Saturday, May 16, 2020

कुठे ठेवायची एवढी संपत्ती?...

असं म्हणतात, की मनुष्यबळ ही संपत्ती आहे. खरं आहे ते. पण केवळ साठत जाणाऱ्या संपत्तीतून काही परतावा मिळायला हवा. त्यासाठी संपत्तीच्या गुंतवणुकीचे नियोजन करायला हवे. भारतासारख्या मनुष्यबळ संपन्न देशाचे चित्र काय आहे? संपत्ती साठत चालली आहे, तसतसे तिचे ओझे वाढत आहे. काही दशकांत असे होईल, की माणसाला जेमतेम स्वत:पुरती जागा (स्पेस) शोधण्यासाठी धडपडावं लागेल. कारण लोकसंख्या वाढते आहे, आणि तिला सामावून घेणारा भूभाग मात्र तितकाच राहणार आहे.
अशा स्थितीत, मनुष्यबळ संपत्तीचे नियोजन ही समस्या उभी राहणार आहे.
काय आहे या संपत्तीचे वर्तमानातील वास्तव?
***
कोणताही सिद्धान्त सिद्ध होण्यासाठी एक अट असते. ‘इतर परिस्थिती सामान्य असेल तर’... ही ती अट. म्हणजे, सारे काही सुरळीत, जगरहाटीनुसार सुरू असेल, तरच कोणत्याही शास्त्राचे सिद्धान्त खरे ठरतात. कारण असे सिद्धान्त हे पूर्वानुभवाच्या आणि वर्तमानातील सुरळीत स्थितीच्या आधारावरच मांडले जात असतात. म्हणजे, अघटित किंवा अनपेक्षित परिस्थितीत प्रस्थापित सिद्धान्त सार्थ ठरत नाहीत.
म्हणूनच, जागतिक लोकसंख्यावाढीच्या आजवरच्या गणिती सिद्धान्तांच्या आधारावर येत्या काही दशकांत मांडले गेलेले भविष्यातील लोकसंख्येचे आकडे किती खरे ठरतील, हा मुद्दा महत्वाचा आहे. जागतिक लोकसंख्यावाढीचा गेल्या दोन हजार वर्षांचा किंवा त्याआधीचा इतिहास, गेल्या काही दशकांमध्ये त्यामध्ये होणारे चढउतार आणि त्यांच्या आधारावर वर्तविण्यात आलेली जगाच्या लोकसंख्येची आगामी भाकिते लक्षात घेतली, तर आज ७७८ कोटींच्या घरात असलेल्या जगाच्या लोकसंख्येने येत्या तीस वर्षांत, २०५० पर्यंत, एक हजार कोटींचा आकडा पार केलेला असेल. जगाच्या लोकसंख्येपैकी तब्बल १७.७ टक्के लोकसंख्या असलेला भारत हा चीनपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. आजवरच्या भारताचा लोकसंख्यावाढीच्या संख्याशास्त्रानुसार, येत्या तीन दशकांत, लोकसंख्यावाढीचा आजवरचा वेग मंदावणार असला तरी, सन २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १६४ कोटींवर पोहोचलेली असेल, आणि भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असेल. आज देशातील दर चौरस किलोमीटर क्षेत्रात ४६४ लोकसंख्या राहते. येत्या तीस वर्षांत लोकसंख्यावाढीमुळे ही दाटी अधिकच गडद होणार असून, २०५० मध्ये लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरमागे ५५१ इतकी असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
जागतिक पातळीवरील विविध क्षेत्रांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या वर्ल्डओमीटर नावाच्या अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय समूहाकडून लोकसंख्येचा जवळपास प्रत्येक क्षणाचा तपशील गोळा केला जातो. या समूहाच्या नोंदीनुसार, ख्रिस्तपूर्व आठ हजार साली जेमतेम ५० लाख लोकसंख्या असलेल्या मानवजातीस शेतीचे तंत्र अवगत होत गेले आणि लोकसंख्यावाढीचा वेग वाढत गेला. पहिल्या इसवी सनात २० कोटींपर्यंत लोकसंख्या असलेल्या जगातील मानवजातीच्या प्रगतीचा वेग आणि लोकसंख्यावाढीचा वेग जवळपास सारखाच राहिला. सन १८०० मध्ये १०० कोटींचा टप्पा गाठला गेला, आणि पुढे १९३० पर्यंतच्या जेमतेन १३० वर्षांत लोकसंख्येने दोनशे कोटींची मजल मारली. पुढे केवळ ३० वर्षांतच जगाच्या लोकसंख्येने दुपटीचा टप्पा गाठला, आणि नंतर दुपटीकडे झेपावण्याचा कालावधीही कमी होत गेला. १९८७ पर्यंत लोकसंख्येने ५०० कोटींची मजल मारली होती. आता मात्र हा वेग पुन्हा एकदा मंदावत चालला असून जगाच्या आजच्या लोकसंख्येने दुपटीचा, म्हणजे १५५० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी पुढील २०० वर्षांची वाटचाल करावी लागेल, असा या अभ्यासगटाचा अंदाज आहे.
जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या चीनची आजची लोकसंख्या १४३.८६ कोटी इतकी आहे. मात्र, लोकसंख्यावाढीचा वेग उणे करण्यावर चीनचा भर असल्याने, २०५० पर्यंत तेथील लोकसंख्या आजच्यापेक्षा कमी, म्हणजे १४० कोटींवर स्थिरावलेली असेल असा वर्ल्डओमीटर गटाचा अंदाज आहे. भारत आणि चीन या पहिल्या रांगेतील दोन देशांची तुलना केली, तर भारताचे भविष्य काहीसे भयावह वाटावे असे असेल. आज दर चौरस किलोमीटरमध्ये ४६४ एवढी लोकसंख्येची घनता असलेल्या भारतात जेव्हा ही गर्दी आणखी वाढेल, तेव्हा चीनकडील घनता मात्र, दर चौरस किलोमीटरमागे १५३ वरून १४९ पर्यंत कमी झालेली असेल.
परिस्थिती सामान्य राहिली, तर भविष्यातील भारताचे हे गर्दीचे चित्र आनंददायी असेल, की भयप्रद असेल याचा विचार करण्यासाठी या अभ्यास गटाचे हे संशोधन नक्कीच उपयोगी आहे.

