Tuesday, June 30, 2020

कचरा आणि बातमी...

तब्बल सदतीस मिनिटांनंतर त्याने कानाला अडकवलेला इयरफोन काढला, आणि एक मोकळा श्वास घेतला. अशी काही असाईनमेंट असली, की त्याला जाम टेन्शन यायचं. त्यातही लंबचवडी भाषणं ऐकून त्यातून बातमी शोधायची, म्हणजे तर वार्षिक परीक्षेतला गणिताचा पेपर असल्यासारखी छाती धडधडायला लागायची. आजही तसंच झालं. राज्याच्या परिस्थितीवर साहेब आज जनतेशी संवाद साधणार आहेत, त्यावरून छानशी बातमी करा, असा आदेश त्याला व्हॉटसअप ग्रुपवर आला, आणि रस्त्यावरून चालत असतानाच तो थबकला. रस्त्याच्या पलीकडे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा साचला होता. त्यावर माशा घोंघावत होत्या. थोडी दुर्गंधीही सुटली होती. पण त्याचं त्याकडे लक्षच नव्हतं. बसस्टॉपवरच्या बाकड्यावर बसून त्याने मोबाईलमधून साहेबांच्या भाषणाची लिंक उघडली, आणि इयरफोनमधून तो परिचित आवाज त्याच्या कानात घुमला. पुढची सदतीस मिनिटे तो मन लावून भाषण ऐकतच होता. नेहमीचेच शब्द, तीच वाक्यं, तोच विनवणीचा स्वर, तीच कौतुकाची झालर, सारे काही आपण याआधी कितीतरी वेळा ऐकलंय, असं त्याला सारखं वाटत होतं. तरीही संपूर्ण भाषण एकाग्रतेने ऐकून त्यानेही मनातल्या मनात जयहिंद वगैरे म्हटलं, आणि मोबाईल बंद करून खिशात ठेवला...
मग मात्र, त्याला घाम फुटला. एवढ्या लांबलचक भाषणातली बातमी आपल्याला शोधायची आहे, हे त्याला आठवलं. शिवाय, छानशी बातमी करा, असा आदेश होता, हेही आठवलं, आणि त्याच्या घशाला कोरड पडली. या भाषणात नेमकी बातमी काय, त्यात छानसं काय आणि ते कसं शोधायचं, हा प्रश्न त्याला पडला. क्षणभर मन भिरभिरलं... पुन्हा एकदा ते भाषण ऐकून पाहावं, असंही त्याला वाटलं, आणि त्याने मोबाईल काढला. सुरू केला, आणि इयरफोन कानाला लावला... पुन्हा तेच, नेहमीचेच, सवयीचे शब्द कानावर पडले. आता त्याला फक्त ते भाषण ऐकू येत होते. आसपास कुठेही त्याचे लक्ष नव्हते. रस्त्यावरून तुरळक वाहने येजा करत होती. एखाददुसरा माणूसही त्याच्याकडे विचित्रपणे पाहात पुढे जात होता. साध्या माणसांसाठी बसेस बंद असताना हा बसस्टॉपवर कशाला ताटकळतोय, असा भाव त्या नजरेत उमटायचा. पण त्याचे त्याकडे लक्ष नव्हते. त्याचे कान भाषणावर खिळले होते.
पुढची सदतीस मिनिटे गेली, आणि त्याने मोबाईल बंद केला. इयरफोन गुंडाळला, आणि खिशात ठेवून तो पुन्हा विचार करू लागला. यातून नेमकी छानशी बातमी कशी काढायची, हेच त्याला सुचत नव्हते. मुळात, या भाषणात बातमी तरी काय होती, असा प्रश्न त्याला पडला होता.
त्याने अस्वस्थपणे इकडेतिकडे पाहिले, आणि त्याची नजर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे वळली. फाटके कपडे घातलेला, पाठीवर गोणपाटाची पिशवी लटकावलेला, विझलेल्या डोळ्यांचा एक माणूस हातातल्या लोखंडी सळीने कचरा इकडेतिकडे करत होता. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काहीतरी शोधत होता.
