे परिणाम या क्षेत्रावर झाले नव्हते. दूरदर्शनवर बातम्या मिळत असत, पण त्यांना सरकारी पठडीबाजपणा होता, आणि लोकांची माहितीची भूक वाढत असल्याने मागणीही वाढत होती. पुढे काही खाजगी व विदेशी वाहिन्यांचा जमाना दूरचित्रवाणीवर अवतरला, आणि बातम्यांचा नवा बाज लोकांना जाणवू लागला. पठडीबाज बातम्यांऐवजी, खाजगी वाहिन्यांवरील माहितीपूर्ण दृकश्राव्य तपशीलाची आवड वाढू लागली, आणि मुद्रित माध्यमांना नव्याआव्हानाची चाहूल लागली. अर्थात हे आव्हान अस्तित्वाचे नव्हते, तर बदलाची अपरिहार्यता लक्षात आणून देणारे होते. माहिती विश्वाचा काळ बदलतो आहे, या जाणिवा जाग्या झाल्या. सहाजिकच, वर्तमानपत्रांना आपला ढाचा बदलण्याची गरज वाटू लागली, आणि बातम्यांसोबत मनोरंजन, माहिती, जागतिक घडामोडींचा परामर्श घेणाऱ्या मजकुराच्या पुरवण्यांना वर्तमानपत्राच्या मुख्य अंकाएवढेच महत्व आले. दूरचित्रवाणीसोबत वर्तमानपत्रांच्या विश्वातही बदलाचे वारे जोर धरू लागले, आणि माहिती क्षेत्राच्या परिवर्तनाचा प्रारंभ झाला. लोकशाहीचा चौथा स्तंभ कात टाकू लागला. एका परीने, मुद्रित माध्यमांच्या बरोबरीने माहिती क्षेत्रात हक्काने वावरू लागलेली दृकश्राव्य माध्यमे हे आव्हान नव्हे, तर पूरक माहितीकेंद्र ठरले. वर्तमानपत्रे आणि दृकश्राव्य माध्यमे हा माध्यमक्षेत्राचा पायाविस्तार ठरला. तरीही, दूरचित्रवाणी आपल्या जागेवर तर वर्तमानपत्रे आपल्या जागेवर अविचल होती. वर्तमानपत्रांची जागा दूरचित्रवाणी माध्यम व्यापून टाकेल अशी भीती तेवढीशी तीव्रपणे या क्षेत्रावर दाटली नव्हती, पण नव्या बदलाची ती नक्की चाहूल होती. 
माध्यमविश्वात संगणकाचा, इंटरनेटचा संचार सुरू झाला आणि मग मात्र, बदलाचे वारे वेगवान झाले. एका क्लिकसरशी जगभरातील माहितीचे भांडार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणासही सहजपणे उपलब्ध होऊ लागले, आणि आता विश्वासार्हता हीच अस्तित्वाची एकमेव कसोटी राहणार याची जाणीव परंपरागत माध्यमांना झाली. थोडक्यात, संगणकाने, म्हणजे, माहिती महाजालाने मात्र, मुद्रित माध्यमांपुढे अस्तित्वाचे खरे आव्हान उभे केले. परिवर्तनाची सुरूवात इथून झाली. गेल्या सुमारे अडीचशे वर्षांपासून भारतात भक्कम असलेला वर्तमानपत्र नावाच्या माध्यमाचा पाया काहीसा डळमळीत झाला. वर्तमानपत्र हे काळाबरोबर असे काही विकसित होत गेलेले माध्यम होते, की तो प्रवास सर्वसामान्यांनाही अचंबित करणारा होता. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या समाजात स्वातंत्र्याची जाणीव जागविणे हे सुरुवातीचे वर्तमानपत्राचे ध्येय काळानुरूप बदलणे सहाजिकच होते. काही व्यक्तींच्या ध्यासातून जन्म घेतलेल्या या व्यवसायाने कालांतराने उद्योगाचा दर्जा प्राप्त केला, आणि ते क्षेत्र काही ठराविक उद्योजकांच्या मुठीत गेले. वर्तमानपत्रांची समाजमनावरील पकड आणि त्यातील मजकुराची प्रभावी परिणामकारकता यांमुळे राजकारणी किंवा कोणत्याही घटकावर दबाव किंवा अंकुश राखण्याची ताकद असलेल्या या माध्यमाशी जुळवून घेण्याचे किंवा त्यास उपकृत करून आपल्या कह्यात ठेवण्याचे प्रयत्नही केले गेले, आणि काही वर्तमानपत्रांवर राजकीय रंगदेखील चढले. वर्तमानपत्रे हे प्रचाराचे साधन म्हणून वापरण्याची स्पर्धा सुरू झाली. थोडक्यात, परिवर्तनाचे एकएक पाऊल पुढे पडत असतानाही, वर्तमानपत्राची ताकद आणि विश्वासार्हतादेखील, बऱ्यापैकी अबाधितच होती. त्यामुळे, लोकांना काय वाचायला हवे त्यानुसार मजकूर देण्यापेक्षा, लोकांनी काय वाचायला हवे अशा भूमिका घेत काही वर्तमानपत्रांनी आपला ढाचा आखला. जनमत मुठीत ठेवण्याच्या या शक्तीमुळेच वर्तमानपत्रांची ताकद होती, त्यामुळे सरकारला, राजकारण्यांनाही वर्तमानपत्राचा धाक होता. त्याच वेळी दूरचित्रवाणी