Sunday, June 7, 2020

प्रश्नचिन्ह !


करोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अमेरिकेत ५१ टक्क्यांनी, तर फ्रान्समध्ये ९० टक्क्यांनी खाली आले आहे. देहदान चळवळीवरही करोनाचे सावट दाटले आहे...
------


जगणं हातात नाही. नसतंच ते. मरणही हातात नसतं. पण आपण जिवंत असेपर्यंत कसं जगावं हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला असायला हवा. मेल्यानंतरही, आपलं काय व्हावं हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला असायला हवा. करोनाच्या महामारीमुळे हे दोन्ही अधिकार हिरावले गेले आहेत. मला जगण्याची चिंता नाही. पण मेल्यानंतर आपल्या देहदान करावं, आणि मागे उरलेल्या कोणासाठी तरी आपल्या देहानं दधीची व्हावं असं मला वाटत होतं... आता त्याची शाश्वती राहिलेली नाही!’...
उद्विग्न मनानं तो बोलत होता. चांगलं आयुष्य जगण्यासाठी जे काही आपल्याकडे असावं लागतं, ते सारं त्याच्यासमोर हात जोडून उभं होतं. आपल्या जगण्याचा आनंद इतरांसोबत वाटून घ्यावा, त्यांच्या आयुष्यातही त्या आनंदाचे चार क्षण उधळावेत, यासाठी तो धडपडत होता. त्यातूनच त्याने पूर्वीच एक निर्णय घेतला. देहदान करायचं... मरणानंतर आपला देहाची नाहक राख होऊ द्यायची नाही. वैद्यकीय क्षेत्राला संशोधनासाठी आपला देह अर्पण करायचा, हे ठरवून त्याने देहदानाची सारी प्रक्रिया जिवंतपणी पूर्ण केली होती. कधीकधी त्याविषयी तो भरभरून बोलायचा. मरणानंतरच्या त्या पुण्यकर्माचा आनंद त्याच्या डोळ्यात जिवंत झालेला स्पष्ट उमटायचा... मृत्यू हा आयुष्यातील सर्वात सुखद सोहळा असावा असं वाटावं, इतकं भरभरून तो देहदानाविषयी बोलू लागला, की ते ऐकणाऱ्या आणखी कुणाच्या मनातही देहदानाचे विचार घोळू लागायचे...
देहदान चळवळीचा तो एक सक्रीय कार्यकर्ता बनला होता. अनेक सोसायट्यांमध्ये, संमेलनांमध्ये, कधी निमंत्रित म्हणून, कधी आगंतुक म्हणूनही जाऊन तो देहदानाचं महत्त्व समजावून सांगायचा.
आता मात्र, त्याचा सूर काळवंडला आहे. त्याच्या इच्छेवर कसलं तरी अगम्याचं ग्रहण दाटलं आहे. देहदान करण्याचा आपला संकल्प पूर्ण होणार, की आपल्या देहाची माती होणार, या चिंतेने त्याचा दिवस काळवंडतो. देहदानाविषयी आता तो उत्साहाने बोलत नाही. त्याच्या बोलण्यात देहदान चळवळीच्या भविष्याचं प्रश्नचिन्ह उमटलेलं दिसतं. देहदान तर दूरच, जिवंतपणी आपण कुणाच्या उपयोगी पडू की नाही याचीदेखील आता शाश्वती नाही, असं काहीतरी तो आता बोलू लागला आहे...
हे खरंच आहे...
करोनाचा विळखा घट्ट होऊ लागल्यापासून माणसांचं जगणंही अनश्चिताच्या विळख्यात सापडलं आहे. मनसारखं जगण्याचा हक्क संपलाच आहे, पण मरणानंतर आपल्या देहाचं काय करायचं, हे ठरविण्याचा हक्कदेखील सध्या संपला आहे. अनपेक्षितपणे झडप घालणाऱ्या मृत्यूने, मरणानंतरच्या देहाची विल्हेवाट लावण्याच्या हक्कावरही घाला घातला आहे.
देहदानासारखी माणसाच्या मनाला मोठेपणा मिळवून देणारी एक चळवळ या साथीमुळे संकटात सापडली आहे.
अवयवदान करून अन्यांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यातील समाधानही या संकटाने संपविले आहे.
