Thursday, June 25, 2020

डे-वन : मफलर ते मास्क

-


 आज पुन्हा, ४५ वर्षांनंतर, याच दिवशी, त्याच दिवसाचा एक वेगळाच अंश अनुभवायला मिळतोय. सकाळी जाग आली, तेव्हा तो दिवस आठवला. योगायोगाने नव्हे. अगदी जाणीवपूर्वक. ४५ वर्षांपूर्वी, २६ जूनला... मी साखरप्याच्या घरी, सोप्यात, राजांगणातला पावसाचा धबधबा अनुभवत अंथरुणात लोळत होतो. नुकतं उजाडू लागलं होतं. मस्त, कुंद हवा होती. पावसाळ्याच्या दिवसात साखरप्याच्या घरात असणं हे त्या वेळी माझ्या सुखाच्या कल्पनांतलं परमोच्च सुख होतं. बाहेर कोसळणारा पाऊस, अगदी बसल्या जागी, आमच्या चौसौपी घराच्या मधल्या अंगणात- राजांगणात- एकवटून कोसळायचा, आणि छपराच्या चारही कोपऱ्यांच्या पन्हळीतून अक्षरशः धबाधबा ऊतू जायचा... त्याला एक मस्त लय असायची. अजूनही असते, पण ते दिवस वेगळे होते. कारण, ते अनुभवण्याची मजा त्या वयात अधिक होती. पुढे अनेक पावसाळे पाहिल्यावर, त्यातलं ते वेगळेपणही सवयीचं होतं. म्हणून, प्रत्येक पावसाळ्याचं नवेपण असलं, तरी काही वेगळे पावसाळे मनावर शिंपडतच राहातात. तर, त्या दिवशी तो असाच कोसळत होता, आणि मी अंथरुणावर, डोळे मिटून, त्याचा नाद कानात साठवत पडून होतो. तितक्यात ओटीवरून एक ओळखीच्या आवाजातली हाक आली. मी लाजून ताडकन अंथरुणातून उठलो. कारण, इतक्या उशिरापर्यंत कुणी लोळत पडतो का, असं विचारायचे आणि त्यावर उत्तर न देता, शरम वाटायचे ते दिवसच होते...
बाहेर रमाकांत पाटील होते. आमच्या तालुक्याचे प्रचारक. ठेवणीतल्या, कौटुंबिक आवाजात त्यांनी मला हाक मारली, आणि मी ताजातवाना असल्यासारखा चेहरा करून ओटीवर गेलो.
‘आवरा... आपल्याला निघायचंय. लगेच. वेळ काढू नको.’ उगीचच इकडेतिकडे पाहात दबक्या आवाजात ते म्हणाले, आणि मी बिचकलो.
कुठे निघायचंय, कशाला जायचंय, काहीच कळलं नव्हतं. तरीही कपडे पिशवीत भरले, आणि मागीलदारीच्या चुलीवरच्या कोनाड्यातली शेणीची राखुंडी दातावर खसाखसा घासून चारपाच चुळा भरून मी पुन्हा ओटीवर आलो. मामीने दिलेला चहा आम्ही दोघांनी घेतला. दरम्यान पाटील आणि मामाचं काहीतरी बोलणं झालं होतं.
मग मी पिशवी काखोटीला मारली, आणि पाटलांसोबत बाहेर पडलो. मामाने पाठीवर थोपटून निरोप दिला.
गावाबाहेर तिठ्यावर आलो, तेव्हाही पाऊस भरुभुरत होता. एक ट्रक देवरूख रोडकडे वळला. पाटलांनी हात दाखविला. कुणीतरी अनोळखी ड्रायव्हर होता. त्याने ट्रक थांबविला, आणि आम्ही केबिनमध्ये चढलो. ट्रक देवरूखच्या दिशेने निघाला. तासाभरानंतर मार्लेश्वर तिठ्यावर पाटलांनी ट्रकवाल्याला खूण केली, आणि आम्ही उतरलो. देवरूखहून चंदू तिठ्यावर येऊन थांबलेलाच होता. त्याच्या पाठीवर एक गोणपाटाची मोठी पिशवी, आणि कपडे बांधलेली एक लहान पिशवी होती. काही न बोलता आम्ही मार्लेश्वरच्या दिशेने चालू लागलो.