Wednesday, May 13, 2020

एक जीवघेणी हातमिळवणी...


किती जीव घेतल्यानंतर करोनाचा कहर संपेल, मुळात तो संपणार आहे की नाही, अशा भयचिन्हांचे भाव माणसामाणसाच्या मनावर उमटले असताना, आजवर असंख्य जीवघेण्या सवयी आपण प्रेमाने सोबत बाळगल्या याचे मात्र भान राहिलेले नाही. वर्षाकाठी लाखो बळी घेणाऱ्या व्यसनांच्या विळख्यातून मुक्त झाले नाही, तर ही व्यसनेच करोनाचे काम सोपे करण्यास मदत करतील हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आणि दारू, हा अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार मानला जात असल्याने, जेव्हाजेव्हा अर्थव्यवस्थेस घरघर लागते, तेव्हातेव्हा या आधाराचे दरवाजे अधिक उघडले जातात. करोनाकाळात दारूविक्रीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या गदारोळाने हे सिद्ध केले आहे. दारू आणि तंबाखू ही हातात हात घालून वावरणारी व्यसने असल्याने, दारूसोबत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची बाजारपेठही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरसावणार हे स्पष्ट आहे. म्हणूनच, याच निमित्ताने तंबाखूच्या विळख्याचा मागोवा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
एका अधिकृत आकडेवारीनुसार, जगभरात तंबाखूमुळे वर्षाकाठी ८० लाख लोकांचा मृत्यू ओढवतो. ही अंगावर शहारे आणणारी वस्तुस्थिती आहेच, पण तंबाखूजन्य धूम्रपानाच्या अप्रत्यक्ष संसर्गामुळे बारा लाख लोकांना अकारण मृत्यूचे सावज व्हावे लागते, ही त्याहूनही अधिक भयानक बाब आहे. तंबाखूचे व्यसन हे स्वस्थ श्वसनक्रियेसमोरील मोठा अडथळा आहे, हे आता या व्यसनाच्या विळख्यात स्वतःस गुंतवून घेतलेल्यासही ठाऊक झालेले आहे. तंबाखूमुळे श्वसनविकार बळावतात, त्यामुळे तंबाखूचे किंवा धूम्रपानाचे व्यसन असलेल्या व्यक्तीना करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या अलीकडच्या पाहणीतूनच स्पष्ट झाले आहे. कोव्हिड-१९ हा श्वसनक्रियेवर आघात करणारा व फुफ्फुसे निकामी करणारा संसर्गजन्य आजार आहे, आणि धूम्रपानामुळे या आजाराशी संघर्ष करण्याची क्षमता कमकुवत होते. त्यामुळे या आजारापासून स्वतःस वाचवायचे असेल, तर धूम्रपान आणि तंबाखू सेवनापासून दूर राहावयास हवे. माध्यमांनी यासाठीच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. तंबाखू किंवा धूम्रपानमुक्तीसाठी काही पर्यायी उपचारपद्धती उपयुक्त ठरू लागल्या आहेत. त्याचा अवलंब करून किंवा मानसिक निर्धार करून तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त होणे ही करोनाविरोधी लढ्याची मोठी गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी पुढाकार घेतला असून जागृती व व्यसनमुक्तीसाठी सहकार्य करणारी यंत्रणादेखील उभी केली आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आणि त्याच्या परिणामांची दाहकता, उपाययोजना आदींच्या माहितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचा हा अभ्यास उपयुक्त ठरेल. 