क्षेत्रात पूर्णवेळ वृत्तवाहिन्यांचा उदय सुरू झाला, आणि वर्तमानपत्रांच्या या ताकदीची विभागणी स्पष्ट दिसू लागली. बातमी किंवा घडामोडींचे विश्लेषण दुसऱ्या दिवशी समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या वर्तमानपत्रापेक्षा, ते काही क्षणांतच दृकश्राव्य स्वरूपात पोहोचविणाऱ्या वृत्तवाहिन्यांचे महत्व आपोआपच प्रस्थापित होत गेले. या माध्यमाद्वारे बातमी थेट दिसू लागल्याने त्यांची विश्वासार्हताही वर्तमानपत्राहून अधिक असल्याची लोकांची खात्री झाली, आणि माध्यमविश्वाचा काळ खऱ्या अर्थाने बदलला. आता वर्तमानपत्रांनादेखील, बातमीसाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा मसाला उपयोगी पडू लागला होता. दुसऱ्या दिवशी बातम्या देऊनही त्याचा ताजेपणा टिकविणे किंवा अगोदरच माहीत असलेली बातमी लोकांनी तितक्याच उत्सुकतेने वाचावी असे काहीतरी नवे तंत्र अवलंबिणे ही वर्तमानपत्राची गरज झाली, आणि तेव्हा मात्र, माध्यमविश्वातील नव्या आव्हानांपुढे टिकाव धरणे हा वर्तमानपत्राचा चिंतेचा विषय सुरू झाला... तोवर वाचकही सजग झाला होता. बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहणे त्याला सहज शक्य झाले होते, आणि त्याला आव्हान देणेही शक्य आहे याची जाणीवदेखील त्याला झाली होती. वर्तमानपत्राबरोबरच, वृत्तवाहिन्यांनाही या बदलाचे परिणाम जाणवू लागले होते, आणि नेमक्या त्याच काळात सोशल मीडिया -समाजमाध्यम- नावाच्या नव्या युगाचा जन्म झाला होता. 
हे माध्यम कल्पनेपेक्षाही अधिक वेगाने विस्तारले, आणि अल्पावधीतच लोकप्रिय होऊन इतके फोफावले, की परंपरागत माध्यमेच नाही, तर माध्यमकर्मी, पत्रकार नावाचा जो एक विशिष्ट वर्ग समाजात होता, त्यालाही अस्तित्वभयाची जाणीव होऊ लागली. त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या, आणि बातमीदारी किंवा पत्रकारिता ही केवळ आपली मक्तेदारी आहे, ही तोपर्यंत अबाधित असलेली समजूतही डळमळीत होऊ लागली. हा एक अनपेक्षित असा बदल होता. कारण समाजाचाही माध्यमविश्वात सहज संचार सुरू झाला होता. सुरुवातीला केवळ सोशल नेटवर्किंग या उद्दशाने उदयास आलेली समाजमाध्यमे ही बघता बघता माध्यमविश्वाच्या केंद्रस्थानी जाऊन बसली आहेत. तळहातावरच्या मोबाईलमध्ये झालेली अॅप क्रांती हे त्याचे मुख्य कारण
तरीही, समाजमाध्यमांच्या विश्वासार्हतेवर मान्यतेची शंभर टक्के मोहोर अजूनही उमटलेली नाहीच. फेसबुक, ट्वीटरसारख्या माध्यमांमुळे बातमीचा समाजापर्यंत पोहोचण्याचा वेग इतका वाढला, की त्याची शहानिशा करण्याचे भानही अनेकदा पाळले गेले नाही. आपल्याला कळलेली किंवा आपल्यापर्यंत पोहोचलेली बातमी पहिल्यांदा इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या घाईने समाजाला पछाडले, आणि फेक न्यूज नावाच्या एका नव्याच त्रासाचा माध्यमक्षेत्रात जन्म झाला. फोर्ब्जने गेल्या वर्षा केलेल्या एका पाहणीनुसार, अमेरिकेतील ४३ टक्के जनता बातम्यांसाठी फेसबुकचा, २१ टक्के लोक यूट्यूबचा, तर १२ टक्के लोक ट्वीटरचा स्रोत म्हणून वापर करू लागले होते. त्यापाठोपाठ समाजमाध्यमांवरील समाजाच्या वावरण्याच्या अभ्यासासही गती आली, आणि समाजमाध्यमे हे बातमीचा स्रोत म्हणून समाजाचे अविभाज्य अंग ठरू पाहात आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. वर्तमानपत्र किंवा वृत्तवाहिन्यांवर बातमी अवतरण्याआधी ती समाजमाध्यमांवर येऊ लागली, आणि जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांपैकी निम्म्याहून अधिक लोक त्याच बातम्यांचे उपयोगकर्ते झाले. त्यातच, एखाद्या बातमीमागची बातमी जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर वाढला, आणि तोपर्यंत याचसाठी असलेली वर्तमानपत्राची गरजही कमी होऊ लागली. 
