एका अमर दंतकथेची अखेर!
राजकीय पक्ष, चंदेरी दुनिया आणि उद्योगविश्वालाही हवाहवासा वाटणारा अमर सिंह नावाचा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकारामुळे अंथरुणास खिळलेल्या खासदार अमर सिंह यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली, आणि या तीनही क्षेत्रांत शोकाच्या लाटा उसळल्या. राजकारणातले गूढ म्हणून ओळखले जाणारे अमर सिंह आपल्यासोबत राजकीय, उद्योग आणि चित्रपटसृष्टीतील अनेक सहस्यकथांची उकल न करताच परलोकवासी झाले. या क्षेत्रातील त्यांचा सहज वावर ही राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने एक गूढकथा होती. राजकीय कारकीर्दीतील मोठा काळ त्यांनी मुलायमसिंह यादव यांचा विश्वासू सहकारी म्हणून समाजवादी पार्टीसोबत घालविला असला, तरी ते कधीच त्या एकाच नेत्याशी व त्याच पक्षाशी बांधील राहिले नव्हते. काँग्रेसपासून भाजपपर्यंत, साऱ्या पक्षांतील साऱ्या नेत्यांसोबत असलेली अमर सिंह यांची ऊठबस हेच त्यांचा व्यक्तिमत्वातील गूढपणाचे कारण होते. काँग्रेसच्या तंबूतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अमर सिंह यांची उपयुक्तता नेमकी हेरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी त्यांच्याशी दोस्तीचा हात पुढे केला, आणि पार्टीतील भल्याभल्या नेत्यांना मागे सारून अमर सिंह हे पार्टीतले प्रस्थ बनले. समाजवादी पार्टीच्या कारभारावर त्यांनी आपला एवढा अंकुश बसविला, की त्या काळात अमरसिंहांचा शब्द हा पक्षातील अंतिम शब्द मानला जाऊ लागला. उत्तर प्रदेशातील राजकारणाचा चाणक्य म्हणून ओळख असलेल्या अमर सिंहांनी आपल्या राजकीय संबंधांचा धूर्त वापर करून समाजवादी पार्टीला राजकारणाच्या केंद्रस्थानी बसविले. मुलायमसिंह यादव यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसविण्यातही त्यांचाच मोठा वाटा होता. वेगवेगळ्या निवडणुकांतील उमेदवार निवडीचा निर्णय अमरसिंहांनी हिरवा कंदिल दाखविल्याखेरीज पूर्ण होत नसे. पक्षाचे महासचिव आणि राज्यसभा सदस्य असतानाही, अन्य अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध हे अखेरपर्यंत एक गुपित होते. अमरसिंह यांच्या सल्ल्याखेरीज पान हलत नाही, अशा नामवंतांमध्ये एकेकाळी अमिताभ बच्चन यांचाही समावेश होताच. बच्चन कुटुंबासाठी राज्यसभेचे दरवाजे अमरसिंह यांच्यामुळेच खुले झाले, हे गुपित राहिले नव्हते. सिनेसृष्टीतील कलावंतांची लोकप्रियता ओळखून त्यांना राजकारणात आणण्याचे व प्रस्थापित करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे होते. त्यामुळेच, चंदेरी दुनियेतील जेमतेम कारकिर्दीतच अमाप लोकप्रियता मिळविलेली अभिनेत्री जयाप्रदा राजकारणाच्या रंगमंचावर अमर सिंह यांच्यासोबत सहजपणे वावरू लागली.