जेव्हा मानवता जागी होते...

करोनाच्या जीवघेण्या विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असताना आफ्रिकी देशांमध्ये आणखी एका नव्या संकटाचे सावट पसरले आहे. येत्या काही दिवसांत आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये हिवतापाची तीव्र साथ पसरण्याची चिन्हे असून या आजाराचा प्रचंड फैलाव होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या काळात या देशांच्या संकटविरोधी लढाईत भारतानेही सहकार्याचा हात पुढे केला असून, कीटकनाशकांचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे.
करोनासंसर्गामुळे सध्या देशात अनेक उद्योगधंदे जवळपास बंद असले, तरी केंद्रीय रसायन आणि खत विभागाच्या अखत्यारीतील हिंदुस्तान इंटेक्टिसाईड कंपनीमध्ये मात्र कीटकनाशकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना पिकांवरील फवारणीकरिता कीटकनाशकांचा तुटवडा भासू नये यासाठी या कंपनीने डीडीटी टेक्निकल, डीडीटी ५०% डब्ल्यूपी, मलाथियॉन टेक्निकल, हिलगोल्ड आदी कीटकनाशकांचे उत्पादन सुरू ठेवले आहे. मलाथियॉन या कीटकनाशकाचा वापर टोळधाड नियंत्रणासाठी केला जातो. राजस्थान, आणि गुजरातमध्ये सध्या या कीटकनाशकाची मोठ्या प्रमाणावर गरज आहे.
आता आफ्रिकी देशांना हिवतापाच्या सावटातून सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणांवर कीटकनाशकांची फवारणी आवश्यक आहे, हे ओळखून या कंपनीने या देशांशी पत्रव्यवहार सुरू केला असून, डीडीटीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे.
संकटकाळात मानवतेने देशादेशांती भौगोलिक सीमा पुसल्या असून धर्म, भाषा, वर्णभेदांचे वादही संपुष्टात आणण्याची गरज आता अधोरेखित होऊ लागली आहे. करोनाकाळात याच भावनेतून अन्य अनेक देशांना साथ निवारणासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीचा पुरवठा करून भारताने जगासमोर एक आदर्श उभा केला आहे. 

Tuesday, May 12, 2020

भावी इतिहासाचे सोनेरी पान...