आपणही कचरावेचकच आहोत, असा विचार त्या क्षणी मनात येऊन तो स्वतःशीच खिन्नपणे हसला. आता त्याचे संपूर्ण लक्ष त्या कचरा वेचणाऱ्या माणसावर खिळले होते. बातमीचा थोडासा विसरही पडला होता.
अचानक कचरा उपसणाऱ्या त्या माणसाच्या विझलेल्या डोळ्यात एक चमक उमटली. त्याला ती लांबूनही स्पष्ट दिसली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातल्या त्या माणसाने हातातली लोखंडी सळी बाजूला ठेवली, आणि तो खाली वाकला. त्या कचऱ्यातून त्याने काहीतरी वेचलेच होते. ती विकून काहीतरी किंमत मिळेल, याचा त्याला आनंद झाला होता. त्याने ती वस्तू हातात घेतली. उलटीसुलटी करून पाहिली. त्यावर हलकेच हात फिरविला, आणि अंगावरच्या मळक्या फाटक्या शर्टाच्या टोकाने पुसून ती साफ केली. त्याच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. कुणीतरी कचऱ्यात फेकलेल्या त्या वस्तूला त्याच्या दृष्टीने किमत होती. कचरा वेचण्याच्या आजच्या कष्टाचे चीज झाले, असा विचार त्याच्या मनात उमटला होता.
याला तो स्पष्ट वाचता आला होता.
तो स्वतःशीच हसला, आणि कचरा वेचणाऱ्या त्या माणसाचे त्याने मनोमन आभार मानले. कचऱ्यातूनही काहीतरी कामाचे हाती लागते, हा मोलाचा संदेश त्याला ऐन मोक्याच्या क्षणी मिळाला होता.
दुसऱ्याच क्षणाला त्याने मोबाईल काढला, आणि बातमी लिहायला घेतली. सदतीस मिनिटांच्या भाषणातील पंधरावीस वाक्ये रंगवून रंगवून लिहून काढली, आणि त्याला छानसा मथळा देऊन त्याने व्हॉटसअपवरूनच ती बॉसच्या नंबरवर धाडली.
कचऱ्यातून किंमती काहीतरी वेचण्याच्या शिक्षणाचे चीज झाले, असे त्याला वाटले, आणि त्याची पावले पुढे पडू लागली...

Sunday, June 28, 2020

कळ्या जपण्याचा काळ...


जगाच्या पाठीवरील दक्षिण आशियाच्या एका कोपऱ्यातील मालदीव नावाच्या एका लहानशा बेटावरची ही एक विरोधाभासी कहाणी आहे. १९८० पासूनच्या गेल्या चार दशकांत या देशाने विकासाचे सारे मापदंड झपाट्याने आपल्या खिशात घातले. ८० च्या दशकात हा देश जगातील सर्वात दरिद्री देश म्हणून ओळखला जात होता. आज पर्यटन व्यवसायाच्या जोरावर या देशाने आपल्या कपाळावरील दारिद्र्यरेषा जवळपास पुसून मध्यमवर्गीय उत्पन्नगटातील देश म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. येथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ४७ वर्षांवरून ७७ वर्षांपर्यंत वाढले आहे. तब्बल ९६ टक्के मुले प्राथमिक शिक्षणाच्या पटावर नोंदली गेली आहेत, आणि ९६ टक्के मुलांना इंग्रजी या जागतिक भाषेची ओळख झाली आहे... गेल्या २० वर्षांत माता मृत्युदराचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

पण या यशाला एक काळोखी बाजूदेखील आहे. या देशातील हजारबालके अजूनही दारिद्र्याच्या खाईत खितपत पडलेली आहेत, आणि सुमारे ७५ टक्के सुशिक्षित युवक बेरोजगारीचे जिणे जगताहेत. पाचपैकी एक मूल कमजोर आहे, तर साठ टक्के मुलींना शाळकरी वयातच लैंगिक शोषणाची शिकार व्हावे लागले आहे. हिंसाचारी टोळकी ही या देशाची मोठी डोकेदुखी बनली आहे. देशाच्य राजधानीतच, किशोरवयीन मुलांच्या वीस ते ३० टोळ्या हिंसक कारवायांमध्ये गुंतलेल्या आहेत. प्रत्येक टोळीमध्ये किमान ५० ते कमाल ४०० मुले आहेत. त्यामुळे, उच्च माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मात्र जेमतेम ४५ टक्क्यांपर्यंतच आहे. २२ टक्के मुलांना स्थूलपणाच्या विकाराचा विळखा आहे, तर १५ ते २५ वयोगटातील ५० टक्के मुले अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहेत....
मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या तीन बाबींना प्राधन्य देऊन गेल्या काही दशकांत धोरण आखणी करणाऱ्या मालदीवमध्ये दिसणाऱ्या विकासाच्या परिणामांच्या या दोन बाजू हे जगभराचे प्रातिनिधिक चित्र आहे. मालदीवचे उदाहरण अशासाठी, की या देशाने कमीत कमी काळात परिवर्तनाचा एक टप्पा गाठला असला तरी त्याची दुसरी बाजू फार कौतुकास्पद दिसत नाही. जगात अनेक देशांत हीच परिस्थिती आहे. असे जेव्हा होते, तेव्हा त्याच्या दुष्परिणामांची पहिली शिकार बालकेच असतात. संकट किंवा असाधारण परिस्थितीचा पहिला फटका संरक्षणासाठी मोठ्यांवर अवलंबून असलेल्यांनाच बसतो, हे सार्वत्रिक सत्य आहे. म्हणजे, अशा स्थितीत बालकांनाच वेगवेगळ्या हिंसाचाराची शिकार ठरविले जाते. 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालकल्याण निधी (युनिसेफ), जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (युनेस्को) यांनी एकत्रितपणे बालकांवरील हिंसाचारास आळा घालण्याबाबतच्या पाहणीचा जागतिक अहवाल नुकताच प्रसिध्द केला. या अहवालातील वास्तव माणुसकीच्या संवेदनांना सुन्न करणारे आहे. जगभरातील निम्मी, म्हणजे सुमारे एक अब्ज बालके वर्षाकाठी शारीरिक, मानसिक व लैंगिक हिंसाचाराची शिकार ठरतात, असे चिंताजनक वास्तव या अहवालाने सामोरे आणले आहे. जखमा, अपंगत्व किंवा मृत्यूपासून बालकांचे संरक्षण करण्याबाबत ठोस धोरण आखण्यातील जगभरातील उदासीनतेमुळे, भावी पिढीच्या भविष्यावरच या अहवालातील वास्तवाने काळी रेघ उमटविली आहे. जगभरातील सुमारे ८८ टक्के देशांमध्ये बालकांच्या संरक्षणासाठी ठोस कायदे अस्तित्वात आहेत. पण त्यापैकी निम्म्या देशांत या कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणीच होत नाही, असे या पाहणीच्या निमित्ताने उघडकीस आले. 
बालहत्येच्या आणखी एका भीषण वास्तवावर या अहवालाने बोट ठेवले आहे. २०१७ मध्ये जगभरात १८ वर्षांखालील ४० हजार मुलांची हत्या झाली. हे प्रकार पुढे सातत्याने वाढतच चालले आहेत, असे हा अहवाल म्हणतो. 
