Wednesday, June 24, 2020

अश्रूंना जेव्हा पाने पुसतात...



कोकण आणि मुंबईच्या माणसांमध्ये एक साम्य आहे. ही माणसं परिस्थितीपुढे हतबल होत नाहीत असं 'नेत'मंडळी अभिमानाने सांगतात. मुंबईसाठी त्यांनी या मानसिकतेला एक नाव दिलंय... मुंबई स्पिरीट! ...कोकणातही हेच स्पिरीट आहे असं ही मंडळी म्हणतात. काहीही झालं, तरी मन खचू द्यायचं नाही. परिस्थितीपुढे गुडघे टेकायचे नाहीत, उलट, आलेल्या परिस्थितीस खंबीरपणे तोंड द्यायचं, आणि नव्या दिवसाला सामोरं जायचं, ही ती मानसिकता! या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या विनाशकारी निसर्ग वादळानंतर कोकणच्या किनारपट्टीवरील कित्येक गावं अक्षरशः होत्याची नव्हती झाली. पुरती उद्ध्वस्त झाली. जंगलं जमीनदोस्त झाली. पिढ्यापिढ्यांनी आपल्या घामाचं शिंपण करून वाढविलेल्या नारळी-पोफळीच्या, आंबे-काजूच्या बागा जमीनदोस्त झाल्या. अंगणाला घनदाट सावली देणारी फणसाची झाडं उन्मळून पडली, आणि उजाडपणामुळे घरंदारं भकास झाली. माणसांच्या मनावर  उदासीनतेचे ओरखडे उठले, आणि कोणत्याही संकटकाळात घडतं, तसंच इथेही घडून गेलं. चारदोन राजकीय नेत्यांनी घाईघाईने कोकणातील किनारी गावांचे दौरे आखले आणि उरकले. संकटग्रस्तांच्या पाठीवर हात फिरवितानाचे, त्यांचे अश्रू पुसतानाचे फोटो काढले, त्याचा गाजावाजा केला, आणि मुंबईला परतल्यावर कोकण स्पिरीटचं कौतुक सुरू झालं...

... एवढं अस्मानी संकट कोसळलं, तरी कोकणवासी डगमगलेला नाही. आत्महत्येचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही, आणि सरकारी मदतीसाठी तो कधीच कुणापुढे हातही पसरत नाही. तो रडतकुढत नाही... उभं आयुष्य उद्ध्वस्त होऊनही त्याची उमेद खचलेली नाही, अशा स्तुसिसुमनांचा वर्षाव सुरू झाला, आणि हा साधाभोळा  माणूस, दुःखाचे डोंगराएवढे ओझे डोक्यावर असतानाही, उगीचच भारावून गेला. पुन्हा उभं राहिलं पाहिजे, ही जिद्द त्याच्या कोसळलेल्या मनात जागी होत आहे, हे त्या, फुलं उधळणाऱ्यांनी ओळखलं, आणि कोकणावर निसर्गाने घातलेल्या घाल्याचं संकट विसरून शहरांतले नेहमीचे व्यवहार सुरू झाले.

त्याआधी काही दिवस, पश्चिम बंगालमध्येही वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. उभ्या देशाने त्याची गंभीर दखल घेतली. त्या संकटग्रस्तांसाठी मदतीचे हजारो हात पुढे आले. माध्यमांनी तर मदत उभी करण्यासाठी मोहिमा चालविल्या. अजूनही एखाद्या राष्ट्रीय वाहिनीवर पश्चिम बंगालच्या उद्ध्वस्त अवस्थेची बेचैन करणारी छायाचित्रे दिसतात. आवाहनांचा सूर आळवला जातो.

आणि कोकणची माणसं कशी खंबीर आहेत, त्यांनी संकटाला कसं धीरानं झेललं आहे, याचे कौतुकसोहळे दुसरीकडे समाजमाध्यमांवर साजरे केले जातात. तसेही, कोकणाची दखल घ्यावी असं कधी कुणाला वाटत नसतंच. हे खरंच आहे, की सामान्य परिस्थितीत कोकणातला माणूस कुणापुढेच हात पसरत नाही. आपल्या समस्यांचे रडगाणे जगासमोर गात नाही, आणि त्याचे भांडवल न करता, एकमेकांच्याच आधाराने पुन्हा उभे राहण्यासाठी धडपडतो.

