Saturday, June 6, 2020

आत्मनिर्भर महाराष्ट्र


स्वबळावर करोनाचा सामना करणाऱ्या जनतेस दिलासा देण्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनची खरेदी करून राज्याला आत्मनिर्भर करण्याच्या ठाकरे सरकारच्या प्रयत्नांकडे देश उत्सुकतेने पाहात आहे.
------

टाळेबंदीसारख्या उपाययोजनाही निष्प्रभ ठरल्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या वाढतच चालल्याने आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने स्वबळावर करोनाविरुद्धचा लढा लढण्याची तयारी सुरू केली आहे. करोनाच्या उपचारास सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या दहा हजार कुप्या खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 
करोनावरील उपचारात या इंजेक्शनचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचा निर्वाळा आता जागतिक आरोग्य संघटनेने दिला असून, प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासातील पुराव्यांच्या आधारे करोना विषाणुमुळे होणाऱ्या आजारावरील उपचारात याचा आशादायक परिणाम दिसला आहे, असे राज्य सरकारचे मत आहे. हे औषध अत्यंत महाग असून सामान्य गरीब रुग्णांना ते उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने व्यवस्था केली आहे, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
करोनाबाधितांच्या संख्येत दररोज सरासरी अडीच हजारांची वाढ होत असताना महाराष्ट्रात टाळेबंदीचा अंमल टप्प्याटप्प्याने शिथील करण्यास सुरुवात झाली आहे. जनतेने करोनासोबत जगावे यासाठीची मानसिकता तयार करण्याचाच हा अप्रत्यक्ष प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महानगर प्रदेशातील इस्पितळांमध्ये रुग्णांसाठी जागा नाही, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना भीतीने ग्रासले आहे, रुग्णवाहिकाचा तुटवडा, सरकारच्या सज्जड इशाऱ्यास न जुमानता खाजगी इस्पितळांमध्ये सुरू असलेली मनमानी आणि त्यामध्ये होरपळणाऱ्या रुग्णांची तडफड असे सध्याचे महामुंबईतील चित्र आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढते आहे, आणि करोनाच्या विळख्यात सापडलेल्यांच्या करुण कहाण्या भयाचे सावट दाट करीत आहेत. या फैलावाविरुद्धच्या लढाईत यंत्रणांची दमछाक झाली आहे. त्यामुळे, स्वबळावर करोनाचा सामना करणाऱ्या जनतेस दिलासा देण्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनची खरेदी करून राज्याला आत्मनिर्भर करण्याच्या ठाकरे सरकारच्या प्रयत्नांकडे देश उत्सुकतेने पाहात आहे.

अजित पवार यांचा इशारा

करोना रुग्णांवरील उपचारात हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. उपचारांना नकार देणे म्हणजे वैद्यकीय नैतिकतेस हरताळ फासणे आहे, त्यामुळे असे करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असे पवार यांनी वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना सुनावले. टाळेबंदीचे नियम जनतेकडून धाब्यावर बसविले जात असल्याबद्दलही पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा लोकांना धडा शिकवा, असा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
टाळेबंदीचे नियम शिथील केल्याबरोबर जणू करोनाचा फैलाव संपल्याच्या आवेशात पूर्वपदावर येण्याची घाई करणे धोक्याचे असून अंतरभान राखून करोनाला दोन हात दूर ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे या बैठकीत वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

मद्यविक्री जोरात...

राज्यात घरपोच मद्यविक्रीस परवानगी मिळाल्यानंतर गेल्या १५ मे पासून नऊ लाख ४७ हजार ८५१ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यापैकी मुंबई शहर आणि उपनगरांतील ३४ हजार ग्राहकांना घरपोच मद्यपुरवठा करण्यात आला आहे... अवैध मद्यविक्रीप्रकरणी सात हजार २२५ गुन्हे नोंदविले गेले असून, १८ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आम्हाला वाचवा...
दरम्यान, करोनाच्या फैलावामुळे सारे भविष्यच अनिश्चित झाले असून कोणत्याच उपाययोजना डोळ्यासमोर दिसत नसल्याने आता संकट अंगावर घेऊन जगावे लागणार याची जाणीव लोकांना होऊ लागली आहे. व्यापर, उद्योगधंदे कायमचे बंद ठेवले, तर जगण्याचे मार्गच खुंटतील अशा भीतीने व्यापाऱ्यांनी नव्या जीवनपद्धतीस सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये मात्र, भविष्याच्या भयाचे दाट सावट पसरले आहे. पदवी परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजीचे सूर उमटत आहेत.


1 comment:

  1. सुंदर विश्लेषणात्मक लेख.

    ReplyDelete