पाचसहा मैल चालल्यावर पाटलांनी तोंड उघडलं.
‘आणीबाणी लागू झालीय. आपल्यातल्या काही लोकांना पकडणारेत. वॉरंट निघालीयेत. जेलमध्ये सडण्यापेक्षा, लपून जाऊ. भूमिगत होऊ, आणि काहीतरी करू. जेलमध्ये किती दिवस राहावं लागेल, तिथे काय हाल होतील, काहीच कळत नाही. त्यापेक्षा भटकू. कुठेतरी लपून आसरा घेऊ. आपल्या माणसांनी तशी व्यवस्था केलीय’...
आम्ही मान डोलावली, आणि चालू लागलो. चंदूच्या पाठीवरचं गोणपाटाच्या पिशवीतलं ओझं आलटून पालटून पाठीवर घेत निघालो. मार्लेश्वरला पोहोचलो, तेव्हा दुपार वगैरे झाली होती. तेव्हा तिथे आजच्याएवढी वर्दळ नव्हती. संपूर्ण एकान्त. दाट जंगल, आणि आसपास माणसाचा वावरही नाही.
एका मोठ्या दगडाच्या मागे आम्ही सामान लपवलं, आणि एका लहानशा ओहोळाखाली बसून मनसोक्त आंघोळ केली. कपडे बदलले आणि चंदूने बांधून आणलेल्या भाजीभाकरीवर ताव मारला. थोड्या वेळाने गोणपाटाची पिशवी उघडली, आणि माझे डोळे विस्फारले. आत सायक्लोस्टायलिंग मशीनचे मॉडेल होते. हाताने बनविलेले. स्क्रीन प्रिंटिंगसाठी बनवतात, तसे. दोन लाकडी चौकटी बिजागराने जोडलेल्या. एकावर पाट, आणि एकावर जाळी... एक हाताने फिरवायचा रॉड... शाईच्या ट्यूब, कागदांचा गठ्ठा...
चंदू माझ्याकडे बघून नुसतंच हसला. शाळेतून या वस्तू गुपचूप उचलून आणल्या होत्या.
आणीबाणीविरोधातील पत्रके तयार करून गावोगाव त्याचे वितरण करायचे, असं काम आपल्याकडे असेल. पाटील म्हणाले. पण तोवर आणीबाणी म्हणजे काय, त्याचा आपल्याशी संबंध काय, वगैरे काहीच माहीत नव्हतं. तेव्हा आजच्यासारखं मोबाईल, इंटरनेट नव्हतं, आणि आम्ही तर, ‘तेव्हाच्या कव्हरेज एरिया’च्याही पुरते बाहेर...
मग, नुसतंच, ‘आणीबाणी मुर्दाबाद’ असा मजकूर मोठ्या अक्षरात स्टेन्सिल करून स्क्रीनवर चिकटवला, आणि भराभरा पाचपन्नास प्रती काढून झाल्या... पुन्हा सगळं सामान गोणपाटाच्या पिशवीत भरून, पिशवी काखोटीला मारून आम्ही तिथून निघालो.
जाम मजा वाटत होती. काहीतरी वेगळं, थ्रिलींग आहे, हे जाणवत होतं.
पायथ्याच्या गावात आलो, आणि आसपास कुणी नाही याची खात्री करून घेत दोनचार पत्रकं शाळेच्या खिडकीतून आत टाकली...
पुन्हा गुपचूप चालू लागलो. देवरूखच्या दिशेने... पण गावात थांबायचं नव्हतं. एखादा ट्रक पकडायचा, आणि गावाला वळसा घालून पुढे जायचं, हे ठरलं होतं. पाटलांनी सगळा कार्यक्रम व्यवस्थित आखला होता.