यावेळीही तसे होईलच. पण मुद्दा तो नाही. एवढ्या भीषण संकटानंतरही, इथल्या व्यथा-वेदनांची गंभीर दखल घेण्याची मानसिकता का नाही, हा मुद्दा आहे. मुंबईतील मराठी माणूस हा मराठी वर्तमानपत्रांचा आधारस्तंभ म्हणावा असा वाचक-आधार आहे. पण पश्चिम बंगालातील वादळाच्या परिस्थीतीस मिळाली एवढीदेखील जागा दुर्दैवाने कोकणातील वादळाला का मिळाली नाही, हा प्रश्न उद्या नक्कीच विचारला जाईल.
स्वतःस लोकशक्ती समजणाऱ्या एका वर्तमानपत्राची दुसरी बाजू या निमित्ताने समोर आली पाहिजे. एखाद्या वर्तमानपत्रास लोकमान्यता कशामुळे मिळते?... उत्तर साधे आहे. जेव्हा ते वर्तमानपत्र आपले आहे, असे लोकांना वाटते, तेव्हा...!  तीन जूनला कोकणात निसर्ग वादळाने अभूतपूर्व हैदोस घालून कोकणच्या निसर्गाचे पुरते तीनतेरा वाजविले. त्यानंतर या लोकशक्तीने त्या बातमीची एक जेमतेम टिकली आपल्या बारा पानांच्या एका बाजूला कागदावर उमटविली. ही भीषण स्थिती संवेदनशीलतेने समाजासमोर मांडावी, समाजाच्या, सरकारच्या संवेदनांना आणि जबाबदाऱ्यांना जागे करावे, अशी जबाबदारी त्या वर्तमानपत्राने पाळली का, हा प्रश्न विचारायलाच हवा. कारण, हा केवळ बातमीला मिळणाऱ्या जागेपुरत्या चर्चेचा मुद्दा नाही, तर मानसिकतेचा मुद्दा आहे. माणसं मेली तरच संकट गंभीर आहे, असे मानण्याची मानसिकता. कोकणाच्या सुदैवाने या संकटातही मोठी जीवितहानी झाली नाही. त्यामुळे संकटाचे गांभीर्य  नजरेआड करावे, ही ती मानसिकता. मृत्युसंख्येनुसार बातम्यांना जागा मिळते, असा सर्वसाधारण समज असतो. तसा वाचकांचाही अनुभव आहे. तिकडे जगाच्या पाठीवर कुठे काही घडले, आणि चारदोन मृत्यू झाले, तरी त्याची बातमी देण्याचा उतावीळपणा या लोकशक्ती म्हणून मिरविणाऱ्यांमध्ये लपून राहिलेला नाही. अधूनमधून दिसणाऱ्या तशा बातम्यांनी ते दाखवून दिले आहे. म्हणून, मृत्यूसंख्येनुसार बातमीचे मूल्य ठरविण्याच्या मानसिकतेचा फटका कोकणच्या संकटकाळात बसला असावा असा संशय येऊ शकतो. ३ जून रोजी या लोकशक्तीच्या मुंबई आवृत्तीत निसर्ग संकट या मथळ्याखाली, या संकटाचा इशारा देणारी एक कोरडी, मुख्य बातमी झाली, आणि बातमी चुकवू नये, या पत्रकारितेच्या मूल्याची जेमतेम जपणूक झाली. ३ जूनला निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर अक्षरशः हैदोस घातला. कोकणाचे हिरवे सौंदर्य पुरते धुवून टाकले, आणि पुढच्या किमान दोन दशकांचे भविष्यही पुसून टाकले. प्रचंड हानी झाली. अक्षरशः विध्वंस झाला. जिवाच्या आकांताने स्वतःस आणि पाळळेल्या जनावरांस सांभाळत कोकणी माणसाने कसेबसे स्वतःस वाचविले, आणि भकास वर्तमानाकडे निराशेने पाहात त्याने ती अंधारमय रात्र काढली. दुसरा दिवस उजाडला, तेव्हा या विनाशाचे विषण्ण रूप त्याच्यासमोर साकळलेले होते, आणि या लोकशक्तीने, निसर्ग संकट टळले, वगैरे मोघम मथळा देऊन दुसऱ्या दिवशीचे कर्तव्य त्रयस्थपणे पार पाडले. आयुष्ये उद्ध्वस्त करून होत्याचे नव्हते करून सोडणाऱ्या संकटांच्या बातम्यांवर मनाच्या ओलाव्याचे शिंपण केले, तर संकटाबाहेरच्या मनांना माणुसकीचे कोंब फुटतात, असा अनुभव आहे. ही कोरडीठाक बातमी त्या दिवशी ज्यांनी वाचली असेल, त्यांना मात्र, संकट टळले, एवढाच बोध त्यावरून झाला असेल यात शंका नाही. पुण्याच्या कुणा प्रतिनिधीने दिलेली पावसाची एक तांत्रिक बातमी विस्ताराने वापरून या स्वयंघोषित लोकशक्तीने निसर्ग संकटाची बोळवण केली, आणि कोकणातील विध्वंसाची जाणीव वाचकांपर्यंत पोहोचलीच नाही. महाराष्ट्राचे नंदनवन असलेला हा प्रदेश जेव्हा उजाड उजाड होऊन भविष्यभयाच्या भयाण जाणिवेने कोलमडून गेला होता, त्या दरम्यान ही लोकशक्ती अग्रलेखाच्या जागेवरही शिक्षणाचा ऊहापोह करत होती. या भयाण संकटाचे वारेदेखील या पानाला शिवले नव्हते, ही दुःखद वस्तुस्थिती सर्वांसमोर आहे. मुंबई, पनवेल, नवी मुंबई, नेरूळ, वसई, ठाणे या परिसरातील जेमतेम छायाचित्रांनी पान भरून आणि कोकणच्या किनारी गावांतील विध्वसांकडे डोळेझाक करून या वर्तमानपत्राने कोकणवासीयांच्या अश्रूंनाच पाने पुसून टाकली.