कोविडच्या महामारीच्या काळात तर मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. शाळाबंदी, संचारबंदी आणि टाळेबंदीमुळे तर, अत्याचारींचे आणि मानसिक विकृतांचे चांगलेच फावले असून मुले त्यांच्या तावडीत सापडणे सोपे झाले आहे. त्यामुळे या काळात मुलांच्या सुरक्षिततेकडे सतर्कतेने लक्ष ठेवले पाहिजे. स्वयंसेवी संस्था, संघटना आणि समाजसेवींनी या कामी पुढाकार घेतला पाहिजे, असे युनिसेफने सुचविले आहे. याच काळात ऑनलाईन द्वेषमूलकतेचे प्रमाणही वाढीस लागले आहे. मानसिक हिंसाचाराची ही सुरुवात असली, तरी मुलांना या भीतीने ग्रासण्यास सुरुवात झाली असून त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आज घरात स्वतःस बंद करून घेतलेल्या मुलांन या भयामुळे उद्या घराबाहेर पडणे, शाळेत जाणेही असुरक्षित वाटू लागेल, अशी शंका बालकांच्या सुरक्षिततेविषयी अभ्यास करणाऱ्या या गटास वाटते. त्यामुळे, भविष्यात जेव्हा शाळा नियमित सुरु होतील, तेव्हा तेथील वातावरण अधिक सुरक्षित असेल याची हमी मुलांना मिळण्याची गरज आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणपद्धती विकसिक होऊ पाहात आहे, ही चांगली बाब असली, तरी ऑनलाईन संपर्कातूनच मानसिक अत्याचारांचे प्रकारही वाढीस लागले आहेत. लैंगिक आणि विकृत वर्तणूकीचे प्रमाणही वाढत आहे, आणि असे प्रकार म्हणजे मानसिक हिंसाचारच आहेत. घरात कोंडून घेतल्यामुळे मुलांचे मोकळेपणाचे वर्तुळच आकसले आहे. पालकांसोबत राहूनही, सगळेच आपापल्या कामात व्यग्र असल्याने, त्यांच्या मोकळेपणात मुलांसाठी मिळणारा वेळ प्रत्यक्षात मात्र कमी झाला आहे. मित्र, नातेवाईक किंवा समव्यवसायींचा थेट संपर्क तुटल्यामुळे मानसिक आधार काहीसे कमकुवत होत चालले आहेत, आणि त्यातून मुलांना सावरणे व पुन्हा त्यांच्या रुळलेल्या जीवनशैलीत आणणे हे पुढील काळाचे मोठे आव्हान असेल, 
अशा आव्हानात्मक काळात समाज आणि सरकारांना मोठी जबाबदार भूमिका वठवावी लागणार आहे. त्याकरिता व्यापक विचारमंथनाची आणि संभाव्य समस्यांची उत्तरे आत्ताच शोधण्याची गरज आहे. तसे झाले नाही, तर मानसिक किंवा शारीरिक हिंसाचाराच्या वाढत्या प्रकारांत भविष्यातील एका पिढीची मोठी हानी होण्याची भीती आहे. ते टाळायचे असेल, तर, करोनाच्या महामारीनंतरचे असे एक नवे जग आपल्याला उभे करावे लागेल, जेथे मुलांचे विश्व आश्वस्त आणि भयमुक्त असेल. केवळ भतिक विकासाची साधने मानसिक विकृतीला आळा घालू शकत नाहीत, भविष्यात मानसिक विकासाची मोठी गरज भासणार आहे. टाळेबंदी आणि संचारबंदीमुळे मानसिक विकासास आलेल्या मर्यादांची दरी बुजविणे हे आता काळाने माणसासमोर ठेवलेले आव्हान आहे. जागतिक आरोग्य संघटनेने योग्य वेळी हा प्रश्न ऐरणीवर आणून जगाला जागे केले आहे.  