सारे काही अनिश्चित झाले आहे. या चळवळींचे भविष्य काय, असा प्रश्न विक्राळपणे भेसूर होऊन भेडसावू लागणार आहे, आणि त्याचा मोठा फटका भविष्यात वैद्यकशास्त्रातील संशोधनकार्यास बसेल, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे.
ह्रदय, मूत्रपिंडे, फुफ्फुसे, डोळे, यकृत असे अवयव निकामी झाल्यामुळे जगणे दुरापास्त झालेले हजारो जीव जगभरात दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्य कंठत असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरातील दीड लाखांहून अधिक माणसे, कोणाच्या तरी अवयवदानाच्या पुण्याईवर आपल्या आयुष्याचा आनंद उपभोगत आहेत. अमेरिकेसारख्या देशात वर्षाकाठी चाळीस हजार रुग्णांवर अवयवरोपण शस्त्रक्रिया होत असल्या, तरी लाखो रुग्ण अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत वेदनामय जीवन जगत असतात, आणि हजारो रुग्ण प्रतीक्षा सहन न झाल्याने जगाचा निरोप घेतात.
करोनामुळे आता अववदानाच्या मोहिमांपुढे नवेच संकट निर्माण झाले आहे.  करोनामुक्त अवयवदाता मिळण्याचे मोठे आव्हान वैद्यकक्षेत्रास भेडसावणार आहे. ही केवळ अमेरिका आणि युरोपीय देशांची नव्हे, तर संपूर्ण जगाची एक  समस्या ठरणार आहे. या समस्येची तीव्रता आता जाणवू लागली आहे, पण भविष्यात ती किती भयाण ठरेल त्याचा साधा अंदाजही आता लागणे अशक्य झाले आहे. 
 करोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अमेरिकेत ५१ टक्क्यांनी, तर फ्रान्समध्ये ९० टक्क्यांनी खाली आल्याचे काही पाहणी अहवालांवरून दिसते. यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे हा पाहणी अहवाल सांगतो. ह्रदय, यकृत, फुफ्फुस प्रत्योरापणाच्या शस्त्रक्रियादेखील करोनाच्या संकटामुळे थंडावल्यामुळे, या अवयवांशी संबंधित व्याधींनी ग्रासलेल्यांच्या जगण्याच्या शक्यताही मंदावत चालल्या आहेत..
या समस्येचा सर्वात मोठा फटका नेत्रहीनांना बसत आहे. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याची भावना अलीकडे समाजात रुजत असतानाच, या साथीमुळे या चळवळीची मोठी हानी झाली आहे. भारतामध्ये वर्षाकाळी जवळपास २५ हजार नेत्रहीनांवर नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया होतात, आणि अंधांचे जीवन दृष्टीने उजळून निघते. प्रत्यक्षात, वर्षाकाठी लाखाहून अधिक अंध नेत्ररोपणाच्या प्रतीक्षेत अंधारमय जीवन जगत असतात. आता करोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे अंधांचे सर्वसाधारण जगणेही अवघड झाले असताना, नेत्रदान चळवळीस बसणारा हा फटका अधिकच अंधार पसरविणारा ठरणार आहे.
अर्थात, वैद्यकीय क्षेत्राने या समस्येमुळे आशा सोडलेली नाही. यातूनही मार्ग काढून, नवजीवन देणाऱ्या या चळवळीस संजीवनी मिळेल, असा या क्षेत्रातील अनेकांचा विश्वास आहे. आजच्या परिस्थितीत मात्र, अवयवदान, देहदान, किंवा नेत्रदानाच्या चळवळीस खीळ बसल्याने, एक मोठे अंधारमय प्रश्नचिन्ह भविष्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे, हे वास्तव आहे.
देहदान करणाऱ्या दधीची ऋषीची गोष्ट पुराणकाळापासून आजवर अमर राहिली आहे. त्या गोष्टीच्या अमरत्वावर काजळी दाटली आहे.




No comments:

Post a Comment