अर्थात, समाजमाध्यमांचा समाजमनावर नकळत एक विचित्र प्रभाव सुरू झाला होता. वाचनाची सवय संकुचित होत गेली. बातमीचा गाभा समजावून घेण्यापुरतीच बातमी वाचण्याची सवय वाढू लागली. असे म्हणतात, की समाजमाध्यमांचा वापर वाढू लागल्यापासून, कोणत्याही मजकूरावर १५ सेकंदाहून अधिक वेळ रेंगाळणारा वाचक दुर्मीळच होऊ लागला. वाचण्यापेक्षा, व्हिडियो पाहून बातम्यांचा किंवा घडामोडींचा परामर्ष घेणे त्याला अधिक आवडू लागले. त्यामुळे समाजमाध्यमांची जबाबदारी आता वाढली आहे. वर्तमानपत्राने अनेक दशकांच्या परिश्रमानंतर प्राप्त केलेली विश्वासार्हता मिळविणे हे समाजमाध्यमांसमोरील आव्हान आहे. कारण या माध्यमावर बातमी किंवा मजकुराची (कन्टेन्ट) निर्मिती करणारी प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या त्याच्या भिंती’(वाॅल)ची संपादक’ किंवा बातमीदार असते. त्या व्यक्तीने निर्माण केलेला मजकूर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, त्याला अधिकाधिक लाईक्स किंवा शेअर्स मिळावेत, यासाठी विश्वासार्हता हा निकष त्यालाही पाळावाच लागणार आहे. त्यासाठी, फेक न्यूजला आळा घालणे आणि विशुद्ध माहिती समाजापर्यंत पोहोचविणे हे समाजमाध्यमांसमोरील आव्हान राहणार आहे. सध्या समाजमाध्यमांवर सनसनाटी किंवा वैचित्र्यपूर्ण मजकुराचाच प्रसार अधिक असलेला दिसतो. म्हणजे, विश्वासार्ह मजकुराचा अजूनही तेथे अभावच आहे. कारण, सत्यापेक्षा विपर्यासाचा किंवा खोट्याचा प्रसार अधिक वेगाने होत असतो, असे म्हटले जाते. सत्य उंबरठा ओलांडून घराबाहेर निघेपर्यंत असत्य गावभर हिंडून आलेले असते असे म्हणतात. तोच न्याय समाजमाध्यमांवर दिसतो, आणि लोकांना हे माहीतही आहे. त्यामुळे समाजमाध्यमे हे प्रस्तापित माध्यमांसमोरील आव्हान असले, तरी अस्तित्वाला आव्हान देण्याची ताकद त्यांना अद्याप प्राप्त झालेली नाही. विश्वासार्हता हा त्या ताकदीचा पाया आहे. वर्तमानपत्रांनी याच पायावर स्वतःची उभारणी केली होती. त्याला आव्हान देणारी माध्यमे जोवर स्वतःस सिद्ध करू शकत नाहीत, तोवर वर्तमानपत्रांच्या अस्तित्वाची चिंता नाही. एक मात्र खरे, की, समाजमाध्यमांच्या हातात हात घालून त्यांच्या साथीने माध्यमविश्वातील संचार करण्याची अपरिहार्यता वर्तमानपत्र नावाच्या माध्यमास जाणवू लागली आहे. त्यामुळे समाजमाध्यमाला बेदखल करून आपले अस्तित्व राखण्याचे धाडस यापुढे वर्तमानपत्रे करणार नाहीत. कारण, आजच्या बातमीचा उद्यापर्यंत ताजेपणा टिकण्याचे दिवस आता संपले, याची जाणीव वर्तमानपत्रांना ठेवणे भाग पडणार आहे. समाजमाध्यमांनीच ती किमया करून दाखविली आहे. त्यामुळे, बातमी चुकविणे आता वर्तमानपत्रांना परवडणारे नाही. ती चुकली, तर तळहातावरच्या मोबाईलवर एका बोटासरशी पर्याय देणारे साधन आता लोकांच्या हाती आले आहे. ते मात्र, आव्हान आहे!
(फोटो- प्रतीकात्मक, इंटरनेटवरून)

No comments:

Post a Comment