Thursday, June 25, 2020

डे-वन : मफलर ते मास्क

-


 आज पुन्हा, ४५ वर्षांनंतर, याच दिवशी, त्याच दिवसाचा एक वेगळाच अंश अनुभवायला मिळतोय. सकाळी जाग आली, तेव्हा तो दिवस आठवला. योगायोगाने नव्हे. अगदी जाणीवपूर्वक. ४५ वर्षांपूर्वी, २६ जूनला... मी साखरप्याच्या घरी, सोप्यात, राजांगणातला पावसाचा धबधबा अनुभवत अंथरुणात लोळत होतो. नुकतं उजाडू लागलं होतं. मस्त, कुंद हवा होती. पावसाळ्याच्या दिवसात साखरप्याच्या घरात असणं हे त्या वेळी माझ्या सुखाच्या कल्पनांतलं परमोच्च सुख होतं. बाहेर कोसळणारा पाऊस, अगदी बसल्या जागी, आमच्या चौसौपी घराच्या मधल्या अंगणात- राजांगणात- एकवटून कोसळायचा, आणि छपराच्या चारही कोपऱ्यांच्या पन्हळीतून अक्षरशः धबाधबा ऊतू जायचा... त्याला एक मस्त लय असायची. अजूनही असते, पण ते दिवस वेगळे होते. कारण, ते अनुभवण्याची मजा त्या वयात अधिक होती. पुढे अनेक पावसाळे पाहिल्यावर, त्यातलं ते वेगळेपणही सवयीचं होतं. म्हणून, प्रत्येक पावसाळ्याचं नवेपण असलं, तरी काही वेगळे पावसाळे मनावर शिंपडतच राहातात. तर, त्या दिवशी तो असाच कोसळत होता, आणि मी अंथरुणावर, डोळे मिटून, त्याचा नाद कानात साठवत पडून होतो. तितक्यात ओटीवरून एक ओळखीच्या आवाजातली हाक आली. मी लाजून ताडकन अंथरुणातून उठलो. कारण, इतक्या उशिरापर्यंत कुणी लोळत पडतो का, असं विचारायचे आणि त्यावर उत्तर न देता, शरम वाटायचे ते दिवसच होते...
बाहेर रमाकांत पाटील होते. आमच्या तालुक्याचे प्रचारक. ठेवणीतल्या, कौटुंबिक आवाजात त्यांनी मला हाक मारली, आणि मी ताजातवाना असल्यासारखा चेहरा करून ओटीवर गेलो.
‘आवरा... आपल्याला निघायचंय. लगेच. वेळ काढू नको.’ उगीचच इकडेतिकडे पाहात दबक्या आवाजात ते म्हणाले, आणि मी बिचकलो.
कुठे निघायचंय, कशाला जायचंय, काहीच कळलं नव्हतं. तरीही कपडे पिशवीत भरले, आणि मागीलदारीच्या चुलीवरच्या कोनाड्यातली शेणीची राखुंडी दातावर खसाखसा घासून चारपाच चुळा भरून मी पुन्हा ओटीवर आलो. मामीने दिलेला चहा आम्ही दोघांनी घेतला. दरम्यान पाटील आणि मामाचं काहीतरी बोलणं झालं होतं.
मग मी पिशवी काखोटीला मारली, आणि पाटलांसोबत बाहेर पडलो. मामाने पाठीवर थोपटून निरोप दिला.
गावाबाहेर तिठ्यावर आलो, तेव्हाही पाऊस भरुभुरत होता. एक ट्रक देवरूख रोडकडे वळला. पाटलांनी हात दाखविला. कुणीतरी अनोळखी ड्रायव्हर होता. त्याने ट्रक थांबविला, आणि आम्ही केबिनमध्ये चढलो. ट्रक देवरूखच्या दिशेने निघाला. तासाभरानंतर मार्लेश्वर तिठ्यावर पाटलांनी ट्रकवाल्याला खूण केली, आणि आम्ही उतरलो. देवरूखहून चंदू तिठ्यावर येऊन थांबलेलाच होता. त्याच्या पाठीवर एक गोणपाटाची मोठी पिशवी, आणि कपडे बांधलेली एक लहान पिशवी होती. काही न बोलता आम्ही मार्लेश्वरच्या दिशेने चालू लागलो.
पाचसहा मैल चालल्यावर पाटलांनी तोंड उघडलं.