नर्स हा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे, हे या साथीने आज दाखवून दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्याा अहवालानुसार, आज जगभरात नर्सेसची संख्या केवळ दोन कोटी ८० लाख एवढी आहे. आणि प्रत्यक्षात  ६० लाख नर्सेसचा तुटवडा आहे.
येत्या दशकभरात यापैकी दहा टक्के नर्सेस सेवानिवृत्त होतील, तेव्हा ही तफावत अधिकच जाणवेल. कारण नव्याने या क्षेत्रात दाखल होणाऱ्यांची संख्या खूपच संथ आहे.
विशेष म्हणजे, नर्सिंग हे क्षेत्र महिलांसाठीच असल्याचा जागतिक समज आहे. आज जगभरात या क्षेत्रात ९० टक्के महिलाच आहेत.भारतातही जेमतेम १२ टक्के पुरुष या व्यवसायात आहेत.
या पार्श्वभूमीवर, भारतातील या क्षेत्राची स्थिती काळजी वाटावी अशीच दिसते. १३६ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील परिचारिकांची संख्या केवळ २३ लाख ३६ हजार २०० एवढीच आहे. याचा अर्थ, प्रत्येक दहा हजार लोकसंख्येमागे, १७.३ एवढीच परिचारिकांची संख्या आहे.दर वर्षी देशात सुमारे ३ लाख २३ हजार परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात, आणि दहा टक्के परिचारिका निवृत्त होऊन व्यवसायाबाहेर जातात. या हिशेबाने, येत्या दहा वर्षांत भारतात परिचारिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या जेमतेम ३० लाखांपर्यंत वाढलेली असेल, असा अंदाज आहे.
भारताच्या आरोग्य क्षेत्राचे एकूण आकारमान लोकसंख्येच्या प्रमाणात जेमतेमच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार आरोग्य क्षेत्रात परिचारिकांची संख्या या क्षेत्राच्या एकूण पसाऱ्यापैकी ४७ टक्के आहे, तर वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या जेमतेम २३.३० टक्के आहे. दंतवैद्यकांचे प्रमाण तर केवळ साडेपाच टक्के एवढेच आहे, आणि मिडवाईफ नावाचा प्रकार शोधावाच लागेल अशी स्थिती आहे.
करोना व्हायरसच्या फैलावामुळे संपूर्ण जगासमोरील एक मोठी समस्या अधोरेखित झाली आहे. यापुढे ही समस्या दुर्लक्षित राहिली, तर करोनाव्हायरसने मानवजातीला इशारा देऊनही आपण शहाणपण शिकलो नाही, असे होईल. जगभरातील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणे ही यापुढील काळाची गरज राहील.
सध्या ज्या ईर्ष्येने जगभरातील परिचारिका करोनाविरुद्धच्या युद्धाचे नेतृत्व करत आहेत, त्याबद्दल जग त्यांचे ऋणी आहे. भविष्यात या लढाईचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा परिचारिकांच्या कर्तृत्वाचे पहिले पान सोनेरी असेल!

Monday, May 11, 2020

‘खास बातमी’: व्यक्ती विशेष!


आजची ‘खास’ बातमी. व्यक्ति विशेष!

कोणत्याही बातमीचे महत्व वाचकांच्या दृष्टीने किती असते हे लक्षात घेऊन बातमीची लांबी-रुंदी व तपशील आदी बाबी ठरविल्या जातात. प्रत्येक वर्तमानपत्राचा आपला असा एक ‘बांधलेला’ वाचकवर्ग असल्याने त्या वाचकाची ‘नस’ वर्तमानपत्रास नेमकी माहीत असते. ती ओळखूनच बातमी केवढी करावी, किती वेळात ती वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजे, याचे निकष ठरविले जातात. रतन खत्रीच्या निधनाची एवढी लांबलचक बातमी तत्परतेने देताना हे निकष पाळले गेले असावेत यावर विश्वास ठेवायला हवा. कारण प्रश्न वाचकाच्या अभिरूचीचा आहे.

एखाद्या व्यक्तीच्या निधनाचे वृत्त देताना त्या व्यक्तीचे सामाजिक स्थान, कर्तृत्व, चारित्र्य आणि त्या व्यक्तीच्या निधनामुळे होणारी सामाजिक हानी/पोकळी याचा विचार करावा असे संकेत असतात. अशा व्यक्तीच्या निधनानंतर समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत शोकसंवेदना उमटतात. तोही एक निकष मानला जातो.
या बातमीसाठी जेवढी जागा व व्यापक माहिती दिली गेली, तेवढी जागा-माहिती काळाआड जाणाऱ्या प्रत्येकाच्या बातमीसाठी मिळतेच असे नाही. कारण, ‘निकष!’
दोन महिन्यांपूर्वी ९ मार्च रोजी ज्येष्ठ संपादक, अभ्यासू पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन झाले. ती बातमी याच वर्तमानपत्रात तिसऱ्या दिवशी आली. त्याची जागा आणि बातमीचा तपशील पाहिला, की व्यक्तींचे महत्व, वाचकांच्या अभिरूचीचा अंदाज आणि बातमीची जागा यांची नेमकी नस पकडली का, असा प्रश्न पडतो.


Sunday, May 10, 2020

संकटः शोधाची जननी!