पुढे समाजवादी पार्टीतील नेतृत्वाच्या वादातून मुलायमपुत्र अखिलेश यादव यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेली, आणि अमर सिंह यांनी समाजवादी पार्टीला नमाजवादी पार्टी असे नाव देऊन टाकले. त्याआधी त्यांना मुलायमसिंहांनी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविलाच होता. त्यांनी राष्ट्रीय लोक मंच नावाचा स्वतःचा पक्षही स्थापन केला, आणि जयाप्रदा यांच्यासोबत पक्षाची पाळेमुळे रुजविण्यासाठी दौरे सुरू केले. पिलिभीतमधील बिलसंडा गावात त्यांची जाहीर सभा होणार होती. या सभेत जयाप्रदा त्यांच्यासोबत आहे अशी जोरदार जाहिरात झाली, आणि सभेला प्रचंड गर्दी लोटली. जयाप्रदा यांचे दर्शन घेण्यासाठी रसिक (श्रोते कि प्रेक्षक?) अक्षरशः उतावीळ झाले होते. बराच वेळ गर्दी ताटकळल्यानंतर अमर सिंहांचे आगमन झाले, आणि जयाप्रदासोबत ते मंचावर आले. लोकांमध्ये अक्षरशः उन्माद संचारला होता. संध्याकाळ उलटून रात्रीचा अंधार पडू लागला होता. अमर सिंह यांनी माईक हातात घेतला, पण लोकांना त्यांचे भाषण ऐकायचे नव्हते. लोकांचा मूड ओळखून जयाप्रदांच्या हाती त्यांनी माईक दिला, आणि पुन्हा एकदा गर्दी अनावर झाली. जयाप्रदा यांना नेता म्हणून नव्हे, तर अभिनेत्री म्हणून पाहाण्यासाठी जनता उत्सुक होती. गर्दीतून फर्माईश सुरू झाली. शिट्ट्यांचा गदारोळ झाला, आणि फर्माईश घुमू लागली. मग जयाप्रदा यांनी भाषण आवरते घेतले, आणि त्या राजकीय मंचावर मुझे नौ लख्खा मंगा दे रे, सईया दिवाने... या गाण्यावर त्यांनी ताल धरला. अमर सिंहांनी सभा जिंकली होती.
राजकारणाच्या मंचावर अभिनेत्यांना आणून पब्लिकला पागल करण्याच्या त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांना घाम फुटत असे, असे म्हणतात. २४ फेब्रुवारी २०१८ या दिवशी अमर सिंह ढसाढसा रडले. श्रीदेवीचा अकाली मृत्यू अमरसिंहांना अस्वस्थ करून गेला. श्रीदेवी आणि आपले एवढे घनिष्ट संबंध होते, की ळ श्रीदेवी बोनी कपूरचे बोलणे कानाआड करेल, पण आपल्या म्हणण्याचा कधीच अनादर करणार नाही, असे सांगत तिच्या अनेक आठवणींनी व्याकुळ होऊन अमर सिंहांना अश्रू अनावर झाले होते. श्रीदेवीच्या निधनाची पहिली खबर देण्यासाठी बोनी कपूरचा पहिला फोन आपल्यालाच आला होता, असे अमर सिंह यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.
राजकारणात घोडेबाजार नावाचा एक गूढ प्रकाराची नेहमीच चर्चा होत असते. अमर सिंह हे अशा घोडेबाजारात निष्णात होते, असेही बोलले जात असे. २००८ मध्ये गाजलेल्या, नोट फॉर वोट प्रकरणात त्यांच्यावर खासदारांच्या खरेदीचा आरोप झाला होता, आणि त्यांना तुरुंगवारीही करावी लागली होती, पण अमरसिंह यांना किंगमेकर म्हणून आणखी एक ओळख मिळाली...
अमरसिंह यांचे सर्वपक्षीय मैत्र हे अखेरपर्यंत सामान्यांसाठी गूढच राहिले. मोदींच्या एका सभेत समोरच्या रांगेत भगवे कपडे परिधान करून हजर असलेल्या अमर सिंह यांच्याकडे पाहात मोदींनी त्याचा उल्लेख केला होता. यांच्याकडे सगळ्यांचीच कुंडली आहे, ती योग्य वेळी ते बाहेर काढतील, असे मोदी म्हणाले, आणि अमर सिंह यांच्याभोवतीचे ते गूढ वलय अधिकच गहिरे झाले. अखेरच्या काही वर्षांत त्यांच्या राजकारणाचे रंगही बदलत गेले. आपली कोट्यवधींची संपत्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दान करून त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रालाच नव्हे, तर स्वतःच्या राजकीय कारकिर्दीलाही धक्का दिला, असे म्हटले जाते.
No comments:
Post a Comment