‘आणीबाणी लागू झालीय. आपल्यातल्या काही लोकांना पकडणारेत. वॉरंट निघालीयेत. जेलमध्ये सडण्यापेक्षा, लपून जाऊ. भूमिगत होऊ, आणि काहीतरी करू. जेलमध्ये किती दिवस राहावं लागेल, तिथे काय हाल होतील, काहीच कळत नाही. त्यापेक्षा भटकू. कुठेतरी लपून आसरा घेऊ. आपल्या माणसांनी तशी व्यवस्था केलीय’...
आम्ही मान डोलावली, आणि चालू लागलो. चंदूच्या पाठीवरचं गोणपाटाच्या पिशवीतलं ओझं आलटून पालटून पाठीवर घेत निघालो. मार्लेश्वरला पोहोचलो, तेव्हा दुपार वगैरे झाली होती. तेव्हा तिथे आजच्याएवढी वर्दळ नव्हती. संपूर्ण एकान्त. दाट जंगल, आणि आसपास माणसाचा वावरही नाही.
एका मोठ्या दगडाच्या मागे आम्ही सामान लपवलं, आणि एका लहानशा ओहोळाखाली बसून मनसोक्त आंघोळ केली. कपडे बदलले आणि चंदूने बांधून आणलेल्या भाजीभाकरीवर ताव मारला. थोड्या वेळाने गोणपाटाची पिशवी उघडली, आणि माझे डोळे विस्फारले. आत सायक्लोस्टायलिंग मशीनचे मॉडेल होते. हाताने बनविलेले. स्क्रीन प्रिंटिंगसाठी बनवतात, तसे. दोन लाकडी चौकटी बिजागराने जोडलेल्या. एकावर पाट, आणि एकावर जाळी... एक हाताने फिरवायचा रॉड... शाईच्या ट्यूब, कागदांचा गठ्ठा...
चंदू माझ्याकडे बघून नुसतंच हसला. शाळेतून या वस्तू गुपचूप उचलून आणल्या होत्या.
आणीबाणीविरोधातील पत्रके तयार करून गावोगाव त्याचे वितरण करायचे, असं काम आपल्याकडे असेल. पाटील म्हणाले. पण तोवर आणीबाणी म्हणजे काय, त्याचा आपल्याशी संबंध काय, वगैरे काहीच माहीत नव्हतं. तेव्हा आजच्यासारखं मोबाईल, इंटरनेट नव्हतं, आणि आम्ही तर, ‘तेव्हाच्या कव्हरेज एरिया’च्याही पुरते बाहेर...
मग, नुसतंच, ‘आणीबाणी मुर्दाबाद’ असा मजकूर मोठ्या अक्षरात स्टेन्सिल करून स्क्रीनवर चिकटवला, आणि भराभरा पाचपन्नास प्रती काढून झाल्या... पुन्हा सगळं सामान गोणपाटाच्या पिशवीत भरून, पिशवी काखोटीला मारून आम्ही तिथून निघालो.
जाम मजा वाटत होती. काहीतरी वेगळं, थ्रिलींग आहे, हे जाणवत होतं.
पायथ्याच्या गावात आलो, आणि आसपास कुणी नाही याची खात्री करून घेत दोनचार पत्रकं शाळेच्या खिडकीतून आत टाकली...
पुन्हा गुपचूप चालू लागलो. देवरूखच्या दिशेने... पण गावात थांबायचं नव्हतं. एखादा ट्रक पकडायचा, आणि गावाला वळसा घालून पुढे जायचं, हे ठरलं होतं. पाटलांनी सगळा कार्यक्रम व्यवस्थित आखला होता.
रात्र झाली तेव्हा आम्ही धामणीच्या पुढे कुठेतरी उतरलो होतो. पुन्हा पिशव्या पाठीवर घेतल्या, आणि पलीकडे दिसणाऱ्या दाट डोंगराच्या दिशेने चालू लागलो.