गरज ही शोधाची जननी आहे असे पूर्वी म्हटले जायचे. आता त्यात थोडा बदल करून, 'संकट ही शोधाची जननी आहे' असे म्हणावे लागेल.
करोनाचे संकट सुरू झाल्यामुळे एक गोष्ट चांगली झाली आहे. हजारो तल्लख मेंदू, नव्या कल्पना, नवी संशोधने आणि नव्या योजना आखण्यासाठी कामाला लागले आहेत. भारतात अशा मेंदूंची कमतरता कधीच नव्हती. पण असे मेंदू पाश्चिमात्य देशांसाठीच बहुतेकदा राबले. आता मात्र, करोनाच्या संकटामुळे देशातील बुद्धिमंतांच्या मेंदूला चालना मिळाली आहे.
ही चांगली गोष्ट आहे.
हैदराबादमधील संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) प्रमुख प्रयोगशाळेत सध्या करोनाकाळातील संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठीच्या उपायांवर जोरदार संशोधने सुरू झाली आहेत. या प्रयोगशाळेने आता डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस) ही स्वयंचलित कॉन्टॅक्टलेस यूव्हीसी सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केली आहे. मोबाइल फोन, आयपॅड, लॅपटॉप, चलनी नोटा, चेक, चलान, पासबुक, कागद, लिफाफे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी हे संशोधन मोलाचे ठरणार आहे.
डीआरयूव्हीएस कॅबिनेटमध्ये स्पर्श न करता या वस्तूंची स्वच्छता करता येत असल्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे संशोधन खूप महत्वाचे ठरले आहे. ड्रॉवर ओपनिंग आणि क्लोजरिंग मॅकेनिझम असलेला सेन्सर स्विचमुळे थेट स्पर्श न करता स्वयंचलित रीतीने हे यंत्र हाताळता येते. या यंत्रामधून कॅबिनेटमध्ये ठेवलेल्या वस्तूंना यूव्हीसीची ३६० अंश इतकी उष्णता मिळते, व सॅनिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण यंत्रणा आपोआप स्लीप मोडमध्ये जाते, त्यामुळे ऑपरेटरला त्या वस्तूची प्रतीक्षा करण्याची किंवा त्याच्याजवळ उभे राहण्याची आवश्यकता नाही.



शपथ तुला आहे...


ही बातमी ज्या वाहिनीवर दिसत आहे, त्यामुळे ती खरी आहे की नाही याबाबत खात्री देता येत नसली तरी सध्या राज्य ज्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जिवाचा आकांत करीत आहे तो पाहता, असे काही असेलच, तर तो जनतेला वाऱ्यावर सोडून पळ काढण्याचा प्रकार आहे असेच म्हणावे लागेल!


गेल्या अनेक दिवसांपासून आपले मुख्यमंत्री आपल्याला धीर देत आहेत. महाराष्ट्र हा लढवय्या शिवरायांचा देश असून आपण सारे त्यांचे शूर मावळे आहोत असे सांगत आहेत. शत्रू अदृश्य असला तरी आपण त्याच्याशी लढणार, पळ काढणार नाही अशी ग्वाही देत आहेत, आणि कठीण परिस्थितीत राजकारण करू नका असे विरोधकांना बजावले जात आहे.


आता लढाई ऐन मध्यावर आली आहे. जनतेने संकटास तोंड देण्याची हिंमतही जमा केली आहे, आणि विरोधी पक्षांनीही, राजकारण करणार नाही अशी जाहीर हमी दिलेली आहे.

असे सर्व अनुकूल वातावरण असताना, तीन चाकांची रिक्षा अशी अचानक रखडण्याची चिन्हे कशामुळे आली असावीत? विधान परिषदेचे सदस्यत्व मिळून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद निश्चिंत व्हावे यासाठी कालपरवापर्यंत केवढी यातायात केली गेली. राज्यपालांवरही चिखलफेक केली गेली, त्यांची टोपीही उडवण्याचे शाब्दिक पराक्रम झाले, आणि राज्यपालांनीच मार्ग काढून निवडणूक आयोगास विनंती केल्याने विधान परिषदेच्या निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर झाले.
हे सारे, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी पार पडले असताना अचानक ते स्वत:च असे काही इशारे देत असतील, तर सत्तारूढ आघाडीत राजकारण सुरू आहे असा संदेश समाजात जाईल.
ऐन लढाईच्या तोंडावर सेनापतीने माघार घेण्यासाठी निमित्त तर शोधले नाही ना, अशी शंका महाराष्ट्राच्या मावळ्यांच्या मनात येईल.
छत्रपतींचा महाराष्ट्र असा नव्हता, नाही आणि असू नये!
मुऱ्क्य म्हणजे, ‘त्या’ दिलेल्या ‘वचना’चे काय? त्याचा विसर पडून कसे चालेल?