रात्र झाली तेव्हा आम्ही धामणीच्या पुढे कुठेतरी उतरलो होतो. पुन्हा पिशव्या पाठीवर घेतल्या, आणि पलीकडे दिसणाऱ्या दाट डोंगराच्या दिशेने चालू लागलो.
दोन घाट्या ओलांडल्यावर झाडीत लपलेलं एक मोठं कौलारू घर दिसू लागलं. आम्हाला तिथेच जायचं होतं. पाटलांनी आमच्यासाठी त्या घराची निवड केली होती. गुप्त जागा. इथे आम्ही आमचं काम सुरू करणार होतो. कुणालाच आमचा सुगावा लागणार नव्हता.
घरात पोहोचलो, तेव्हा ते वयोवृद्ध गृहस्थ आमची वाटच पाहात झोपाळ्यावर बसले होते. पिशव्या पडवीच्या रेज्याला रेलून ठेवून आम्ही समोर खुर्च्यांवर बसलो. जुजबी चौकशा झाल्या, आणि थोड्या वेळाने जेवण तयार असल्याचा निरोप आला. मागीलदारी विहीरीजवळ त्यांनी आपल्या हाताने आमच्या हातापायावर पाणी घातले, ताजेतवाने होऊन आम्ही केळीच्या पानावर जेवायला बसलो. कुळथाचं खमंग पिठलं, आणि वाफाळलेला भात... डावीकडे झणझणीत लसणाची चटणी... अक्षरशः ताव मारला. तोवर नावं वगैरे सांगून झाली होती. माझं नाव ऐकताच त्यांनी- त्यांना आप्पा असे म्हणत- डोळे किंचित बारीक केले, आणि विचारलं, ‘म्हणजे तुमची जात कोणती?’
 मी सटपटलो. आपण सांगितलेल्या आडनावाची जात कोणती हे मलाही माहीत नव्हतं...
‘ नाही, तीच.. आम्ही गुजर’... आप्पांनी मान हलविली, आणि जेवण आटोपल्यावर खुणेनंच मला माझं पान उचलायला सांगितलं. मागोमाग मागीलदारी आले.
‘टाका तुमचं पान म्हशीच्या पुढ्यात’... ते म्हणाले. मी ओळखलं.
आपल्या आडनावामुळे आता इथलं वास्तव्य असंच असणार, मला जाणवलं. मी पान लांबूनच म्हशीच्या पुढ्यात टाकलं, आणि पाथरीजवळ आलो. आप्पांनी त्यांच्या हाताने माझ्या हातावर पाणी घातलं. हातपाय धुवून पुन्हा आम्ही आत आलो, आणि त्यांनी मागच्या पडवीजवळची एक खोली उघडून आम्हाला दिली. ‘इथे तुम्ही राहायचं. बाहेर पडायचं नाही. दिवसा कुणालाही कळता नये’... त्यांनी कडक आवाजात सूचना केल्या, आणि आम्ही तिघे मान हलवून खोलीत गेलो. आतून कडी लावली, आणि गोणपाटाची पिशवी उघडून पुन्हा मशीन जोडलं.
येतायेता पाटलांनी झोपाळ्यावरचं वर्तमानपत्र काखोटीला मारलं होतं. खोलीत गुपचूप वाचन झालं, आणि आणीबाणीचा अर्थ उलगडू लागला... लपून काम करणंच गरजेचं होतं, हे लक्षात आलं. आमचा निर्धार झालाच होता.
‘उद्यापासून आपलं काम सुरू झालं पाहिजे.’ पाटील म्हणाले...
... दुसरा दिवस उजाडण्याआधी आम्ही कामाला लागलो होतो. आणीबाणीच्या विरोधातील घोषणा तयार झाल्या होत्या. मी वेगळ्या अक्षरात त्या स्टेन्सिलवर उतरविल्या, आणि प्रती काढण्यास सुरुवात झाली. शंभर प्रतींचा एक गठ्ठा... तीनचार गठ्ठे दुपारी जेवणाआधी तयार झाले होते.
