Thursday, June 25, 2020

भाषेचे जगणे-मरणे...

एका ज्येष्ठ पत्रकार मित्राची अचूक मराठी’वरील एक नोंद वाचली आणि त्यांची तळमळ अस्वस्थ करून गेली. मराठीच्या चिंधड्या उडविण्याची स्पर्धा स्वजनांकडूनच सुरू असून माध्यमे- विशेषत: चित्रवाणी माध्यमे- त्या स्पर्धेत हिरीरिने उतरलेली दिसतात.
त्या नोंदीमुळे मग एक स्वगत -चिंतन- होऊन गेले. सहज वाटलं, हा तर अपरिहार्य बदलाचा प्रभाव आहे.
बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. हे एकदा मान्य केले की आपोआपच बदल स्वीकारायची मानसिकता तयार होते. आणि आपण कसे बदलत गेलो तेही लक्षातदेखील येत नाही. फार पूर्वी, सातआठ पिढ्यांपूर्वी आपल्या घरातील पुरुष मंडळीचा पंचा उपरणं पागोटं असा वेश असायचा, बायका लुगडं नेसायच्या. काळाबरोबर बदल होत गेला, आणि पंचाउपरण्याची जागा धोतर सदऱ्याने घेतली. कालांतराने समाजातच सुधारणा होऊ लागली, विकास होऊ लागला, पायी चालण्याऐवजी मोटारी दिसू लागल्या, आणि सदऱ्यावर कोट आला. वहाणांची जागा चप्पल ने घेतली. काळ आणखी बदलला. धोतर कोट सदऱ्याची जागा ‘पॅंट शर्ट’ने घेतली, चप्पलऐवजी ‘बूट’ आले. पुढे ‘सूट’ आला, पायात ‘शूज’ आले, गळ्यात ‘टाय’ आला, डोक्यावर ‘कॅप’ आली. आता ‘ब्लेझर्स’ वगैरे वापरतो...
हा केवळ वेषातला बदल आहे असे वरवर वाटत असले तरी ते तेवढेच नाही.
मराठी भाषा या वेषाबरोबरच कशी बदलत गेली, त्याचं प्रतिबिंबही या बदलातून दिसतं.
भाषेच्या विकासाची प्रक्रिया सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. तेव्हा फक्त वर्तमानकाळाची भाषा होती. पुढे तीस हजार वर्षांनंतर भूतकाळाची भाषा आली. आता आपण भविष्यकाळाच्याही पुढची भाषा बोलत आहोत, म्हणून मराठीचं काय होणार याची कधीकधी चिंता व्यक्त होते.
काही महिन्यांपूर्वी कधीतरी, *पुण्याच्या* एका एफ्. एम्. स्टेशनवर ‘सलग ३० सेकंद मराठीत बोलून दाखवा’ अशी स्पर्धा घेत होते. *पुण्यात*!
कुणीही बोलू शकले नाही, असं मला कळलं!
मराठीत इंग्रजीची मोठी घुसखोरी झाली आहे.
मागे एकदा, १४ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुपारी बारा-साडेबारा वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर एक भाषण ऐकलं. मराठीतून होतं. ते मी ऐकता ऐकता लिहून घेतलं.
“बाॅडी आणि माईंड यांच्यावर नाॅईज पोल्यूशनचा डायरेक्ट ॲडवर्स इफेक्ट होत असतो. म्हणून लहान मुलांच्या एरियातील नाॅईज पोल्यूशनचे नाॅर्म्स स्ट्रिक्ट असायला हवेत. या सगळ्याचा विचार करून सायन्स रिलेटेड काही गाईडलाईन्स आहेत, ज्या ॲक्ट्व्हिस्टसनी थरो रिसर्च करून चाॅकआऊट केल्या आहेत. रेसिडेन्शियल एरियाला किती नाॅईज एक्स्पोजर असायला हवेत त्याचा सीरियसली विचार करायला हवा. इन शाॅर्ट, नाॅईज पोल्यूशनला लाईटली घेऊन चालणार नाही. कारण ते हेल्थ हजार्ड आहे. इररिव्हर्सिबल हियरिंग  लाॅस झाला नाही तरी बरेचसे ॲडव्हर्स इफेक्टस होऊ शकतात हे सायन्सने सिद्ध केले आहे.”
...नंतर हे मी एका मित्राला ऐकवलं. त्याने खांदे उडवले. तो म्हणाला, इट हॅपन्स! ॲट टाईम्स मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट जातं!
भाषाप्रदूषण. मराठी मरणार नाही, पण प्रदूषित होणार.
या पार्श्भूमीवर मला भाषातज्ञ गणेश देवींचं एक वाक्य कायम आठवतं-
“भाषा कधी मरत नसते. ती मारली जाते- भाषा टिकवणे आपल्या हातात नसेल पण ती मारून टाकू नये. कारण भाषा आपण निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या मारण्याचा अधिकार आपल्याला नाही.”
भाषा जगविणे म्हणजे ती भाषा बोलणारे लोक जगविणे. आपण स्वत:ला तसे जगविले तर भाषा मरणार नाही.
फक्त सध्या आपण भाषा मारतो आहोत की समृद्ध करत आहोत याचा विचार करायला हवा. अर्थात आज एकाच भाषेवाचून काही अडत नाही अशी स्थिती असल्याने आपण भाषेच्या अस्मितेची फार चिंता करत नाही.

No comments:

Post a Comment