भूमिपुत्रांच्या शोधात...



करोनाच्या भयानक फैलावामुळे सुरू झालेल्या टाळेबंदीत टिकाव लागण्याची शक्यताच संपल्यामुळे राज्याराज्यांतील परप्रांतीयांनी गावाचा रस्ता धरला आहे. करोनास्थिती सामान्य झाल्यावर बदललेल्या जीवनशैलीत अनेक उद्योग व्यवसायांना अस्तित्व गुंडाळावे तरी लागेल, किंवा नव्याने उभे राहण्यासाठी प्रचंड शक्ती, पैसा आणि मुख्यत: नवी कार्यशैली निर्माण करावी लागेल. शहरांमधून गाशा गुंडाळून गावी गेलेल्या लहानमोठ्या व्यावसायकांमध्ये पुन्हा शहरांकडे परतून आपले व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता आणि आर्थिक क्षमता असेलच असे आज तरी दिसत नाही. येणारा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा जास्त अनिश्चितता घेऊनच उगवत असल्याने, गावाकडून शहरांमध्ये येऊन लहानमोठे व्यवसाय करणाऱ्यांनाच या अनिश्चिततेचा जबर फटका बसणार हे स्पष्ट आहे.

थोडक्यात, करोनाकाळ निवळल्यानंतर लहान व्यवसायांचे कंबरडे मोडलेले असेल. घडी विस्कटलेली असेल. तरीही, जी काही परिस्थिती त्या वेळी असेल, त्यामध्येही या व्यवसायांचे असणे ही मोठी गरज असेल.
म्हणून, आतापर्यंत हुकलेल्या संधीचा फायदा घेण्याचे आव्हान भूमिपुत्रांना परिस्थितीने दिले आहे. परप्रांतीयांनी आपल्या रोजगारांवर अतिक्रमण केल्याची भावना भडकावत ठेवून अनेक राजकीय पक्ष, संघटना स्वत: फोफावल्या. भूमिपुत्रांच्या हक्काची आंदोलने वगैरे गोंडस नावाखाली हा प्रश्न धगधगताही ठेवला गेला. मात्र तो कधीच कायमचा सुटला नाही. प्रादेशिक विकासाचा असमतोल हे या प्रश्नाचे मूळ असते. अविकसित प्रदेशांत रोजगाराच्या संधी कमी असतात. त्यामुळे त्या भागांतील तरुण रोजगारासाठी विकसित प्रदेशांचा रस्ता धरतो. हे काही गुपित नाही. त्यामुळे, समतोल विकास हे या समस्येचे उत्तर असूनही त्यासाठी मात्र फारसे प्रयत्न झाले नाहीत असा याचा अर्थ आहे.
करोनोत्तर काळात, विकासाच्या संधी सर्वत्र समान असतील. कारण विकसित भागांनाही या काळाचा फटका बसणार असल्याने विकासाची पीठेहाट होईल, आणि अविकसित भागांतील गरजा वाढल्याने मागणी वाढून विकासाच्या संधींना निमंत्रण द्यावे लागेल.
शहरे सोडून गावाकडे गेलेल्यांकरिता त्या त्या भागात रोजगारांचे नवे मार्ग निर्माण करावे लागतील. त्यामुळे ग्रामीण भागांत रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच, पण शहरी भागात निर्माण होणारी पोकळीही भरून काढावी लागेल.
इथे भूमिपुत्रांच्या आजवर गमावलेल्या संधी समोर उभ्या राहतील. मुंबईसारख्या महानगरांत ज्या संधी परप्रांतीयांनी मिळविल्या, त्या साऱ्या संधी भूमिपुत्रांसाठी उपलब्ध राहतील. अर्थात, परप्रांतीयांना त्या संधी सहजपणे उपलब्ध झालेल्या नव्हत्या. लहानात लहान व्यवसायातदेखील जम बसविण्याकरिता त्यांनी अपार मेहनत घेतली होती. संघटित प्रयत्न केले होते आणि मुख्य म्हणजे, या काळात ते एकमेकांसोबत होते.
नव्या परिस्थितीत या संधी आपल्याला मिळवायच्या असतील, तर भूमिपुत्रांनाही तेच करावे लागेल.
कारण संधी फार काळ हात जोडून समोर ताटकळत नसतात.
तुम्हाला काय वाटतं?