निसर्ग वादळामुळे विजेचे जवळपास तीन हजार खांब उन्मळून पडले. वादळाने केवढा परिसर कवेत घेतला असावा, याचा अंदाज येण्यासाठी हा आकडा महत्वाचा आहे. साधारणतः पन्नास ते शंभर मीटरवर एक खांब असतो, असे गृहीत धरले, तर किमान दीडशे किलोमीटरच्या परिसराचा वादळाने विध्वंस केला, हे या आकड्यावरून दिसते. या ठिकाणी पुढचे किमान दोन महिने, ऐन पावसाळ्यात वीजेविना राहावे लागेल हे स्पष्ट आहे. अशा वेळी, अंधारात चाचपडणाऱ्या संकटग्रस्तांना पावलापुरता प्रकाश मिळावा यासाठी काही संवेदनशील मने मदत गोळा करू लागली. काही राजकीय पक्षांनी मदतीचे सामान भरलेले ट्रक संकटग्रस्त कोकणात पाठविण्यासाठी रवाना केले. पण, ती मदत खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचली किंवा नाही, याची दखल मात्र घेतली गेलीच नाही.

प्रत्यक्ष संकटातही कानाडोळा करणाऱ्या आत्ममग्न वर्तमानपत्रांना तर याची गरज वाटणार नाही हे सहाजिकच होते...