दोन घाट्या ओलांडल्यावर झाडीत लपलेलं एक मोठं कौलारू घर दिसू लागलं. आम्हाला तिथेच जायचं होतं. पाटलांनी आमच्यासाठी त्या घराची निवड केली होती. गुप्त जागा. इथे आम्ही आमचं काम सुरू करणार होतो. कुणालाच आमचा सुगावा लागणार नव्हता.
घरात पोहोचलो, तेव्हा ते वयोवृद्ध गृहस्थ आमची वाटच पाहात झोपाळ्यावर बसले होते. पिशव्या पडवीच्या रेज्याला रेलून ठेवून आम्ही समोर खुर्च्यांवर बसलो. जुजबी चौकशा झाल्या, आणि थोड्या वेळाने जेवण तयार असल्याचा निरोप आला. मागीलदारी विहीरीजवळ त्यांनी आपल्या हाताने आमच्या हातापायावर पाणी घातले, ताजेतवाने होऊन आम्ही केळीच्या पानावर जेवायला बसलो. कुळथाचं खमंग पिठलं, आणि वाफाळलेला भात... डावीकडे झणझणीत लसणाची चटणी... अक्षरशः ताव मारला. तोवर नावं वगैरे सांगून झाली होती. माझं नाव ऐकताच त्यांनी- त्यांना आप्पा असे म्हणत- डोळे किंचित बारीक केले, आणि विचारलं, ‘म्हणजे तुमची जात कोणती?’
 मी सटपटलो. आपण सांगितलेल्या आडनावाची जात कोणती हे मलाही माहीत नव्हतं...
‘ नाही, तीच.. आम्ही गुजर’... आप्पांनी मान हलविली, आणि जेवण आटोपल्यावर खुणेनंच मला माझं पान उचलायला सांगितलं. मागोमाग मागीलदारी आले.
‘टाका तुमचं पान म्हशीच्या पुढ्यात’... ते म्हणाले. मी ओळखलं.
आपल्या आडनावामुळे आता इथलं वास्तव्य असंच असणार, मला जाणवलं. मी पान लांबूनच म्हशीच्या पुढ्यात टाकलं, आणि पाथरीजवळ आलो. आप्पांनी त्यांच्या हाताने माझ्या हातावर पाणी घातलं. हातपाय धुवून पुन्हा आम्ही आत आलो, आणि त्यांनी मागच्या पडवीजवळची एक खोली उघडून आम्हाला दिली. ‘इथे तुम्ही राहायचं. बाहेर पडायचं नाही. दिवसा कुणालाही कळता नये’... त्यांनी कडक आवाजात सूचना केल्या, आणि आम्ही तिघे मान हलवून खोलीत गेलो. आतून कडी लावली, आणि गोणपाटाची पिशवी उघडून पुन्हा मशीन जोडलं.
येतायेता पाटलांनी झोपाळ्यावरचं वर्तमानपत्र काखोटीला मारलं होतं. खोलीत गुपचूप वाचन झालं, आणि आणीबाणीचा अर्थ उलगडू लागला... लपून काम करणंच गरजेचं होतं, हे लक्षात आलं. आमचा निर्धार झालाच होता.
‘उद्यापासून आपलं काम सुरू झालं पाहिजे.’ पाटील म्हणाले...
... दुसरा दिवस उजाडण्याआधी आम्ही कामाला लागलो होतो. आणीबाणीच्या विरोधातील घोषणा तयार झाल्या होत्या. मी वेगळ्या अक्षरात त्या स्टेन्सिलवर उतरविल्या, आणि प्रती काढण्यास सुरुवात झाली. शंभर प्रतींचा एक गठ्ठा... तीनचार गठ्ठे दुपारी जेवणाआधी तयार झाले होते.
मग दुपारी पुन्हा आप्पांसोबत, जेवण आटोपलं. या पंक्तीत माझं आणि पाटलांचं पान थोडं बाजूलाच होतं. पण पानात पडणारं अन्न मात्र, सारखंच होतं. त्या काळातल्या वयोवृद्धांची मानसिकता आम्हाला ओळखीची होती.  काहीच वाटलं नाही. तो काळच तसा होता.