मग दुपारी पुन्हा आप्पांसोबत, जेवण आटोपलं. या पंक्तीत माझं आणि पाटलांचं पान थोडं बाजूलाच होतं. पण पानात पडणारं अन्न मात्र, सारखंच होतं. त्या काळातल्या वयोवृद्धांची मानसिकता आम्हाला ओळखीची होती.  काहीच वाटलं नाही. तो काळच तसा होता.
जेवणं आटोपल्यावर पुन्हा खोलीत जाऊन आम्ही आडवे झालो. काही वेळातच डाराडूर...
चार साडेचार वाजले असतील. बाहेरून आप्पा कडी वाजवत होते. ‘आहो जोग, गुजर, उठा’... आम्हाला ऐकू येत होतं. पण ते आपल्याला कुठे उठवतायत, असं वाटून आम्ही उठलोच नाही.
आडनावं आम्हालाही नवीनच होती ना...
अखेर आप्पा वैतागले... ‘आणि म्हणे, कामं करणार’... असं काहीतरी बडबडले, आणि आम्ही ताडकन उठलो. बाहेर आलो. झोपाळ्यावर आप्पा बसले, आणि आम्ही समोरच्या खुर्च्यांत बसलो.
चहा झाला. मी माझा कप विसळून मागच्या पडवीत एका बाजूला उलटा घालून ठेवला. चंदूचा कप आपल्यासोबत घेऊन आप्पांनी झोपाळ्याजवळ ठेवला.
संध्याकाळ उलटू लागली, आणि पाटलांनी खुणावलं. आम्ही बाहेर पडलो. एका पिशवीत ते गठ्ठे होते.
गोवा रोडवर येईपर्यंत काळोख झाला होता. आम्ही चालू लागलो. तोंडाला मफलर गुंडाळून संगमेश्वर स्टँडवर आलो, आणि मुंबईकडे जाणाऱ्या दोनचार गाड्यांमध्ये गुपचूप कंडक्टरच्या डोक्यावरल्या कॅरियरमध्ये एकएक गठ्ठा टाकून पसार झालो.
आपण काय केलंय हे दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं.
चिपळुणात गदारोळ झाला होता. एस्टी गाड्यांमध्ये कुणीतरी आणीबाणीविरोधी पत्रकं टाकल्याची वार्ता तोवर सगळीकडे पसरली होती. आता काय होणार, याची कुजबूज सुरू झाली होती.
आम्हाला हे कळलं, आणि मजा वाटली.
अज्ञातवासातले दिवस सुरू झाले होते. घरी बहुधा निरोप पोहोचला होता. आता दिवसभर आप्पांच्या घरात मागल्या पडवीशेजारच्या बंद खोलीत पत्रकं सायक्लोस्टाईल करायची, गठ्ठे बांधायचे, आणि रात्री संगमेश्वर, कधी चिपळूण गाठून एस्टीत टाकून यायचं, एवढंच काम आम्हाला होतं. आम्हाला ते आवडलंही होतं.
काही दिवस आप्पांच्या घरी राहिल्यावर बाहेरची कुजबूज वाढली होती. कुणीतरी आसपासचीच माणसं हे करतायत, असा संशय पसरू लागला होता. अशातच, आम्ही त्या भागात नवखे असल्याने, स्टँडवरच्या काही नजरा उगीचच संशयाने पाहातायत असा भास आम्हालाही होऊ लागला होता. तोंडाला मफलर वगैरे बांधला तर आणखीनच संशय वाढणार होता.
मग मुक्काम हलवावा असं ठरलं, आणि आम्ही एका भल्या पहाटे, उजाडण्याआधी बाहेर पडलो. आप्पांच्या पायाला हात लावून नमस्कार केला, आणि मी म्हणालो, ‘आप्पा, माझं नाव गुजर नाही... मी गुणे’...
आप्पा एकदम गहिवरले. माझ्या पाठीवर मायेनं हात फिरवला, आणि त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला.
‘यशस्वी भव!’
… आम्ही पुढच्या मुक्कामासाठी त्या जंगलातल्या एकांतातून बाहेर पडलो.

(चित्र सौजन्य- लोकसत्ता)

No comments:

Post a Comment