हे खरे आहे, की करोना नावाच्या जागतिक संकटाने सर्वांस घेरले आहे. ते संकट सर्वांसमोरच आहे. तसेच, या आपत्तीचा फटका बसलेल्या कोकणवासींसमोरही आहे. उलट, त्यांना करोनासोबत या नव्या आपत्तीचे संकट झेलावे लागणार आहे. राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील हानीसाठी तातडीची काही मदत जाहीर केली, अन्य नुकसानग्रस्त भागांवरही संवेदनशीलतेची फुंकर मारल्यासारखे केले, पण निसर्ग वादळाने डोळ्यात गोळा केलेल्या आपत्तीचे अश्रू पुसण्यास ही संवेदनशीलता पासंगालाही पुरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. नारळी-पोफळी आणि आंबे-काजूंची उद्ध्वस्त झाडे उचलून जागांची साफसफाई करण्याचीही उमेद कोकणातील संकटग्रस्त माणसास राहिलेली नाही. त्याच्या हातात आत्ता तरी ती ताकद उरलेली नाही. कारण तो मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. आपल्या हातांनी वाढविलेले जपलेले एकएक झाड जमीनदोस्त झाल्याच्या वेदना सहन करणे त्याला कठीण जात आहे. आसपास पसरलेले विनाशाचे चित्र विषण्ण करणारे असले, तरी त्या पसाऱ्याकडे अस्वस्थपणे पाहात बसण्यापलीकडे त्याच्या हातात काहीही उरलेले नाही. कारण, कोसळलेली झाडे उचलून पसारा आवरण्याकरितादेखील ही मदत पुरेशी नाही. उन्मळून पडलेल्या झाडांमुळे अक्षरशः हजारो ट्रक भरून गोळा होतील एवढी लाकडे असूनही, कवडीमोलानेही ती उचलण्यास कुणी तयार नसल्याने या भकास पसाऱ्यात कोकणातील संकटग्रस्त माणसे उदासपणे वावरत आहेत. या संकटात होरपळलेल्या एखाद्या माणसाशी संवाद सादला, तर त्याच्या आवाजातूनही अश्रू ओघळतात, असा भास व्हावा... ते जाणण्यासाठी संवेदना असावयास हवी. लोकमान्य समजणाऱ्यांनी तीच खुंटीवर टांगली, आणि या भीषण संकटाची सावलीदेखील आपल्याला शिवणार नाही, याचीच जणू खबरदारी घेतली. असे का झाले असावे हे अनाकलनीय आहे.

किनारी कोकणाचे सौंदर्य पुन्हा प्रस्थापित करण्यास संकटग्रस्त कोकणवासीयांना पुढची किमान पंचवीस वर्षे जिवाचे पाणी करावे लागणार आहे. म्हणजे, एका पिढीचे पूर्ण परिश्रम त्यासाठी त्यांना जमिनीत अक्षरशः गाडावे लागतील. निसर्ग वादळाने किनारपट्टीच्या निसर्गाची हानी केलीच, पण निसर्गामुळेच नुकताच उभारी घेऊ लागलेला पर्यटनाचा व्यवसायही पुरता पुसून टाकला. म्हणजे, शेकडो कुटुंबांच्या चरितार्थाच्या साधनांवरच पाणी फिरविले. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा सारा कणाच निसर्गावर निर्भर होता. तोच पुरता मोडला आहे. अर्थकारणावर तावातावाने चर्चा करून जगास शहाणपणाचे डोस पाजावेत, एवढे तरी या निमित्ताने लोकशक्ती माध्यमांना  वाटले असते, तरी तो एक मानसिक आधार ठऱला असता. पण ते पुण्य साधण्याची संधीच या माध्यमाने गमावली. मानसिकतेमुळे संकेतांना कसा कळत नकळत हरताळ फासला जातो, त्याचे हे उदाहरण... कोकणावर अन्याय करून ही मानसिकता घोर पापाची धनी ठरली आहे. पश्चात्तापानेदेखील ते पाप पुसले जाणार नाही.

कोकणवासी या मानसिकतेमुळे व्यथित आहेत, एवढे सांगण्यासाठीच हा प्रपंच... बाकी आमचे आम्ही पाहून घेऊ. पुन्हा उभे राहू तेव्हा तुम्ही कुठे असावे हे आम्ही ठरवू. एवढी धमक कोकणवासी नक्की दाखवेल...!

- दिनेश गुणे




No comments:

Post a Comment