“विचारा... विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे!”...
चमकदार डोळ्यांची ती चिमुरडी मिश्किल सुरात मला जणू आव्हान देत होती, आणि मागच्या बाजूला आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचणाऱ्या तिच्या बाबांकडे मी पाहिलं.
चष्म्याच्या काचेच्या कोपऱ्यातून आमच्याकडेच चोरून पाहणाऱ्या तिच्या बाबांच्या डोळ्यात भीती उमटली असावी असं मला उगीचच वाटून गेलं, पण तोवर तिचे बाबा सावरले असावेत.
मी त्यांच्याकडे बघून आदराने एक हलकेसे स्मितहास्य केले, आणि आरामखुर्चीत बसलेले तिचे बाबा पुन्हा कावरेबावरे झाले.
‘आता खरंच हा आपल्याला काहीबाही विचारणार’ अशी शंका त्यांच्या डोळ्यात स्पष्ट उमटली, आणि वर्तमानपत्राचा कागद आपल्या चेहऱ्यावर ओढून घेत त्यांनी तोंडच लपविले.
मिश्किल डोळ्यांची ती मुलगी अजूनही खट्याळ हसत माझ्याकडे पाहातच होती.
जणू बाबांना खरंच सगळं माहीत आहे का याची परीक्षाच घ्यायचे तिने ठरवले असावे.
पण बाबांनी पेपराआड चेहरा लपविल्याचे माझ्या लक्षात आले होते.
मुलीच्या मनातील बाबांच्या प्रतिमेस तडा जायला नको म्हणून मी गप्प बसणेच पसंत केले.
पण तिच्या ‘सगळं माहीत असलेल्या’ बाबांना एक प्रश्न विचारावा, असे मनात आलेच होते.
परीक्षा न घेता मुलांना पास करता येणार नाही या कोर्टाच्या निकालावर सगळं माहीत असलेल्या बाबांनी काहीतरी बोलावे, असे मला वाटत होते.
पण बाबांचे आमच्याकडे लक्षच नव्हते. ते पेपरातच डोकं खुपसून बसले होते.
‘जाऊ दे... तुझे बाबा पेपर वाचतायत.. नंतर कधीतरी विचारीन !’ त्या चिमुरडीकडे कौतुकाने पाहून मी म्हणालो, आणि ती काहीशी हिरमुसली होऊन माजघरात पळाली!
पुढे दोनतीन दिवसांनी पुन्हा एकदा असाच, सहज त्यांच्याकडे गेलो, पण ती चुणचुणीत चिमुरडी पुढे आलीच नाही.
बाबाही नेहमीप्रमाणे पेपरात तोंड खुपसून आरामखुर्चीत बसले होते.
मी बाहेर पडलो.
दरवाजाबाहेर अंगणात एक चुणचुणीत मुलगा गोट्या खेळत होता.
माझ्याकडे बघून तो मिश्किल हसला.
बहुतेक त्या चिमुरडीचा मोठा भाऊ असावा.
मी त्याच्याजवळ गेलो, आणि गोट्या खेळायचं थांबवून उभा राहात उलट्या मनगटाने कपाळावरचे केस मागे सारत तो माझ्याकडे पाहून पुन्हा मिश्किल हसला.
‘काय रे, तुझी बहीण कुठे आहे?’ मी विचारले.
‘असेल घरात बसलेली...’ तो काहीसा बेफिकीरीने म्हणाला.
‘पण मी आत्ताच जाऊन आलो, दिसली नाही... आलीच नाही पुढे. नाहीतर आपणहोऊन येऊन सांगायची, “विचारा विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे”...
“आता ती असा आगाऊपणा करणार नाही!” गंभीर होत दरवाजातून आत पाहात तो म्हणाला.
“का रे? काय झालं?” मी.
“त्या दिवशी बाबांनी तिला चांगलं झापलंय. येईलजाईल त्याला म्हणायची, विचारा विचारा... माझ्या बाबांना सगळं माहीत आहे... मग बाबांचा प्राॅब्लेम व्हायचा ... म्हणून बाबांनीच तिला सांगितलं, की, कुणी आलं की बाहेर यायचं नाही. माजघरात बसून अभ्यास करायचा... तेव्हापासून ती येत नाही!”...
एवढं बोलून पुन्हा खाली बसून त्याने लांबवरच्या एका गोटीवर नेम धरत बोटं ताणली.
मी एकवार कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं, आणि रस्ता धरला!
No comments:
Post a Comment