जेवणं आटोपल्यावर पुन्हा खोलीत जाऊन आम्ही आडवे झालो. काही वेळातच डाराडूर...
चार साडेचार वाजले असतील. बाहेरून आप्पा कडी वाजवत होते. ‘आहो जोग, गुजर, उठा’... आम्हाला ऐकू येत होतं. पण ते आपल्याला कुठे उठवतायत, असं वाटून आम्ही उठलोच नाही.
आडनावं आम्हालाही नवीनच होती ना...
अखेर आप्पा वैतागले... ‘आणि म्हणे, कामं करणार’... असं काहीतरी बडबडले, आणि आम्ही ताडकन उठलो. बाहेर आलो. झोपाळ्यावर आप्पा बसले, आणि आम्ही समोरच्या खुर्च्यांत बसलो.
चहा झाला. मी माझा कप विसळून मागच्या पडवीत एका बाजूला उलटा घालून ठेवला. चंदूचा कप आपल्यासोबत घेऊन आप्पांनी झोपाळ्याजवळ ठेवला.
संध्याकाळ उलटू लागली, आणि पाटलांनी खुणावलं. आम्ही बाहेर पडलो. एका पिशवीत ते गठ्ठे होते.
गोवा रोडवर येईपर्यंत काळोख झाला होता. आम्ही चालू लागलो. तोंडाला मफलर गुंडाळून संगमेश्वर स्टँडवर आलो, आणि मुंबईकडे जाणाऱ्या दोनचार गाड्यांमध्ये गुपचूप कंडक्टरच्या डोक्यावरल्या कॅरियरमध्ये एकएक गठ्ठा टाकून पसार झालो.
आपण काय केलंय हे दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं.
चिपळुणात गदारोळ झाला होता. एस्टी गाड्यांमध्ये कुणीतरी आणीबाणीविरोधी पत्रकं टाकल्याची वार्ता तोवर सगळीकडे पसरली होती. आता काय होणार, याची कुजबूज सुरू झाली होती.
आम्हाला हे कळलं, आणि मजा वाटली.
अज्ञातवासातले दिवस सुरू झाले होते. घरी बहुधा निरोप पोहोचला होता. आता दिवसभर आप्पांच्या घरात मागल्या पडवीशेजारच्या बंद खोलीत पत्रकं सायक्लोस्टाईल करायची, गठ्ठे बांधायचे, आणि रात्री संगमेश्वर, कधी चिपळूण गाठून एस्टीत टाकून यायचं, एवढंच काम आम्हाला होतं. आम्हाला ते आवडलंही होतं.
काही दिवस आप्पांच्या घरी राहिल्यावर बाहेरची कुजबूज वाढली होती. कुणीतरी आसपासचीच माणसं हे करतायत, असा संशय पसरू लागला होता. अशातच, आम्ही त्या भागात नवखे असल्याने, स्टँडवरच्या काही नजरा उगीचच संशयाने पाहातायत असा भास आम्हालाही होऊ लागला होता. तोंडाला मफलर वगैरे बांधला तर आणखीनच संशय वाढणार होता.
मग मुक्काम हलवावा असं ठरलं, आणि आम्ही एका भल्या पहाटे, उजाडण्याआधी बाहेर पडलो. आप्पांच्या पायाला हात लावून नमस्कार केला, आणि मी म्हणालो, ‘आप्पा, माझं नाव गुजर नाही... मी गुणे’...
आप्पा एकदम गहिवरले. माझ्या पाठीवर मायेनं हात फिरवला, आणि त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला.
‘यशस्वी भव!’
… आम्ही पुढच्या मुक्कामासाठी त्या जंगलातल्या एकांतातून बाहेर पडलो.

(चित्र सौजन्य- लोकसत्ता)